तन आणि मन यांची योग्य काळजी घेणारा- योग

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.

तन आणि मन यांची योग्य काळजी घेणारा- योग मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील "योग" संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याचबरोबर भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होतो.

२१ जूनलाच हा योग दिन का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो, ज्याला ग्रीष्म संक्रांती असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. त्यामुळे, योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. म्हणूनच, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्त्व -

योग करणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. ते तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवते. योग केल्याने तुम्ही गंभीर आजारांपासून दूर राहता. निरोगी जीवनशैलीसाठी डॉक्टर देखील योग करण्याचा सल्ला देतात. योग केल्याने त्वचा चमकते, केस मजबूत होतात, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या राहत नाहीत आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये योगाच्या ज्या आठ अंगांचे वर्णन आहे, ते उद्देशपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवनाच्या मार्गावर प्रकाश टाकण्यासाठी आहेत. ती अंगे पुढीलप्रमाणे आहेत:

यम - समाधान आणि आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी नैतिक तत्त्वे आणि सचोटी आवश्यक आहेत, जी आपल्याला दररोज मार्गदर्शन करतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यमाचे पाच प्रकार आहेत.

नियम - आत्मशिस्तीसह केलेले आध्यात्मिक आचरण आपल्या दैनंदिन जीवनाला मार्गदर्शन करत असल्यामुळे, ते तृप्ती आणि आनंदाचा मार्ग दाखवतात. नियमांच्या पाच प्रकारांमध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचा समावेश होतो.

आसन - आसनांमध्ये योगाच्या शारीरिक क्रिया, त्यांच्या हालचाली, मुद्रा आणि स्थिती यांचा समावेश होतो, ज्या प्राणायामासोबत (योगिक श्वासोच्छ्वास) केल्या जातात.

प्राणायाम - प्राणायाम हे एक योगिक श्वसन तंत्र आहे, जे संपूर्ण शरीरात 'प्राण' प्रवाहित करून मन आणि शरीराला जोडते.

प्रत्याहार - प्रत्याहार म्हणजे संकल्प एकाग्र करण्याची किंवा अंतर्मुख होण्याची प्रक्रिया. इंद्रियांना आवरून अंतर्मुख होऊन आंतरिक शांती पुन्हा मिळवण्याचे तंत्र म्हणजे प्रत्याहार.

धारणा - एकाग्रता वाढवण्यासाठी आवश्यक असलेले ध्यान.

ध्यान - अखंड ध्यानधारणा, ज्यामध्ये ईश्वराशी एकरूप होण्याच्या बिंदूवर लक्ष केंद्रित केले जाते.

समाधी - आनंद किंवा परमानंदाचा अनुभव घेण्यासाठी ईश्वराशी संबंध जोडण्याकरिता केलेले एकाग्रतेचे ध्यान.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण रोजच्या ताण-तणावांना कमी तर करू शकत नाही किंवा ताण येऊच नये अशीही परिस्थिती नाही. मग या ताण-तणावांचे नियोजन करण्यासाठी आणि आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी योगासने हा एक उत्तम पर्याय आहे. फारशी साधने किंवा जिममध्ये जाण्याचा खर्च न होता घरच्या घरी आणि सहजपणे करता येणारा व्यायामप्रकार म्हणजे योगासने. तेव्हा आजच्या या योगदिनाच्या निमित्ताने आपण उत्तम शरीरसंपदा आणि समतोल मानसिक स्थिती प्राप्त करण्यासाठी योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनविण्याचा संकल्प करूया!

-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement