नांदेड जिल्ह्यातील गंगनबीडचे महादेव मंदिर

शिखर शिंगणापूरचे प्रतिरूप

नांदेड जिल्ह्यातील गंगनबीडचे महादेव मंदिर मुख्य फोटो
नांदेड जिल्ह्यातील गंगनबीडचे महादेव मंदिर अतिरिक्त फोटो

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात डोंगरमाथ्यावर वसलेले गंगनबीडचे महादेव मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले हे मंदिर शिखर शिंगणापूरचे प्रतिरूप मानले जाते. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहातील एकाच शाळुंकेत असलेले दोन स्वयंभू लिंगपाषाण. ते शिव-पार्वतीचे प्रतीक आहेत. हेमाडपंती वारसा आणि आधुनिक जीर्णोद्धाराचा संगम असलेल्या या देवस्थानात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. या मंदिरात अन्नदानाचे नवस केले जातात व नवसपूर्तीनिमित्त येथे भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे येथे वर्षभर भंडारा सुरू असतो.

हे हजारो वर्षे पुरातन असलेले प्राचीन देवस्थान सुगाव, निळेगव्हाण व गंगनबीड या तीन गावांच्या वेशीवरील डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. हेमाडपंती शैलीतील दगडी बांधकाम असलेल्या मंदिराची पडझड झाल्यानंतर गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराला आजचे आधुनिक रूप प्राप्त झाले आहे. एकाच शाळुंकेत दोन लिंगपाषाण, म्हणजेच शिव-शंकर रूप असलेली शिवपिंडी ही शिखर शिंगणापूर व गंगनबीड या दोन्ही ठिकाणी आहे. म्हणूनच गंगनबीड येथील मंदिरास शिखर शिंगणापूरचे प्रतिरूप म्हटले जाते. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते, की शंकर आणि पार्वती आकाशगमन करत असताना पार्वतीला हे गिरीमाथ्यावरील सुंदर स्थान खूप आवडले व तिने महादेवांना येथे थांबण्याची इच्छा व्यक्त केली. पार्वतीच्या इच्छेनुसार दोघे या ठिकाणी पिंडी रूपात स्थापित झाले.

नांदेड-हैदराबाद या मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौथऱ्यावर दर्शनी बाजूला नागशिल्प आणि वर प्रत्येकी दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांवरील सज्जावर मेघडंबरीत मध्यभागी शिवपरिवार व त्यांच्या दोन्ही बाजूला सरस्वती व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. मेघडंबरीवर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीतील शिखर व कळस आहेत. या कमानीपासून मंदिर सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी पक्का डांबरी रस्ता, तसेच पायरी मार्गदेखील आहे. एका हातात पर्वत व दुसऱ्या हातात गदा असलेली मारुतीची सुमारे वीस फूट उंच विशाल मूर्ती पायरी मार्गावर आहे.

मंदिराजवळ प्रशस्त वाहनतळ आहे. पुढे मंदिराचे पेव्हर ब्लॉकने आच्छादित केलेले प्रांगण आहे. प्रांगणात जागोजागी आसनांची व्यवस्था केलेली आहे. मंदिरासमोर असलेल्या वृक्षाखाली नंदीची प्राचीन व जीर्ण शिल्पे, तसेच शिवपिंडी आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपात येण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. त्यातील बाह्य बाजूचे स्तंभ कठड्यात आहेत. स्तंभांवर उठाव शैलीतील पर्ण व पुष्पलता नक्षी आहे. कठड्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. स्तंभांवर कणी व त्यावर तुळई आहे. त्यावर छत बसवले आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीच्या पुढ्यात शिवपिंडी आहे. त्यावर छत्र धरलेला तांब्याचा नाग आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे.

पुढे प्राचीन बांधकाम असलेले मंदिराचे अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराला तीन द्वारशाखा आहेत. त्यावर पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. पुढे अरुंद अंतराळ आहे, तर त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर विशाल शाळुंका व त्यावर दोन स्वयंभू लिंगपाषाण आहेत. हे शिव व पार्वती स्वरूप आहेत. लिंगपाषाणावर चांदीचे डोळे लावलेले आहेत आणि जलधारा धरणारी दोन स्वतंत्र अभिषेक पात्रे छताला टांगलेली आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.

मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. त्यातील १८ देवकोष्ठकांत विविध देवता व ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. कठड्यात १८ लघुशिखरे व त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर दाक्षिणात्य स्थापत्यशैलीतील तीन थरांचे शिखर आहे. त्यातील कोनांवर घुमटाकार शिखरांची मंदिरशिल्पे म्हणजेच ‘कूट’ व मध्यभागी आडव्या शिखराची मंदिरशिल्पे म्हणजे ‘शाल’ आहेत. मुख्य शिखरात शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.

मंदिराच्या समोर गणपतीचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या छतावर नंदीशिल्पे, घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. महादेव मंदिरासमोर तटबंदीलगत विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. मंदिरात वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावरील स्तूपिकेवर कळस आहे.

मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात लघुरुद्र, महाअभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी परिसरातील अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावण मास, प्रदोष, अमावास्या आदी दिवशी भाविकांची गर्दी असते. मंदिरात अन्नदानाचे नवस केले जातात व नवस पूर्ण झाल्यावर भाविक मंदिरात भंडारा म्हणजेच अन्नदान करतात. त्यामुळे मंदिरात जवळपास वर्षभर भंडारा सुरू असतो.

कसे जायचे?

नायगाव येथून १० किलोमीटर अंतरावर

नांदेड येथून ३९ किलोमीटर अंतरावर

नायगाव येथून एसटीची सुविधा

खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात

परिसरात निवासाची सुविधा उपलब्ध नाही

Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 03:56 PM News publication time | Views: 928 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 03:56 PM News publication time | Views: 928 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement