विदर्भाचे श्रद्धास्थान
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पातूर येथे वसलेले रेणुकामाता मंदिर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. माहूर येथील प्रसिद्ध रेणुकामाता शक्तिपीठाचे प्रतिरूप मानले जात असल्याने हे मंदिर प्रतिमाहूर म्हणून ओळखले जाते. माहूर येथे जाणे शक्य नसलेल्या असंख्य भाविकांसाठी पातूर येथील रेणुकामाता मंदिर हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनले आहे.
सुवर्णा (बोर्डी) नदीच्या किनारी निसर्गरम्य टेकडीवर वसलेले हे मंदिर भक्तांना अध्यात्मासोबतच निसर्गसौंदर्याचाही आनंद देते. रेणुकामाता ही भूदेवीचे स्वरूप मानली जाते. पौराणिक कथांनुसार ती जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामाची माता होती. तिच्या शिरस्वरूपाची पूजा एल्लम्मा म्हणून केली जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी दीनानाथमहाराज कुलकर्णी यांनी येथे देवीचे छोटे मंदिर उभारले. कालांतराने मंदिराचा विस्तार व जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी २५६ पायऱ्या चढाव्या लागतात. या मार्गावर दीनानाथ महाराजांची समाधी, तसेच हनुमान व गणपती यांची मंदिरे भक्तांचे स्वागत करतात.
मंदिरातील रेणुकामातेची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेंदूरचर्चित मूर्ती, मुकुट आणि चांदीचे डोळे यामुळे देवीचे रूप अधिकच तेजस्वी भासते. मुख्य मंदिराव्यतिरिक्त परिसरात महादेव, श्रीराम, श्रीकृष्ण आणि दत्तात्रेय यांची मंदिरे असून संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणाने भारलेला असतो.
टेकडीच्या माथ्यावरून पातूर शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद भक्तांना मिळतो. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक पर्यटनाचेही आकर्षण ठरते. येथील रेणुकामाता नवसाला पावते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. विशेषतः प्रत्येक मंगळवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
शारदीय नवरात्रौत्सव हा या मंदिराचा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, आरत्या आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या काळात मंदिर परिसर भक्तांनी फुलून जातो आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते.
पातूरचे रेणुकामाता मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, विदर्भाची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक बनले आहे. भाविकांच्या अढळ विश्वासामुळे आणि देवीच्या कृपाशीर्वादामुळे हे मंदिर विदर्भातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment