जागा हो माणसा...निसर्ग साद घालतोय...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानवजातीला आवाहन करणारा हा लेख-

जागा हो माणसा...निसर्ग साद घालतोय... मुख्य फोटो
मुख्य फोटो

यथा हि पुरुषे सर्वं तदाधारं च संस्थितम्।यथा विश्वं च तस्मिंश्च पञ्चधा पञ्चभिः कृतम्॥
ज्याप्रमाणे या विश्वात पंचमहाभूते अस्तित्वात आहेत, तसेच ती मानवी शरीराचाही आधार आहेत. विश्वातील प्रत्येक सजीव या पाच घटकांशी जोडलेला असतो. आपले मानवी शरीर किंवा कोणताही सजीव हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पर्यावरणातील सगळे घटक किती महत्त्वाचे आहेत हे यावरून समजते. मुळात भारतीय संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण मानव म्हणून या पर्यावरणाचा एक भाग आहोत. आपल्या प्रगतीने पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, हेच भारतीय संस्कृती सांगते. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण होय. हवा, पाणी, झाडे, वनस्पती, प्राणी, नद्या, पर्वत आणि समुद्र या सर्व गोष्टींनी हे पर्यावरण तयार होते. मानवाचे जीवन पर्यावरणावर पूर्णपणे अवलंबून आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि अन्न हे आपल्याला पर्यावरणातूनच मिळते. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे महत्त्व लोकांना समजावे आणि त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी ५ जून रोजी “आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन” साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाने सन १९७२ मध्ये आयोजित केलेल्या स्टॉकहोम परिषदेनंतर केली. वर्ष १९७४ पासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. प्रत्येक वर्षी पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर भर दिला जातो. या दिवशी विविध देशांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पर्यावरण रॅली, व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले जाते.
आजच्या आधुनिक युगात पर्यावरणासमोर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकीकरण, जंगलतोड, वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा अतिरेक आणि वाहनांची वाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक पदार्थ नद्या आणि समुद्र प्रदूषित करतात. वाहनांमधून निघणारा धूर हवेला प्रदूषित करतो. जंगलांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणातील या बदलांमुळे ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, दुष्काळ, पूर आणि तापमानवाढ यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि स्वच्छता राखणेही गरजेचे आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन आपल्याला निसर्गाचे महत्त्व समजावून देतो. पृथ्वी ही आपली अमूल्य संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. जर आपण आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही, तर भविष्यातील पिढ्यांना गंभीर संकटांचा सामना करावा लागेल. म्हणून प्रत्येकाने “पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा” हा संदेश लक्षात ठेवून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे. आता यासाठी प्रत्येक देशातील सरकारे योग्य पावले उचलत आहेतच. पण या पर्यावरणाचा एक घटक म्हणून आपण सुद्धा आपली काही कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. यासाठी खूप अवघड किंवा आवाक्याबाहेरचे काहीही करायचे नाहीये. फक्त काही छोटे छोटे उपाय आपण करूया. कोणते आहेत ते उपाय?
• घरातील पाण्याचे नळ वापरल्यानंतर लगेच बंद करा. – कसे? – नळ सुरू ठेवून दात घासण्याऐवजी फक्त तोंड धुताना नळ सुरू करा, गाड्या पाईपने न धुता बादलीत पाणी घेऊन धुवा.
• प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या वापरणे टाळा. – कसे? – घरून निघताना पाण्याची बाटली सोबत ठेवा, कापडी पिशव्या सोबत ठेवा.
• घरातील ओला व सुका कचरा वेगळा जमा करा.
• दिवसाच्या वेळी नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर करा. कसे? – ज्या खोलीत सूर्यप्रकाश येतो त्या खोलीत बसा, सकाळी कोवळ्या उन्हात फिरायला जा.
• वापर नसताना मोबाईल चार्जर, पंखे व दिवे बंद ठेवा. कसे? – सगळे एका खोलीत बसून आपापली कामे करूया.
• घराच्या गच्चीत किंवा बाल्कनीत झाडे लावा. – कसे? – घरातील एका माणसाने एक छोटे झाड लावावे आणि ते जगवावे. झाड लावणे शक्य नसेल तर निदान एक रोप लावावे आणि ते जगवावे.
• उरलेले अन्न वाया न घालवता योग्य प्रकारे वापरा. – कसे? – आपली आई-आजी करते तशी फोडणीची पोळी, भात किंवा शिळ्याचे थालीपीठ बनवा.
• पावसाचे पाणी साठवण्याची सवय लावा. कसे? – एखाद्या कुंडीत किंवा पातेल्यात पावसाचे पाणी साठवा आणि ते घरकामासाठी वापरा. अंगणात एक कोपरा फरशी न घालता मोकळा ठेवा, जेणेकरून पाणी जमिनीत मुरू शकेल.
• जुने कपडे, पुस्तके व वस्तू पुनर्वापरासाठी दान करा. – कसे? – आपल्या परिसरातील गरजू मुलांना न फाटलेले कपडे स्वच्छ धुवून द्या, जुन्या कपड्यांच्या पिशव्या किंवा हातपुसणे शिवा, वह्यांची रिकामी पाने शिवून एखादी छोटी डायरी बनवा.
वर दिलेले सगळे उपाय अगदी सहज-सोपे आहेत. आता पिशव्या शिवणे किंवा इतर काही कामे प्रत्यक्ष करणे जमणारच नसेल तर ते काम कोणाला तरी द्या, त्याने कोणाची पैशांची गरजही भागेल आणि तुमच्या कपड्यांचा वापरही होईल. 'एक व्यक्ती, एक झाड' यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निसर्गाशी एकरूप होऊ द्या. बाहेर जेवायला गेलात तर पोटापुरतेच वाढून घ्या, अन्न वाया जाऊ देऊ नका. बाहेर काही खाल्ले तर कचरा हा कचराकुंडीतच टाका. पर्यावरण नक्की सुधारणार आहे, पण आपण त्याची सुरुवात स्वतःपासूनच करूया. मग बघा आपली ही पृथ्वी पुन्हा एकदा बहरेल. सगळे सजीव पुन्हा एकदा आपले स्वच्छंदी जगणे जगतील आणि खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा होईल. हो ना!!
-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-06-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-06-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement