पुरातत्त्वज्ञ देवदत्त भांडारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त (३० मे) त्यांचा कार्यपरिचय...
देवदत्त भांडारकर हे प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे व्यासंगी संशोधक व पुरातत्त्वज्ञ होते. श्रेष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे त्यांचे वडील होते. देवदत्त यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. डेक्कन कॉलेजातून १८९६ मध्ये बीए झाल्यावर कायद्याचा अभ्यास करत असताना मुंबई विद्यापीठासाठी ‘पूर्व-मुसलमान काळातील (इ. स. १००० पर्यंत) महाराष्ट्रातील प्राचीन ग्रामांचे आणि नगरांचे संक्षिप्त पर्यालोचन’ या विषयावर त्यांनी निबंध लिहिला. त्याला भगवानलाल इंद्रजी पारितोषिक मिळाले. त्यानंतर थोरल्या भांडारकरांच्या आदेशाप्रमाणे संस्कृत, प्राचीन भारतीय इतिहास आणि पुराभिलेख हे विषय घेऊन त्यांनी एमएची पदवी मिळवली (१९००). एमएनंतर भारताच्या जनगणना खात्यात त्यांनी काम केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे लक्ष देवदत्त यांच्या नवीन संशोधनाकडे वळले. परंतु मोठ्या पगाराची नोकरी नाकारून देवदत्त यांनी १९०४ ते १९०७ या काळात मुंबई मंडलाच्या पुरातत्त्व विभागात सहायक सर्वेक्षक हे पद स्वीकारले. १९१५च्या ऑगस्टमध्ये पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडलाचे ते अधिकारी झाले. पुढे १९१७ साली कोलकाता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३६मध्ये निवृत्त होईपर्यत हे पद त्यांनी समर्थपणे सांभाळले.
अधिकार किंवा द्रव्यप्राप्ती यांचा लोभ नसलेला हा विद्वान इतिहासाने झपाटलेला, पुराभिलेख आणि नाणकशास्त्र यांत निष्णात असा अधिकारी होता. एमएसाठी गुजरात राष्ट्रकूट युवराज पहिला कर्क्क याच्या नवसारी ताम्रपटावर (इ. स. ७३८) आणि कुशाण शिलालेखावर त्यांनी केलेले संशोधन, शक काळाचा उगम आणि कुशाण राजपरंपरा यांविषयीचे त्यांचे निष्कर्ष फ्रेंच विद्वान बार्थ आणि वडील डॉ. रा. गो. भांडारकर यांनाही पसंत पडले. जनगणना खात्यात काम करत असताना ‘धर्म आणि धर्मपंथ’, ‘जाती आणि जमाती’ ही प्रकरणे लिहिण्यास त्यांनी एंथोवन (आयसीएस) यांना मदत केली. मुंबईच्या सर्वेक्षण विभागात असताना ‘अहीर’ जमातीवर टिपण लिहून त्यांनी आपल्या स्वतंत्र संशोधन-लेखनाचा आरंभ केला. याच वेळी महेंद्रपाल आणि विनायकपाल यांचे शासन, गुर्जर राज्याचा तत्कालीन विस्तार आणि राजवटीचा कालानुक्रम यांवर लेख प्रसिद्ध करून तोवर अज्ञात असलेला इतिहास प्रकाशात आणला. मिहिर-भोजाच्या ग्वाल्हेरच्या अभिलेखाचे अचूक वाचन करुन त्यांनी कालनिर्णय केला. तो कीलहोर्नने आपली चूक कबूल करून स्वीकारला. मुंबई मंडलात सर्वेक्षक म्हणून काम करत असता, त्यांनी राजपुतान्यात दौरा करून पुरातत्त्वीय सामग्रीची यादी आणि टिपणे तयार केली. पाशुपत पंथाचा संस्थापक लकुली (श) यावरील त्यांचे संशोधन आणि निष्कर्ष तर त्यांच्या वडिलांच्याही कामी आले. १९१५मध्ये राजपुतांची सर्वश्रेष्ठ जमात ‘गुहिलोत’ याविषयी त्यांनी केलेल्या संशोधनाचे, तसेच ‘हिंदू लोकसमाजातील परदेशीय अंश’ या लेखात त्यांनी दिलेल्या माहितीचे ऐतिहासिक मोल मोठे आहे.
बादशहा पाचवे जॉर्ज पाच डिसेंबर १९११ रोजी भारतात आले, त्या वेळी त्यांच्यासाठी एलिफंटा (घारापुरी) बेटाची मार्गदर्शिका देवदत्तांनी तयार केली. अखंड शिळेतून एकसंघ कोरून काढलेल्या त्रिमूर्ती-मंदिराचे वैशिष्ट्य त्यात स्पष्ट केले आहे. देवदत्त भांडारकर यांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशाजवळील बीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खाम् बाबा पिलर’ हा गोलाकार स्तंभ. ग्रीक राजदूत हीलिओडोरस याने आपल्या वासुदेवभक्तीचे आदरचिन्ह म्हणून हा स्तंभ उभारला. तो दोन पोलादी पट्ट्यांवर उभा आहे. आजूबाजूचे बांधकाम पक्क्या विटांचे, चुनखडीच्या गिलाव्याचे आहे. देवदत्त यांनी पोलादाचा नमुना शेफील्डला पाठवून आणि चुनखडीच्या मिश्रणाची परीक्षा पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मॅन यांच्याकडून करवून घेऊन इ. स. पू. १२५मध्ये म्हणजे मौर्य काळात अस्सल पोलाद, चुना-चुनखडीचा गिलावा आणि पक्क्या भाजलेल्या विटा यांचा बांधकामासाठी उपयोग होत असल्याचे सिद्ध करून दाखवले.
कोलकाता विद्यापीठात अध्यापन-संशोधन, अभ्यासक्रमाची आखणी, शासकीय व्यवस्थापन इत्यादी कार्य करत असताना देवदत्त यांनी व्याख्यानमाला सुरू केली. या मालेत त्यांनी ‘प्राचीन भारतातील राजपद आणि प्रजातांत्रिक संस्था’ (१९१८), ‘भारतीय नाणकशास्त्र’ (१९२१), ‘अशोक’ (१९२३) या विषयांवर व्याख्याने दिली. १९२५मध्ये बनारस हिंदू विद्यापीठात ‘प्राचीन हिंदू राजनीतीचे काही पैलू’ या विषयावर मणिचंद्र नंदी व्याख्याने दिली. सेवानिवृत्तीनंतर १९३८-३९ मध्ये मद्रासला ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे काही पैलू’ या विषयावर व्याख्याने दिली. प्राग्-मौर्य काळातील संस्कृती, प्राचीन आणि आधुनिक शैव पंथ याचा संबंध यांवर त्यांत विवेचन आहे. सेवानिवृत्तीच्या काळात भारतीय अभिलेखांची यादी आणि गुप्त अभिलेखांची दुसरी सुधारित आवृत्ती त्यांनी तयार केली.
रॉयल एशियाटिक सोसायटीचे (बंगाल आणि लंडन) सदस्यत्व (१९१२), कलकत्ता विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट (१९२१), बंगाल रॉयल एशियाटिक सोसायटीचे बिमलचरण लॉ सुवर्णपदक इत्यादी बहुमान त्यांना लाभले. कल्चरल कॉन्फरन्स, कलकत्ता (१९३६), हिस्ट्री कॉंग्रेस, अलाहाबाद (१९३९) यांची अध्यक्षपदे, तसेच ‘इंडियन अँटिक्करी’चे संपादकत्व (१९११-१९२२), विविध संशोधन संस्थाचे सन्मान्य सदस्यत्व, विद्यापीठांच्या व्याख्यानांची आमंत्रणे असे विविध क्षेत्रातील अनेक सन्मान त्यांना लाभले. ३० मे १९५० रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.
(स्रोत : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment