भारतीय भौतिकशास्त्रज्ञ देबेंद्र बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त (दोन जून) त्यांच्या कार्याची ओळख...
देबेंद्र मोहन बोस हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. वैश्विक किरण, कृत्रिम किरणोत्सर्ग आणि न्यूट्रॉन भौतिकशास्त्र या क्षेत्रांत त्यांचे योगदान होते. त्यांनी बिभा चौधरी यांच्यासोबत सर्वप्रथम मेसॉनचा शोध लावला आणि ते बोस संस्थेचे सर्वाधिक काळ (१९३८-१९६७) संचालक होते. ज्यांनी भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घातला ते प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे पुतणे म्हणजे देबेंद्र.
देबेंद्र मोहन बोस यांचा जन्म कोलकाता येथे २६ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. ते होमिओपॅथीच्या क्षेत्रात पात्रता मिळवण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या पहिल्या भारतीयांपैकी एक होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर, देबेंद्र यांच्या शिक्षणाची देखरेख त्यांचे काका जे. सी. बोस यांनी केली. बंगाल इंजिनिअरिंग कॉलेज, शिबपूर येथून अभियांत्रिकीची पदवी घेण्याची देबेंद्रची योजना होती; मात्र त्यांना मलेरिया झाल्याने ती अर्धवट राहिली. जे. सी. बोस यांचे जवळचे मित्र, नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना भौतिकशास्त्र शिकण्याचा सल्ला दिला. १९०६मध्ये देबेंद्र बोस यांनी कोलकाता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एमए पदवी मिळवली. ते परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम आले. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून बीए पदवीदेखील मिळवली. त्यांनी एक वर्ष जगदीशचंद्र बोस यांच्या हाताखाली संशोधक म्हणून काम केले. याचदरम्यान त्यांनी जैवभौतिक आणि वनस्पती शरीरशास्त्रीय तपासणीचाही अभ्यास केला.
१९०७मध्ये त्यांनी केंब्रिज येथील क्राइस्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत जे. जे. थॉम व चार्ल्स थॉम, रीस विल यांच्यासह अनेक नामवंत भौतिकशास्त्रज्ञांसोबत काम केले. १९१०मध्ये त्यांनी लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. तिथून त्यांनी १९१२मध्ये भौतिकशास्त्र विषयात पदविका आणि बीएस्सी (प्रथम श्रेणी) पदवी मिळवली. त्यानंतर ते कोलकात्याला परतले आणि १९१३मध्ये त्यांनी कोलकाता येथील सिटी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवले.
१९१४मध्ये डी. एम. बोस यांची नव्याने स्थापन झालेल्या कोलकाता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी घोष प्रवास शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात दोन वर्षे प्रगत भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. बर्लिनमध्ये देबेंद्र यांना प्राध्यापक एरिक रेगनर यांच्या प्रयोगशाळेत नेमण्यात आले. पहिल्या महायुद्धामुळे जर्मनीतील त्यांचा मुक्काम पाच वर्षांपर्यंत वाढला. या काळात त्यांनी एका नवीन प्रकारच्या क्लाउड चेंबरच्या विकासावर काम केले आणि चेंबरमधून वेगाने जाणाऱ्या अल्फा कणांच्या प्रवासादरम्यान निर्माण होणाऱ्या प्रतिक्षेपी प्रोटॉनच्या मार्गांचे छायाचित्रण करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या प्राथमिक संशोधनाचे निष्कर्ष १९१६मध्ये फिझिकालिशे त्साइटश्रिफ्ट या नियतकालिकात प्रकाशित झाले (यावर एक संपूर्ण शोधनिबंध नंतर १९२२ मध्ये त्साइटश्रिफ्ट फर फिझिकमध्ये प्रकाशित झाला.) पीएचडी प्राप्त केल्यानंतर ते मार्च १९१९मध्ये भारतात परतले.
जुलै १९१९मध्ये डी. एम. बोस भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कोलकाता विद्यापीठात पुन्हा रुजू झाले. १९३२मध्ये त्यांनी प्राध्यापक सी. व्ही. रमण यांच्यानंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. इटलीतील कोमो सरोवरावर आयोजित कोमो परिषदेत (११-२० सप्टेंबर १९२७) सहभागी झालेल्या केवळ दोन भारतीय भौतिकशास्त्रज्ञांपैकी ते एक होते. या परिषदेत १४ देशांतील ६० आमंत्रित सहभागी होते, ज्यात ११ नोबेल पारितोषिक विजेत्यांचा समावेश होता. १९३८मध्ये संस्थेचे संस्थापक जे. सी. बोस यांच्या निधनानंतर डी. एम. बोस हे बोस इन्स्टिट्यूटचे संचालक झाले. १९४५मध्ये, बोस यांना सीएसआयआरच्या अणुऊर्जा समितीमध्ये अणुरसायनशास्त्रतज्ज्ञ म्हणून समाविष्ट करण्यात आले. ही समिती नंतर अणुऊर्जा आयोग (एईसी) बनली. १९३८च्या विज्ञान काँग्रेस अधिवेशनादरम्यान झालेल्या एका चर्चेमुळे डी. एम. बोस आणि त्यांच्या सहकारी बिभा चौधरी यांना फोटोग्राफिक प्लेट्स वापरून वैश्विक किरणांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
बोस संस्थेचे संचालक म्हणून डी. एम. बोस यांनी विद्यमान विभागांच्या कार्याचा विस्तार केला आणि सूक्ष्मजीवशास्त्राचा नवीन विभागही सुरू केला. त्यांनी अनेक वर्षे ब्राह्मो समाज संस्थेचे पदाधिकारी (अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार) म्हणून काम केले. ते १९५३मध्ये लखनौ येथे झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेस अधिवेशनाचे महासचिव होते. बोस यांनी १९६७पर्यंत बोस संस्थेचे संचालक म्हणून काम केले. कालांतराने संधिवात आणि इतर आरोग्य समस्यांमुळे त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागली. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात धर्म आणि विज्ञान यांच्यातील संबंधांवर लक्ष केंद्रित करून त्यांना तत्त्वज्ञानात अधिक रस निर्माण झाला. अशा या थोर शास्त्रज्ञाचे दोन जून १९७५ रोजी निधन झाले.
(स्रोत : विकिपीडिया)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment