आपल्या कुटुंबातील वैज्ञानिक वारसा जपणाऱ्या आणि विज्ञान विषयात मूलभूत संशोधन करणाऱ्या डॉ. कमला सोहोनी यांची आज जयंती; त्यानिमित्त त्यांचा अनोखा कार्यपरिचय करून देणारा हा लेख-
भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक डॉ. कमला सोहोनी. कमला सोहोनी या मूळच्या भागवत होत्या. विदुषी दुर्गा भागवत यांच्या सख्ख्या बहिणी होत्या. त्यांचा जन्म १८ जून १९११ रोजी इंदूर येथे झाला. कमलाबाईंचे वडील नारायणराव भागवत आणि त्यांचे काका माधवराव भागवत हे दोघेही मूळचे बंगलोर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे रसायनशास्त्राचे विद्यार्थी होते. कमलाबाईंनी हा विज्ञानाचा वारसा जपला. त्या मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे विषय घेऊन बी.ए.स्सी. पदवी उत्तीर्ण झाल्या.
विज्ञान विषयातच मूलभूत संशोधन करायचे, या निश्चयाने कमलाबाईंनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडे अर्ज केला; पण त्या संस्थेचे तत्कालीन संचालक आणि प्रसिद्ध नोबेल विजेते प्रा. सी. व्ही. रामन यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. अशा संशोधनासाठी महिला पात्र नाहीत, या भूमिकेतून कमलाबाईंचा अर्ज नाकारला गेल्यामुळे कमलाबाईंनी रामन यांच्या कार्यालयाबाहेर सत्याग्रह पुकारला. प्रवेश मिळाल्यावर उच्च श्रेणीत पास होण्याचा विश्वास त्यांनी रामन यांना दिला. त्यांच्या आग्रहामुळे रामन यांनी कमलाबाईंना प्रवेश देण्याचे मान्य केले; पण काही अत्यंत जाचक अटी घातल्या. कमलाबाईंना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सामान्य विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळणार नाही, पहिले संपूर्ण वर्ष त्यांचा प्रवेश हा अस्थायी स्वरूपाचा असेल, गाईड सांगतील तसे आणि तेव्हा रात्री-अपरात्री काम करावे लागेल, स्वतः रामन यांना कमलाबाईंच्या संशोधनाची गुणवत्ता पटत नाही, तोपर्यंत त्यांच्या संशोधनाला अधिकृत दर्जा प्राप्त होणार नाही, पुरुष सहकारी विद्यार्थ्यांशी जबाबदारीने वर्तन करणे, अशा काही अटी त्यांनी डॉ. सोहोनी यांना घातल्या.
बावीस वर्षीय कमलाबाईंना अखेरीस त्या अटींवर प्रवेश मिळाला. संस्थेत प्रवेश मिळालेल्या त्या पहिल्या महिला संशोधक विद्यार्थिनी बनल्या. सन १९३१ ते १९३८ या आठ वर्षांत पाच महत्त्वाच्या शिष्यवृत्त्या त्यांना प्राप्त झाल्या; पण कमलाबाईंनी श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन सुरू ठेवले. दूध-डाळी-शेंगा यातून मिळणाऱ्या प्रथिनांवर त्यांचे संशोधन होते. त्या संशोधनाची गुणवत्ता पाहून रामन यांनी आपला पूर्वनिर्णय बदलला आणि वर्ष १९३६ पासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्यास सुरुवात केली. सन १९३७ मध्ये कमलाबाईंना केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. डेरेक रिख्टर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेडरिक हॉपकिन्स लॅबोरेटरीत संशोधन करण्याची संधी मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या ’स्प्रिंगर रिसर्च’ आणि ’सर मंगलदास नथूभाई’ या शिष्यवृत्त्या मिळवून त्या इंग्लंडला गेल्या; डॉ. रिख्टर यांच्यानंतर डॉ. रॉबिन हिल यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाबाईंचे संशोधन सुरू झाले. त्यांनी बटाट्यावर संशोधन सुरू ठेवले आणि बटाट्यातील ‘सायटोक्रोम सी‘ या जैविक उत्प्रेरकाचा शोध त्यांना लागला. अवघ्या १४ महिन्यांत त्यांचे संशोधन पूर्ण झाले आणि त्यांना डॉक्टरेट मिळाली.
सन १९३९ मध्ये कमलाबाई भारतात परत आल्या. खरं तर त्यांना भारतात परत यायचे होते ते महात्मा गांधींच्या अनुयायी बनून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी; पण त्यांची नवी दिल्लीतील लेडी हार्डींज मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही काळ त्यांना कुन्नूरच्या न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी लाभली. कमलाबाई उत्तम टेनिस खेळत. लग्नानंतर कमलाबाई मुंबईत येताच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बायोकेमिस्ट्री विभागात प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने चार अगदी वेगळ्या खाद्यपदार्थांवर काम सुरू केले. हे चारही पदार्थ निम्नमध्यमवर्गीय माणसांच्या दैनंदिन खाण्यात येणारे होते. त्यातलाच एक होता ताडगोळा.
ताडगोळ्यातील द्रव पदार्थ अ, क जीवनसत्त्व आणि लोहयुक्त असल्यामुळे त्याचे सेवन प्रकृतीला उपयुक्त ठरणार आहे, यातूनच 'नीरा' नावाचे पेय जन्माला आले. कुपोषित मुलांच्या पोषणासाठी आणि आदिवासी समाजातील गर्भवती स्त्रियांसाठी अल्प मूल्य पोषण आहार म्हणून नीरा या पेयाचा वापर केला जातो आणि त्यांचे आरोग्य त्यातून सुधारते हे सिद्ध झाल्यानंतर कमलाबाईंच्या या संशोधनाची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. आता आपण महामार्गांवर आणि हमरस्त्यांवर उभ्या असलेल्या नीरा विक्रेत्यांच्या टपऱ्या नेहमीच पाहतो; परंतु त्यामागे कमलाबाईंचे संशोधन दडले आहे हे आपल्याला माहीत नाही.
निवृत्तीनंतर सन १९६९ मध्ये त्यांनी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. त्यावरचे त्यांचे पुस्तक ‘आहार-गाथा‘ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. कमलाबाई मुंबईच्या आरे दुग्ध प्रकल्पाच्या सल्लागारपदी नियुक्त झाल्या. दूध नासू नये यासाठीची एक आदर्श पद्धती त्यांनी विकसित केली, त्या कामाचीही दखल सरकारी पातळीवर घेतली गेली आणि त्यांना राष्ट्रपती सन्मानाने गौरवण्यात आले. सन १९६६ मध्ये त्या निवृत्त झाल्या. कमलाबाईंच्या मार्गदर्शनाखाली अनेक जणांनी एम.ए.स्सी. आणि पी.एच.डी. प्राप्त केली. कमलाबाई कन्झुमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेशी जोडल्या गेल्या. सन १९८२-८३ या वर्षी त्या सोसायटीच्या अध्यक्ष बनल्या. ‘किमत’ या सोसायटीच्या मुखपत्रासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. २८ जून १९९८ रोजी त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. गूगल या सर्च इंजिनने त्यांच्या ११२ व्या जन्मदिनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर गूगल डूडल सादर केले होते. अशा काळाच्या पुढे राहणाऱ्या वैज्ञानिक डॉ. कमला सोहोनी यांना शतशः नमन!!
-संदर्भ- साप्ताहिक विवेक लेख
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment