हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. त्याविषयी ही माहिती
महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांत सुंदर किल्ला म्हणजे किल्ले पारगड. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. या हिरव्यागार वनश्रीनेच पर्यटकांना आपल्याकडे खेचले आहे. यातच पाऊस कोसळू लागला, की पारगडाकडे वाट वाकडी करावीशीच वाटते. समुद्रसपाटीपासून ७३८ मीटर उंचीवर वसलेल्या पारगडास भेट देण्यासाठी कोल्हापूरहून चंदगड गाठावे लागते. चंदगड ते पारगड हे अंतर ३० किलोमीटर आहे. चंदगडहून पारगडजवळच्या इसापूर गावासाठी दुपारी १२ वाजता बस सुटते. ही चुकल्यास मात्र संध्याकाळपर्यंत बस नाही. इसापूर गावातून पारगड साधारण पाऊण तासाच्या चालीवर आहे. आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणामुळे मन प्रसन्न होते. जवळ येताच हिरव्यागार दरीतून पारगडाचा डोंगर ठळकपणे दिसू लागतो आणि आपल्या पावलांना आपोआपच गती येते. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केला आहे. या वाटेवरच जुन्या दरवाजांचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालीन जांभ्या दगडात बांधलेल्या २०० पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गडावर प्रवेश करताच समोर त्या तोफा आणि डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो. तब्बल ४८ एकर क्षेत्रफळाच्या दक्षिणेवर पसरलेल्या पारगडाच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेला नैसर्गिक अशी ताशीव कड्याची तटबंदी असून, दक्षिणेला थोड्या उताऱ्यानंतर पुढे प्रचंड खोल दरी आहे. या भक्कम नैसर्गिक संरक्षण रचनेमुळे व गडावरील इमानी मावळ्यांमुळे याच्या निर्मितीपासून पुढे तब्बल १८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला. शिवरायांनी हा किल्ला बांधून याची वास्तुशांती केली व गृहप्रवेश केला आणि येथील मावळ्यांना राजांनी आज्ञा दिली, ‘चंद्र, सूर्य गगनी तळपत आहेत तोवर गड जागता ठेवा!’ आणि शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शूर मावळ्यांच्या वारसांनी आजही जागता ठेवला आहे. असा हा गड पाहण्यास सुरुवात करूया. डाव्या हातास मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच एक समाधी आहे. ही कुणाची याची मात्र इतिहासात नोंद नाही. येथून थोड्या अंतरावरच पारगडावरील लोकवस्ती सुरू होते. मळलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर आपण पारगडाच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळेसमोर येऊन पोहोचतो. शिवछत्रपतींचा पुतळा इथे आपले स्वागत करतो. थोड्या अंतरावरच भवानी मातेचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. भवानी मातेची काळया पाषाणातील मूर्ती देखणी, शस्त्रसज्ज आणि तेजपुंज अशी आहे. तिला पाहताच प्रतापगडावरील भवानीदेवीची आठवण होते. या मंदिराच्या मंडपात शिवकालातील प्रसंग दाखविणारी चित्रे, तसेच मावळ्यांचे व संतांचे पुतळे आहेत. या सर्वांमुळे या मंदिराला एका छोट्या संग्रहालयाचे स्वरूप आले आहे. पारगडास फेरफटका मारू लागलो, की गुणजल, महादेव, फाटक, गणेश असे चार तलाव दिसतात. याबरोबरच गडावर शिवकालीन अशा १८ विहिरीही आहेत, पण त्यापैकी बऱ्याच बुजलेल्या आहेत. मालेकर, फडणीस, महादेव, माळवे, भांडे, झेंडे नावाचे बुरुज भेटू लागतात. गडाच्या उत्तरेकडील बाजूस महादेव मंदिर आहे. या मंदिराजवळून खालच्या दरीतले घनदाट जंगल पाहणे खिळवून ठेवणारे आहे. गड फिरण्यासाठी दोन-एक तास पुरेसे होतात. गडावर मुक्कामासाठी शाळा किंवा भवानी मंदिराशेजारील खोली उपयोगाची आहे. आगाऊ कल्पना दिल्यास गावातील दुकानात चहा-फराळाची सोय होऊ शकते. पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार, गडावर झेंडा लावण्याचे काम असणारे बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, शिवकालातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी मावळयांचे वंशज कान्होबा माळवे, घोडदळाच्या पथक प्रमुखाचे वंशज विनायक नांगरे व गडकऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे अजूनही राहतात. पण गडावर उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्यामुळे गडावरील बरेच लोक सैन्यभरती, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने परगावी गेलेले आहेत. दरवर्षी माघ महिन्यात देवीचा उत्सव असतो. तेव्हा ७ दिवस गडावर नाटक, गोंधळ असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या वेळी मात्र वर उल्लेख केलेल्या सर्व घराण्यातील लोक आपणास गडावर भेटतात. सध्या तानाजीचे वंशज बाळकृष्ण मालुसरे बेळगावला राहतात. त्यांच्याकडे तानाजी मालुसरे यांची तलवार, सिंहगडावर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर शिवरायांनी आपल्या गळ्यातील समुद्र कवडय़्याची माळ तानाजींच्या देहावर ठेवली होती ती कवडय़्याची माळ व मालुसरे घराण्याचा मूळ पुरुष रायबाजी बिन तानाजी मालुसरे यांची अस्सल वंशावळ अशा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या वस्तू त्यांनी आपल्या प्राणापलीकडे जपून ठेवल्या आहेत. पारगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन १६७६ साली या गडाची निर्मिती केली असे आढळते. पारगडचा पहिला किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायाजी मालुसरे यांची शिवरायांनी नेमणूक केली. काही दिवस स्वतः महाराज या गडावर मुक्कामास होते, असे गडकरी अभिमानाने सांगतात. पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर छुपे हल्ले करून त्यांना पुरते हैराण केले. शेवटी खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंतांना कुमक घेऊन येण्यास सांगितले, पण गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. अखेर कंटाळून खवासखान रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मोघलांनी पारगडासमोर सपशेल हार पत्करला. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. नंतर मराठा राज्य संपून इंग्रजांचा अंमल गडावर चालू राहिला, तरीही गडावरील लोक गडावरच राहिले. इंग्रजांनी त्यांना मासिक तनखेवजा पगार सुरू केला. हा पगार बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत त्यांना मिळत असे. असा हा इतिहाससंपन्न किल्ले पारगड जुन्या अवशेषांनी व अजूनही नांदत्या गडकऱ्यांच्या घरांनी जागता असून निसर्गानेही संपन्न आहे. पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी बहरलेले असून आजही त्यात जंगली जनावरे आहेत. या हिरवाईमुळे आपण कोणत्याही ऋतूत गडाला भेट देऊ शकतो. पावसाळ्यात हे सौंदर्य अजून वाढते. इतिहास आणि निसर्गाच्या या प्रेमापोटी अनेक जण पारगडाची वाट चढत असतात.
संदर्भ- - maharashtratourism वेबसाईट
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment