रॅंड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचा चाफेकर बंधूंनी आजच्या दिवशीच वध केला होता, त्यांच्या या अद्वितीय पराक्रमाची माहिती देणारा हा लेख-
काही काही घटना त्याक्षणी शुल्लक वाटतात, परंतु इतिहासाच्या पानांवर मात्र त्या अजरामर होऊन जातात. अशीच एक घटना म्हणजे जुलमी इंग्रज अधिकारी रॅंड याचा पुणे येथे झालेला वध. त्या वधाची कहाणी वाचताना सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात. ते ऐतिहासिक कार्य करणाऱ्या चाफेकर बंधूंचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते आणि अभिमानाने नकळत डोळे पाणावतात.
सन १८९६ च्या अखेरीस पुण्यात प्लेगचा कहर झाला होता. पुण्यात या प्लेगने थैमान घातले होते. घरोघरी दररोज माणसे या भयाण आजाराने जीव गमावत होती. यावेळी तत्कालीन इंग्रज सरकारने केलेली उपाययोजना लोकांच्या भावना दुखावणारी होती. लोक संतप्त झाले होते.
सरकारने प्लेगची साथ आटोक्यात यावी म्हणून योग्य उपाययोजना केल्या नाहीत, फक्त पुण्यातील घरे रिकामी करून पुण्याबाहेर राहण्याचा आदेश काढला. त्यामुळे लोक रोग्याविषयी माहिती देणे टाळू लागले. इंग्रजांचे शोधपथक पुण्यातील घराघरांतून धुमाकूळ घालू लागले. देवघरातील देवावर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. घरातील सोने-नाणे लुटणे, मुलींना-महिलांना घराबाहेर फरफटत ओढून नेणे, अत्याचार करणे आणि पुरुषांना विविध प्रकारे अपमानित करणे असा भयानक छळ इंग्रजांनी सुरू केला. आधीच जनता या भयानक रोगामुळे त्रस्त झाली होती, त्यात जिल्हाधिकारी वाल्टर चार्ल्स रॅंडच्या जुलमी उपाययोजनांमुळे लोक प्रक्षुब्ध झाले होते. यामुळे दामोदरपंतांची रॅंड वधाची इच्छा तीव्र झाली. अशातच पुण्याचे लोक अत्याचाराने त्रस्त असताना सरकारने व्हिक्टोरिया राणीचा हीरक महोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या दिवशीच रॅंडचा वध करायचाच असा निश्चय दामोदरपंतांनी केला. २२ जून १८९७ रोजी राणीच्या हीरक महोत्सवानिमित्त गणेशखिंडीत मेजवानी देण्यात आली. त्यावेळी अनेक युरोपियन हजर होते. याच दिवशी दामोदरपंत, रानडे, बाळकृष्ण आणि विनायक आपटे आपापली रिव्हॉल्व्हर घेऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाहेर पडले आणि गणेशखिंडीतील गव्हर्नमेंट हाऊसपासून थोड्या अंतरावर काळोखात दबा धरून बसले. मेजवानीनंतर रॅंड गाडीतून परत जाऊ लागला की “गोंद्या आला रे आला” असा खुणेचा शब्द उच्चारायचे ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवण्यात आले.
मेजवानी करून पाहुणे गव्हर्नमेंट हाऊसमधून परतू लागले. गाड्या उतारावर येताच “गोंद्या आला रे आला” हा परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि रॅंडसारखी दिसणारी आयहर्स्टची गाडी दिसताच बाळकृष्णपंतांनी आयहर्स्टच्या मस्तकावर गोळी झाडली. गाडीत बसलेल्या मिसेस आयहर्स्ट यांना हे कळताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. बाळकृष्णपंतांनी गोळी लागून कोसळलेल्या व्यक्तीला पडताना पाहिले, परंतु वासुदेवरावांचा “गोंद्या आला रे आला” हा घोष अद्यापही सुरूच होता. तोच रॅंडची गाडी आणि तिच्या पाठोपाठ धावणारा वासुदेव चाफेकर त्यांना दिसला. दामोदरपंतांनी तात्काळ गाडीवर उडी घेऊन रॅंडच्या पाठीला पिस्तूल लावून चाप ओढला. गोळी फुफ्फुसातून आरपार जाऊन रॅंड बेशुद्ध पडला. गोळी लागताच आयहर्स्ट मरण पावले. रॅंड मात्र औषधोपचारांनी बेशुद्धीतून २२ जूनला थोडा शुद्धीवर आला, पण त्याला कोणतेही वक्तव्य करता आले नाही. रॅंडने ३ जुलै १८९७ रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. पुणे युनिव्हर्सिटी जवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली.
चाफेकर बंधू त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही पकडण्यात आले. चाफेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. रॅंडची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधूंची नावे गणेश व रामचंद्र द्रविड यांनी इंग्रज सरकारला कळवली. याचा बदला चाफेकरंचे तिसरे बंधू वासुदेव हरी चाफेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली. दामोदर चाफेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आली. त्यानंतर वासुदेव चाफेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चाफेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. रॅंडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे वय अवघे २७ वर्षे होते, बाळकृष्ण यांचे वय २४ वर्षे व वासुदेवरावांचे वय १८ वर्षे होते. ऐन तारुण्यातील या तरुणांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो. आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी या बंधूंनी अमूल्य त्याग केला. अशा अनेक अनाम वीरांच्या सर्वोच्च बलिदानाने आपला देश स्वतंत्र झाला आहे. राष्ट्रकार्यासाठी या तीन भावांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले हे बलिदान खरंच अद्वितीय आहे! त्यांच्या या त्यागास व शौर्यास त्रिवार वंदन!!
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment