हिराबाई बडोदेकर

ख्यातनाम शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या जयंतीनिमित्त (२९ मे) त्यांचा कार्यपरिचय...

हिराबाई बडोदेकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका म्हणजे हिराबाई बडोदेकर. त्यांचा जन्म महाराष्ट्रात मिरज येथे २९ मे १९०५ रोजी झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या. ताराबाई बडोदे सरकारच्या सेवेत होत्या. गाण्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या हिराबाईंना लहानपणापासून गाण्याची आवड होती; पण ताराबाईंना आपल्या मुलींनी शिकून समाजात प्रतिष्ठितपणे जगावे असे वाटत होते. कारण त्या काळी घरंदाज मुलींनी गाणे शिकण्याची प्रथा नव्हती. हिराबाईंनी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले; पण त्यांच्या मूळ आवडीप्रमाणे त्या संगीताकडे वळल्या. त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण ताराबाईंकडे आणि मोठे बंधू सुरेशबाबूंकडे झाले. त्यांच्याकडून हिराबाईंना संगीताचे सतत मार्गदर्शन लाभले. कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्यानंतर हिराबाईंना किराणा घराण्याची रीतसर तालीम अब्दुल वहीद खाँ यांच्याकडून १९१८ पासून १९२२पर्यंत मिळाली.

हिराबाईंचे पहिले जाहीर गायन वयाच्या १६व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेमध्ये मुंबईत झाले (१९२१). त्यांचे गाणे लोकांना आवडले व प्रसिद्धीही मिळाली. ताराबाईंनी अर्थार्जनासाठी म्हणून गिरगाव टेरेसेस या इमारतीत नूतन संगीत विद्यालय सुरू केले होते (१९२०). तेथे सुरेशबाबू आणि ताराबाई शिकवत असत. हिराबाईसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. १९२२पासून हिराबाई संगीताच्या व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम करायला सुरुवात केली. १९२३ साली एचएमव्ही (हिज मास्टर्स व्हॉइस) या संस्थेने हिराबाईंची ‘जया अंतरी भगवंत’ ही मराठी भजनांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्याचबरोबर ‘सखी मोरी रुमझुम’ ही हिंदी ध्वनिमुद्रिकाही काढली. ध्वनिमुद्रिकांसाठी आवश्यक असणारे नेमके आणि मर्यादित वेळेत प्रभावीपणे गाण्याचे तंत्र हिराबाईंनी अचूकपणे साधले होते. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना खूप लोकप्रियता व मागणी लाभली. त्यांच्या गायनाच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका निघाल्या. 

त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून १९२८पासून गाण्यास सुरुवात केली. जवळपास ४० आकाशवाणी केंद्रांवरून त्यांचे गाणे प्रसारित होई. आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिका यांतून त्यांचे गाणे सर्वदूर पसरले. पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये हिराबाईंनी पहिला जाहीर संगीत कार्यक्रम केला. स्वत:च कार्यक्रम लावण्यापासून ते जाहिरात करून तिकीटविक्रीपर्यंत सर्व कामे हिराबाई व त्यांच्या भावंडांनी केली. एखाद्या स्त्रीने तिकीट लावून असे कार्यक्रम करणे व त्यात शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करणे ही संकल्पना तेव्हा नवी होती. त्याला विरोधही झाला. तो पत्करून हिराबाईंनी असे कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही यशस्वी केले. ताराबाईंनी नूतन संगीत विद्यालय नाट्यशाखा या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली (१९२९). या नाटक मंडळीच्या सौभद्र या नाटकातून हिराबाईंनी सुभद्रेची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले (५ सप्टेंबर १९२९). यातील त्यांनी गायलेली गाणी गाजली. यानंतर साध्वी मीराबाई (लेखक – स. अ. शुक्ल), संशयकल्लोळ, युगांतर (लेखक – ना. सी. फडके), पुण्यप्रभाव, विद्याहरण, तसेच जागती ज्योत (मामा वरेरकर), स्त्री-पुरुष (लेखक – न. ग. कमतनूरकर) इत्यादी नाटकांतूनही भूमिका केल्या. नंतर ही नाट्यसंस्था बंद पडली. 

त्यानंतर रंगभूमीवर १९६५पर्यंत अधूनमधून त्या भूमिका करत राहिल्या. हिराबाईंनी चित्रपटातही भूमिका केल्या. मो. ग. रांगणेकर यांच्या सुवर्ण मंदिर (१९३४), बाबूराव पेंटर यांच्या प्रतिभा (१९३७) व नंतर रवींद्र चित्रच्या संत जनाबाई (१९३८) यांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. अनेक चित्रपटांकरिता पार्श्वगायनही केले. त्यांनी १९४९मध्ये गाण्यासाठी आफ्रिकेचा दौरा केला. तसेच भारतीय शिष्टमंडळाबरोबर १९५३मध्ये त्यांनी चीनचा दौरा केला.

कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांना गाण्याचे आमंत्रण मिळाले (१९३७). जालंधरला दर वर्षी हरिवल्लभ मेळा भरत असे, या मेळ्यात गाणाऱ्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या (१९४१). त्यांनी संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी विविध प्रसंगी संगीताचे कार्यक्रम केले. विविध संगीत परिषदांमध्ये त्यांनी सातत्याने गायनाचे सादरीकरण केले. उस्ताद अब्दुल करीमखाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य संगीत महोत्सवात ८ डिसेंबर १९७३ रोजी गाणे सादर केले. त्यानंतर त्यांनी गायनाच्या जाहीर कार्यक्रमांतून निवृत्ती स्वीकारली; पण त्यांच्या संगीताच्या तालमी चालू राहिल्या. 

हिराबाईंनी अनेक गानप्रकार गायले. रागसंगीताबरोबरच नाट्यपदे, ठुमरी, भावपदे, भजन, अभंग त्या आवर्जून गात असत. त्यांनी गाण्यातून भावनिकता आणि वैचारिकता यांचा सुरेख मेळ साधून ते संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. अत्यंत तलम, रेशमी, सुरेल आलापी आणि तारषड्जाचा हमखास प्रभावी लगाव ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होती. सोज्वळपणा व शालीनता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांच्या गाण्यातही आविष्कृत होत असे. शांत व संयमी भाव हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होते. हिराबाईंनी स्त्रियांच्या गायनाच्या सादरीकरणाला शालीनता, शिस्त, प्रतिष्ठितपणा आणि भारदस्तपणा प्राप्त करून दिला. ज्या काळी हिराबाई मैफली करत असत, त्या काळी गाण्याच्या बैठकी सर्वसाधारणपणे राजदरबारी किंवा एखाद्या धनिकाकडे, इनामदाराकडे वा जमीनदाराकडे खासगी स्वरूपाच्या होत असत. इतर गायनाचे कार्यक्रम मुख्यत: कलावंतिणींचे असायचे. त्यात अदाकारीला महत्त्व होते. त्यामुळे या सादरीकरणात काही अनिष्ट प्रथाही रूढ झाल्या होत्या. हिराबाईंनी मात्र आपल्या मैफलींत बैठकीवर बसून शांतपणे, हातवारे न करता, शिस्तीने आणि भारदस्तपणे गाण्याचे सादरीकरण करण्याचा पायंडा पाडला आणि स्त्रियांचे गाणे गंभीरपणे, रसास्वद घेत, स्वरानंद अनुभवत ऐकण्याची सवय श्रोत्यांना लावली. 

हिराबाईंना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. किर्लोस्कर थिएटरतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर चुनीलाल मेहता यांनी त्यांना ‘गानहिरा’ या पदवीने गौरवले. मुंबई आकाशवाणीने त्यांना १५ ऑगस्ट १९४७ या देशाच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी नाट्यपरिषदेने बालगंधर्व सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला (१९६६). त्यांना भारत सरकारने पद्मभूषण किताबाने गौरवले (१९७०). त्या विष्णुदास भावे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या (१९७४). कोलकात्याच्या आयटीसी संगीत रिसर्च अकादमीने त्यांचा सन्मान केला. २० नोव्हेंबर १९८९ रोजी वयाच्या ८४व्या वर्षी पुणे येथे हिराबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. या थोर गायिकेला शतश: नमन!

(स्रोत : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 204 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 204 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement