जागतिक सिकलसेल आजार जागृती दिन

आज (१९ जून) जागतिक सिकल सेल आजार-जागृती दिन आहे. त्यानिमित्त या आजाराची संक्षिप्त माहिती, त्याची भारतातील व्याप्ती आणि दीर्घकालीन उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख-

जागतिक सिकलसेल आजार जागृती दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

सिकलसेल म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये झालेल्या जनुकीय बिघाडाने होणारा हा आजार आहे. त्याचा शोध सन १९१० मध्ये लागला. हा आजार आनुवंशिक असतो. स्त्री किंवा पुरुष अशा कोणालाही हा आजार होऊ शकतो. जेव्हा हा जनुकीय बिघाड एखाद्या बालकात त्याच्या दोन्ही पालकांकडून संक्रमित होतो, तेव्हा त्या बालकाला हा गंभीर आजार होतो. परंतु, ज्या बालकात हा बिघाड फक्त एकाच पालकाकडून संक्रमित होतो, ते बालक या आजाराचा फक्त वाहक असते. प्रत्यक्ष आजार झालेल्या व्यक्तीसाठी हा आयुष्यभराचा आजार आहे आणि तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हिमोग्लोबिनमधील केवळ एका जनुकीय बिघाडामुळे लाल पेशींत बऱ्याच घडामोडी होतात आणि त्यातून लाल पेशीचा आकार कोयत्यासारखा (sickle) होतो. या ‘कोयता-पेशी’चे आयुष्य निरोगी पेशीच्या तुलनेत जेमतेम एक चतुर्थांश असते. त्यामुळे या व्यक्तीला सतत रक्तअल्पता राहते.

जेव्हा हा आजार विक्राळ स्वरूप धारण करतो, तेव्हा सिकल पेशींमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होतात आणि रुग्णाला असह्य वेदना होतात. दीर्घकालीन स्वरूपात या आजाराचे विपरीत परिणाम हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, डोळे आणि हाडांवर देखील होतात. या आजाराचे केवळ वाहक असलेल्या व्यक्तींमध्ये आरोग्यस्थिती तुलनेने ठीक असते. सहसा लक्षणे उद्भवत नाहीत. या आजारावरील प्राथमिक उपचार कायमस्वरूपी असून ते अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. केवळ काही रुग्णांच्या बाबतीतच स्टेम सेल उपचारपद्धती लागू पडते. हा आजार समूळ बरा करण्याच्या उद्देशाने सध्या जनुकीय उपचारांच्या दिशेने संशोधन चालू आहे.

• भारतातील परिस्थिती-

या घडीला भारतात सुमारे अडीच कोटी लोक आजाराने बाधित आहेत. मुळात आपल्याकडे सर्वांच्या जन्मत: सिकल सेल चाचण्या होत नसल्यामुळे खात्रीशीर आकडा उपलब्ध नाही. (नायजेरिया, काँगो आणि भारत या तीन देशांत मिळून दरवर्षी ३ लाख बाधित बालके जन्मतात, असा जागतिक अंदाज आहे). भारतातही आदिवासी भागांमध्ये या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आणि लक्षणीय आहे. मुख्यतः आपल्या १७ राज्यांमध्ये हे रुग्ण विभागलेले आहेत. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, उत्तर भारताचा काही भाग आणि प्रमुख दक्षिणेकडील राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात विदर्भ, सातपुडा आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त आहे.

• दीर्घकालीन रोगनियंत्रण कार्यक्रम - यासंदर्भात भारत सरकारचे ध्येयधोरण असे आहे:

१. सन २०४७ पर्यंत सिकलसेल हा आजार सार्वजनिक आरोग्य समस्या राहू नये, हे ध्येय.

२. त्या दृष्टीने जनमानसात या आजारासंबंधीची जागरूकता वाढवणे; समाजात या आजाराच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर करणे आणि आजाराचे लवकरात लवकर निदान करणे; त्या दृष्टीने संबंधित प्रयोगशाळांचे जाळे गाव पातळीपर्यंत वाढवणे.

३. या चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात देशातील मोठ्या प्रमाणावर बाधित असणाऱ्या १७ राज्यांवर लक्ष केंद्रित करणे.

४. वयोगट ० ते १८ वर्षे मधील सर्वांच्या सिकल सेल चाचण्या करणे. त्यापुढील टप्प्यांमध्ये या वयोगटाची मर्यादा ४० पर्यंत वाढवणे.

५. अशा चाचण्यांमधून एखादा रुग्ण किंवा वाहक आढळल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीही चाचणी करणे.

६. प्राथमिक आरोग्य सेवा कार्यक्रमांमध्ये या आजाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आणि या आजारावरचे उपचार सर्वसामान्य जनतेला माफक दरात उपलब्ध करून देणे.

७. बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जातीने लक्ष देणारे मदत गट स्थापन करणे.

• विवाहपूर्व समुपदेशन

सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे. दोन वाहकांनी एकमेकांशी लग्न करू नये, कारण त्यांच्या विवाहानंतर जन्माला येणारे अपत्य सिकल सेल आजाराने ग्रस्त होऊ शकते. यामुळेच विवाहपूर्व चाचणी आणि समुपदेशन हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एखादा आजार झाल्यावर काळजी करण्यापेक्षा तो आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. सिकल सेल आजारासंदर्भात जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि त्या त्या देशातील सरकारे याबाबत जनजागृती करत आहेतच, परंतु प्रत्येकाची ही वैयक्तिक जबाबदारी आहे, असे समजून काळजी घेतली तर नक्कीच या आजाराला पायबंद घालणे शक्य आहे. आजच्या दिनी आपण हा संकल्प नक्कीच करू शकतो, हो ना!

-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-06-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-06-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement