एक समर्पित जीवनप्रवास- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या समर्पित कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा.

एक समर्पित जीवनप्रवास- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

१९ फेब्रुवारी, १९०६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर अर्थात गुरूजी यांचा जन्म झाला. नागपूर येथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यावर बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. परिस्थितीमुळे ते तिथेच प्राणिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि तेव्हा ते रामकृष्ण मिशनच्या संपर्कात आले. बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे निकटवर्ती भय्याजी दाणी यांनी सुरू केलेल्या शाखेपासून गुरूजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले आणि ते कायमचे संघाचे झाले. सन १९३३ मध्ये जेव्हा बनारस हिंदू विद्यापीठात त्यांची तीन वर्षांसाठी प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली, त्यावेळी मदन मोहन मालवीय यांच्यासोबत डॉ. हेडगेवारही त्यांना भेटले होते. तिथेच डॉक्टरांनी गुरूजींना संघकार्यात सहभागी करून घेण्याचे ठरवले. पुढे त्यांनी सन १९३५ मध्ये कायद्याची पदवी घेतली. हिंदू विद्यापीठातील कार्यकाळ संपल्यानंतर ते सरगाची येथे साधनेसाठी गेले. रामकृष्ण मिशनच्या स्वामी अखंडानंदांकडून त्यांनी दीक्षा घेतली. यानंतर काही दिवसातच स्वामीजी समाधिस्थ झाले. गुरूंच्या जाण्याने समाधी घेण्याचा विचार करू लागलेले गुरूजी डॉक्टरांच्या संपर्कात आले आणि राष्ट्रकार्यात आयुष्य झोकून देत स्वामीजींचा ‘राष्ट्र देवो भव‘ हा मंत्र जपण्याचा निश्चय केला. कित्येक वर्षे ते डॉ. हेडगेवार यांच्या सोबत राहिले. सन १९४१ साली त्यांच्या निधनानंतर डॉ. हेडगेवार यांच्या इच्छेनुसार, माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी अवघ्या ३४ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक झाले. त्यानंतर तब्बल ३३ वर्षे त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. या काळात संघावर अनेक आघात झाले. भारताची फाळणी, महात्मा गांधींची हत्या, संघबंदी आणि अनेक अडचणी आल्या, परंतु या सगळ्या विरोधी वातावरणात प्रत्येक स्वयंसेवकाची प्रेरणा आणि आधार बनत त्यांनी डॉक्टरांच्या कार्याचा विस्तार केला. संघावरील प्रत्येक आघात सोसत संघ तावून सुलाखून निघाला, तो गुरूजींच्या भक्कम आधारामुळे. गुरूजी कार्यकर्त्यांना सांगत, "हे जीवन नावाचे इंद्रियग्राम फार बलवान आहे. थोडे दक्ष राहा. अव्यवस्थित चित्त हे शापमान आहे. संस्कारित व्हा." भारत देशाविषयी गुरूजी म्हणत, "राष्ट्र हे मानवाकुलाचे एक स्वाभाविक परिमाण आहे. अगदी एकाकी व्यक्ती ही शून्यवत आहे. माणूस जन्माला येतो तो घरात. लहानाचा मोठा होतो तो गावात. तो वाढत राहतो तो समाजात. या समाजाचे परिणत रूप म्हणजे राष्ट्र. राष्ट्रावर असणारे जीवनमूल्यांचे आकाश म्हणजे धर्म. या आभाळात कधी धूळवादळ होईल, पालापाचोळा उडेल, कधी ढग जमा होतील. पण, शेवटी ते निरभ्र होईल. हिंदुत्वाच्या गगनाखाली असणारे राष्ट्र ते हिंदूराष्ट्र." प.पू. गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली संघ हळूहळू सर्व क्षेत्रांमध्ये उतरून समाजाला एकसंध करू लागला. परंतु आता मात्र गुरूजी थकत चालले होते. सततच्या आजारपणामुळे शरीर जीर्ण होऊ लागले होते. त्यातच कर्करोगासारखा भयंकर आजार त्यांना झाला. ३३ वर्षे अविरत राष्ट्रकार्य करून दि. ५ जून, १९७३ रोजी प.पू. गोळवलकर गुरूजींचे निधन झाले. गुरूजींच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि जवळपास तीन लाखांहून अधिक लोक अंत्यदर्शनासाठी आले. त्यांनी जाण्यापूर्वी स्वयंसेवकांना उद्देशून दोन ऐतिहासिक पत्रे लिहिली होती. या पत्रांचे अंत्ययात्रेपूर्वी जाहीर वाचन करण्यात आले होते. यातील एका पत्रात गुरूजींनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेतला. तो अभंग आहे- शेवटची विनवणी, संतजनी परिसावी विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची हाच अभंग नागपूर, रेशीमबागेतील त्यांच्या समाधीवर गुरूजींच्याच हस्ताक्षरात लिहिलेला आहे. ३४ व्या वर्षी घेतलेली जबाबदारी ३३ वर्षे उत्तमरित्या पार पाडत एका देशव्यापी संघटनेचे यशस्वी नेतृत्व करत जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. कदाचित म्हणूनच सदस्य नसतानाही भारतीय संसदेने आणि अनेक विधिमंडळांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाने दाखवलेल्या मार्गावर चालत हे राष्ट्रकार्य अविरत चालू आहे आणि चालू राहणार आहे. संदर्भ- तरुण भारत लेख व इतर संकलित माहिती

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-06-2026 News publication date | Time: 10:54 AM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-06-2026 News publication date | Time: 10:54 AM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Sharad Godbole
05-06-2026 05:14 PM

थोडक्यात पण उत्तम श्री गुरुजींचा जीवन प्रवास मांडला आहे ३३ वर्षात ६६ वेळा पुर्ण भारतभर प्रवास त्यांनी केला आहे. रेल्वे मधील पहिले सरसंघचालक असेही त्यांना संबोधत.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement