देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा अल्प परिचय...
चौधरी चरण सिंह यांचा जन्म १९०२ साली २३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९२३मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. १९२५मध्ये आग्रा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या चौधरी चरण सिंह यांनी गाझियाबाद येथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. १९२९मध्ये ते मेरठ येथे आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ते सर्वप्रथम १९३७ मध्ये छपरोली येथून उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले आणि १९४६, १९५२, १९६२ व १९६७ मध्ये त्यांनी विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. महसूल, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य न्याय, माहिती इत्यादी विविध विभागात त्यांनी काम केले. जून १९५१मध्ये त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आणि न्याय व माहिती विभागाचा कार्यभार देण्यात आला.
चौधरी चरण सिंह यांनी विविध पदांवर उत्तर प्रदेश राज्याची सेवा केली. त्यांची ख्याती एका अशा कणखर नेत्याच्या रूपात झाली होती, जे प्रशासनात अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराला अजिबात थारा देत नसत. प्रतिभाशाली खासदार व व्यवहारवादी असलेले चौधरी चरण सिंह आपल्या वक्तृत्व व दृढविश्वासासाठी ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणा कार्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तर प्रदेशातील मंत्र्यांचे वेतन व त्यांना मिळणाऱ्या अन्य लाभांचे प्रमाण बरेच कमी करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून जमीन धारणा कायदा, १९६० बनविण्यामध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा कायदा मालकी हक्कात जमीन राखून ठेवण्याच्या कमाल प्रमाणावर बंधन आणण्याच्या दृष्टीने करण्यात आला होता, जेणेकरून राज्यभरात याला एकसमान बनवता येऊ शकेल.
जानेवारी १९७९ ते जुलै १९७९ या कालावधीत त्यांनी देशाचे उपपंतप्रधानपद, तर जुलै १९७९ ते जानेवारी १९८० या कालावधीत त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. ते देशाचे पाचवे पंतप्रधान होते.
देशात असे निवडक राजकारणी होऊन गेले, ज्यांनी लोकांमध्ये राहून सहजतेने काम करत लोकप्रियता मिळवली. एक समर्पित जनकार्यकर्ता व सामाजिक न्यायावर दृढविश्वास ठेवणाऱ्या चौधरी चरण सिंहांना लाखो शेतकऱ्यांमध्ये राहून आत्मविश्वास मिळाला. त्याने त्यांची ताकद वाढवली. त्यांनी ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिनी, २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.
चौधरी चरण सिंह अत्यंत साधे जीवन जगले. मोकळ्या वेळात ते वाचन व लेखन करत. त्यांनी अनेक पुस्तके व प्रचार-पुस्तिका लिहिल्या. त्यामध्ये ‘जमीनदारी निर्मूलन’, ‘भारतातील गरिबी व त्यावरील उपाय’, ‘शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन’, ‘प्रिव्हेन्शन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग्ज बिलो ए सर्टन मिनिमम’, ‘को-ऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स-रेड’ ही काही प्रमुख आहेत.
२९ मे १९८७ रोजी त्यांचे निधन झाले.
९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment