बाबूराव पेंटर हे एक प्रसिद्ध महाराष्ट्रीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माता व दिग्दर्शक होते. त्यांचे पूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मेस्त्री (मिस्त्री) असे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे ३ जून १८९० रोजी झाला. कलामहर्षी म्हणून ते गौरविले जात. प्रतिमाचित्रणातील कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य, विशेषतः पडद्याची कलात्मकता या बाबतीत त्यांनी खूपच लौकिक मिळविला होता. चित्र, शिल्पे इत्यादी कलाक्षेत्रांत त्यांनी स्वाध्यायाच्या बळावरच आपली प्रगती करून घेतली.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्रकारकीर्दीचा हा शब्दरुपी आढावा.
बाबूरावांचा लौकिक चित्रकार म्हणून असला, तरी त्यांना खरीखुरी कीर्ती चित्रपटक्षेत्रातील कामगिरीमुळे लाभली. आपले आतेभाऊ आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी ‘डेक्कन सिनेमा’ सुरू केला, पण तो लवकरच बंद पडला. त्यानंतर सन १९१३ मध्ये त्या दोघांनी बाबूराव रूईकर यांच्यासह ‘महाराष्ट्र सिनेमा’ ही संस्था स्थापन केली, परंतु तीही बंद करून पुढे १ डिसेंबर १९१७ रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि सन १९१९ मध्ये ‘सैरंध्री’ या आपल्या कलात्मक मूकपटाची निर्मिती केली. कल्पकता, भव्यता, स्त्रियांचीच भूमिका असणारे स्त्री पात्र आणि पौराणिक काळातील राजवैभवाचे अपूर्व दर्शन हे या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात ‘सैरंध्री’ प्रदर्शित झाला व लो. टिळकांनी ‘सैरंध्री’ पाहून (८ फेब्रुवारी १९२०) बाबूरावांना ‘सिनेमा केसरी’ या उपाधीने गौरविले. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारे बाबूरावांनी १९२०-३० या दशकात एकूण १७ चित्रपटांची निर्मिती केली. त्यांपैकी वत्सलाहरण (१९२१) व भक्त प्रल्हाद (१९२६) हे पौराणिक, तर सिंहगड (१९२३), कल्याण खजिना (१९२४), सती पद्मिनी (१९२४) व शहाला शह (१९२५) हे ऐतिहासिक आणि सावकारी पाश (१९२५) हा सामाजिक कथानकावरील चित्रपट होय. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लँप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईत प्रेक्षकांची अलोट गर्दी झाल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटांवर करमणूक कर बसविण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी भित्तिपत्रके तयार केली, ती चांगलीच प्रभावी ठरली. त्यांच्या ‘सैरंध्री’ या पहिल्याच चित्रपटातील कीचकवधाचे दृश्य इतके परिणामकारक होते की, ते पाहून काही प्रेक्षक अक्षरशः बेशुद्ध पडले.
वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेयाचे चित्रीकरण सुरू केले, परंतु ६ नोव्हेंबर १९२२ रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला एकाएकी आग लागल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. असे होऊनसुद्धा त्यांनी पुन्हा चित्रपट निर्मिती सुरू ठेवली. कथानकाच्या दृष्टीने योग्य अशी वेशभूषा व वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती. असे असले, तरी त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक होता. बाबूराव आपल्या चित्रपटांत—विशेषतः मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासचित्रणात आपले कलाकौशल्य पणाला लावीत. ‘सैरंध्री’ चित्रपटापासूनच बाबूरावांनी चित्रपटाच्या कथानकाची माहिती देणाऱ्या इंग्रजी, मराठी, हिंदी व गुजराती या भाषांतील सचित्र पुस्तिका प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यांनी तयार केलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्स व बॅनरमध्ये कलात्मकता होती. बाबूरावांना चित्रपटापेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते. पुढे बाबूरावांनी ‘लंका’ (१९३०) या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.
बोलपटाचे युग सुरू झाल्यावर कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोन या संस्थेला बाबूरावांनी सहकार्य केले व तिच्याद्वारे निर्माण झालेले उषा, सावकारी पाश (१९३५) व प्रतिमा तसेच साध्वी मीराबाई (१९३७), रुक्मिणी स्वयंवर (१९४६), लोकशाहीर रामजोशी (१९४७) व विश्वामित्र (१९५२) या बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले. वास्तवतेचे दर्शन केवळ दारिद्र्यातून घडते असे नसून ते वैभवातूनही घडवता येते, हे त्यांनी ‘सावकारी पाश’ या सामाजिक चित्रपटातून दाखवून दिले. तो बोलपट त्याकाळी बराच गाजला. पंडित नेहरूंनीदेखील या बोलपटाची प्रशंसा केली होती. कल्याण खजिना, पद्मिनी व सिंहगड या त्यांच्या मूकपटांनाही युरोपमधील वेम्बले येथील चित्रपटप्रदर्शनात सुवर्णपदके लाभली.
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळक्यांनी घातला असला, तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस्. फत्तेलाल, विष्णुपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला. बाबूरावांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्स व लॅडशियर इत्यादी पाश्चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. शिल्पकलेत मृद्-शिल्पनापासून तर ब्राँझच्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वतःच करीत असत. अशा या दिग्दर्शकाचे १६ जानेवारी १९५४ रोजी कोल्हापूर येथे निधन झाले.
-माहिती स्त्रोत- मराठी विश्वकोश
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment