आपल्या राज्याचे, संस्थानाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी अनेक वीरपुरुष-स्त्रियांनी लढता लढता मरण पत्करले त्यातील एक पराक्रमी राणी दुर्गावती हिचा आज स्मृतीदिन,त्यानिमित्त एक लेख-
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतावर कोणाचाच एकछत्री अंमल नव्हता. देशामध्ये छोटीमोठी स्वतंत्र राज्ये होती, छोटीमोठी संस्थाने होती. प्रत्येक राज्याचा, संस्थानाचा राजा आणि त्याचे सरदार, मंत्री आपल्या राज्याचा कारभार करत असत.
आपल्या राज्याचे, संस्थानाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी अनेक वीरपुरुषांनी लढता लढता मरण पत्करले. त्यामध्ये स्त्रियाही मागे नव्हत्या. अशाच शूर स्त्रियांपैकी एक म्हणजे राणी दुर्गावती. ती गोंड या जमातीतील होती. गोंड ही मध्य भारतातील एक जमात असून, मध्ययुगीन काळात गोंडवाना हा भारतातील एक मोठा भूप्रदेश होता. आजच्या विदर्भ, छत्तीसगड व मध्य प्रदेश यांबरोबर याच्या सीमा जोडलेल्या होत्या. या गोंडवाना राज्यावर राजगोंडांचे राज्य होते. या प्रदेशात गोंड आदिवासी हा प्रबळ समुदाय आहे. ‘गोंडवाना’ हे नावसुद्धा ‘गोंडी’ लोकांच्या नावावरूनच पडले आहे. या गोंडवानातील माहोबाचे राजा कीर्तिसिंह हे चंदेल या राजपूत घराण्यातील होते. त्यांची दुर्गावती ही मुलगी. तिचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ मध्ये कालिंजर किल्ल्यात दुर्गाष्टमीला झाला, म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले. ती नावाप्रमाणेच प्रसंगी दुर्गावतार धारण करायची. ती खूप सुंदर आणि हुशार तर होतीच; पण खूप शूर आणि धाडसी होती. लहानपणापासूनच तिला धनुष्यबाण चालविणे, तलवारबाजी करणे, शिकार करणे या सर्वांची आवड होती.
माहोबाच्या राज्याच्या शेजारीच गढमंगला राज्य होते. या राज्याचा राजा संग्रामशहा गोंड जमातीचा होता. त्याचा मुलगा दलपत यांच्याशी दुर्गावतीचे लग्न झाले. त्यांना पुढे मुलगा झाला, त्याचे नाव वीरनारायण. तो चार वर्षांचा असतानाच दलपत यांचा मृत्यू झाला. राणीने छोट्या वीरनारायणचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने ती स्वतः राज्यकारभार करू लागली.
चितोड, मेवाड, गोंडवाना अशी काही राज्ये सोडली तर आजूबाजूला सगळी मुस्लीम राज्ये होती. दिल्लीत अकबराचे राज्य होते. राणीला कल्पना होती की, ही मुस्लीम राज्ये आपल्यावर नक्कीच हल्ले करणार. म्हणून तिने आपले सैन्य तयार केले. तिने सर्वप्रथम सैन्याची फेररचना केली. २० हजार घोडेस्वार, एक हजार हत्ती व मोठ्या प्रमाणावर पायदळ होते. त्यामध्ये महिला सेनेचाही अंतर्भाव होता. याशिवाय, ५२ गड तिच्या ताब्यात होते. माळवा प्रदेशातील बहादुर शहा आणि मीआणा अफगाण यांचा पराभव केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. ती उत्तम प्रशासक होती. राज्यात सर्व थरांतील लोकांमध्ये तिचा वावर असे. प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधून ती त्यांच्या अडचणी समजून घेत असे. जेव्हा तिने शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या, तेव्हा राज्यामध्ये अनेक ठिकाणी विहिरी आणि तलावांचे बांधकाम केले. त्यामुळे राज्यामध्ये पाण्याची कमतरता कधीच जाणवली नाही. अजूनही जबलपूरमध्ये राणी तलाव, आधार तलाव, चौरी तलाव आपल्याला पाहायला मिळतात. असे म्हणतात, तिचे राज्य इतके समृद्ध होते की, प्रजा कर देताना सुवर्ण मुद्रांमध्ये किंवा हत्तीच्या रूपात कर देत असे. मुस्लीम आक्रमणाचा धोका ओळखून तिने वेळीच शत्रूवर हल्ला करून त्यांचा पराभव केला आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. तिने बाजबहाद्दूरलासुद्धा हरवले.
राणी दुर्गावती जणू काही सर्वगुणसंपन्न होती, रूपवती होती आणि तितकीच बुद्धिमान होती. तिच्या राज्यात कला व साहित्य क्षेत्रासाठी चांगले दिवस होते. तिच्या दरबारात मेगा सिंह उईका, छन्ना सिंह मडावी, पद्मनाभ भट्टाचार्य असे विद्वान होते, ज्यांनी दुर्गा माँ, यायल, गोंडवाना वारी, दुर्गावती विलास, समयालोक, वीरचंपू अशा साहित्यरचना केल्या. महेश ठाकूर, रघुनंदन दामोदर ओझा, भाव सिंह, राजनेगी असे अनेक कवी तिच्या दरबारात होते. लहानपणी अनेकवेळा ती राजकुमाराच्या वेशात शिकारीला जात असे. तसेच, स्वतः राज्य करताना पुरुष वेशात फिरत असे. लढाईच्या वेळीसुद्धा ती पुरुष वेश परिधान करत असे.
तिच्या पराक्रमाची कीर्ती अकबराच्या कानावर गेली. त्याने तिच्यावर आक्रमण करण्यासाठी दोनदा सैन्य पाठवले; पण राणीने दोन्ही वेळा त्यांचा पराभव करून धूळ चारली. अकबराने दोन वर्षांनी प्रचंड सैन्यासह पुन्हा तिच्यावर हल्ला केला. राणीने आपल्या तुटपुंज्या सैन्यानिशी अकबराशी निकराचा लढा दिला. राणीच्या दोन्ही डोळ्यांना बाण लागले, तिला दिसेनासे झाले. तरीपण दोन्ही हातांत तलवारी घेऊन ती लढतच राहिली. तिच्या मानेत, गळ्यात बाण घुसले आणि ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेव्हा तिला कळून चुकले होते की, आपण युद्ध हरलो आहोत. अकबराचा क्रूर स्वभाव जाणून जिवंतपणे शत्रूच्या हातात सापडण्यापेक्षा राणीने स्वहस्ते छातीत कट्यार खुपसून वीरमरण पत्करले. तो दिवस होता २४ जून १५६४. १६ वर्षे कुशल राज्यकारभार केलेली ही पराक्रमी, शूरवीर, धैर्यवान राणी शत्रूपुढे शरण न जाता इतिहासात अजरामर झाली आणि प्रेरणास्रोत बनली. अशा या थोर राणीला आणि तिच्या पराक्रमाला शतश: नमन.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment