पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त (३१ मे) त्यांच्या कार्याची ओळख...
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला. सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेप्रति असलेल्या समर्पणासह, त्यांच्या विलक्षण नेतृत्वगुणांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी धार्मिक सलोख्याला सक्रियपणे प्रोत्साहन दिले आणि आपल्या प्रजेमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अधिक न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी अस्पृश्यता आणि हुंडा प्रथा यांसारख्या सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. याव्यतिरिक्त अहिल्याबाई होळकर यांनी सामाजिक प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या हानिकारक प्रथांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रजेबद्दलची त्यांची गाढ करुणा आणि सामाजिक सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे, भारतीय इतिहासात एक दूरदर्शी आणि दयाळू शासक म्हणून त्यांना एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
बाजीराव पेशव्यांच्या सैन्यातील एक सेनापती आणि माळव्याचे शासक मल्हारराव होळकर हे पेशव्यांबरोबर पुण्याला जात असताना चौंडी येथे थांबले असता त्यांना चुणचुणीत अहिल्या शिवलिंगाची पूजा करताना आढळली. मल्हाररावांच्या मुलासाठी, खंडेरावासाठी ही मुलगी योग्य आहे असे बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांना सुचवले आणि त्याप्रमाणे तिच्यासाठी माणकोजी शिंदे यांच्याकडे मागणी घातली आणि १७३३मध्ये तिचे वयाच्या आठव्या वर्षी खंडेरावाशी लग्न झाले. १७४५मध्ये मालोजी हा मुलगा आणि १७४८मध्ये मुक्ताबाई ही मुलगी त्यांना झाली. १७५४मध्ये कुम्हेरच्या लढाईत तोफांच्या गोळीबारात खंडेरावांचा मृत्यू झाला. त्या वेळी अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु सासर्यांनी तिला विनवणी केली, की 'माझा मुलगा मला सोडून गेला. आता तूही मला अथांग सागरात बुडवून जाणार का?' मल्हाररावांच्या विनवणीमुळे तिने जगणे पसंत केले आणि तेव्हापासून सुनेला मुलगा मानून मल्हाररावांनी तिच्या नेतृत्वगुणांना वाव दिला. मल्हारराव होळकर त्यांचे राजकीय गुरू झाले. मल्हारराव ज्या ज्या वेळी बाहेर जात, तेव्हा सर्व राज्यकारभार अहिल्याबाईंवर सोपवून जात. त्यांच्या सासूबाई गौतमाबाई यांनी तिला गृहशिक्षणाबरोबर प्रशासनाचे, राजकारणाचे प्रशिक्षण दिले. १७५९मध्ये त्यांची जमीन त्यांना अनुदान म्हणून दिली. गौतमाबाईंच्या काळात पतीच्या कमाईतील एक अष्टमांश भाग स्त्रियांकडे दिला जात असे. गौतमाबाईंकडून हा वारसा अहिल्याबाईंकडे आला.
अहिल्याबाई उत्कृष्ट राज्यशासक होत्या. त्या अचूक न्यायदान करत. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायालये स्थापन करून त्यावर योग्य न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या होत्या. गावोगावी पंचायती स्थापन करून त्यांना न्यायदानाचे अधिकार दिले. अहिल्याबाईंच्या कडक नियंत्रणाखाली ही न्यायालये व पंचायती न्यायदानाचे काम उत्तम रीतीने करत होती. एका नजरेत हिशेब करण्यात त्या तरबेज होत्या. ज्याप्रमाणे आपल्या प्रजेवर त्या अन्याय होऊ देत नसत, त्याचप्रमाणे सरदारांना त्या आपल्या राज्याचे महत्त्वपूर्ण घटक मानत. युद्धाच्या वेळी स्वत: त्या रणांगणावर उतरत. तोफा ओतणे, जम्बुरीच्या गोळ्या तयार करणे, तीरबाजी यांचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्यही त्यांनी प्राप्त केले होते. त्यांनी स्त्रियांचे स्वतंत्र सैन्यदल उभारले होते.
अहिल्याबाईंनी शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महापूर, दुष्काळ, टोळधाड इत्यादी कारणांमुळे पिकांची हानी झाल्यास त्या आपल्या प्रजेला शेतसार्यात सूट देत असत. ज्यांच्याकडे सुपीक किंवा नापीक जमीन असेल, त्यांच्याकरिता वेगवेगळ्या योजना राबवल्या. शेतकर्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून दिल्या. त्यांनी आपल्या राज्यात बटाई महसुलाची निश्चिती केली असली, तरी वाजवीपेक्षा जास्त महसूल कधी घेतला नाही. कमी करयोजनेमुळे प्रजा व शेतकरी सुखी होते. त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कधीच दुष्काळ पडला नाही. वृक्षारोपण करताना रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर कोणते वृक्ष असावेत आणि शेतात कोणते वृक्ष लावावेत याबद्दलही त्या शेतकर्यांना मार्गदर्शन करत. त्या काळात भिल्ल लोक त्यांच्या डोंगरवस्तीतून जाणार्या वाटसरूंना, व्यापार्यांना, यात्रेकरूंना लुटायचे काम करत असत. ही गोष्ट जेव्हा अहिल्याबाईंच्या लक्षात आली त्या वेळी त्या गुन्हेगारांना (भिल्लांना) शासन न करता व्यापार्यांकडून कर वसूल करण्यास त्यांनी परवानगी दिली. त्यामुळे त्या भिल्लांनाही उत्पन्नाचे साधन मिळाले आणि अशा प्रकारे त्यांना राज्याचे रक्षक बनवले. गुन्हेगारी कमी झाली आणि व्यापार्यांनाही संरक्षण मिळाले. या कराला 'भिलकवडी कर' असे म्हणत.
अहिल्याबाईंनी उद्योगांना गतिमानता दिली. हस्तोद्योग, गृहउद्योग यामध्ये तेव्हापासून काही घराणी त्या कामात आहेत. त्या वेळी स्त्रियाही या उद्योगात होत्या. महेश्वरला साड्यांची निर्मिती सुरू केली व तेथे त्यांनी बाजारपेठ भरवली होती. आजही महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत. अहिल्यादेवींनी ठिकठिकाणी नदीघाट, देवळे, धर्मशाळा, विहिरी, बारवा, रस्ते, वाडे, स्त्रियांसाठी ओवर्या बांधल्या. शंभरहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. त्यांनी सुरू केलेले अन्नछत्र आणि पाणपोया आजही सुरू आहेत. अनेक बारवा लोकांची, पशूपक्ष्यांची आणि शेतीची पाण्याची गरज भागवत आहेत. गायीगुरांसाठी त्यांनी कुरणे राखून ठेवली होती. गोसेवा केल्याशिवाय त्या अन्नग्रहण करत नसत. केदारनाथ ते रामेश्वर आणि सोमनाथपासून पुरीपर्यंत रस्त्यांचे काम त्यांनी केले. त्यांनी त्या काळात संपूर्ण भारत जोडण्याचे काम केले.
अत्यंत अचूक पद्धतीने उद्याची बेगमी करायची असेल, तर राष्ट्रजोडणी आवश्यक आहे हा अहिल्याबाईंचा विचार खरोखरच स्तुत्य आहे. चांदवड, इंदोर, महेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांनी टाकसाळ सुरू केली. त्यांच्या काळात प्रामुख्याने तांब्याची व चांदीची नाणी पाडली जात. त्यावर चंद्र-सूर्याचा मुखवटा, गव्हाची ओंबी, शिवलिंग, बेलपत्र अशी चित्रे असत. होळकरांच्या दौलतीचे व खासगी जहागिरीचे अधिकारी निरनिराळ्या प्रांतात कार्यरत होते. त्यांना वेळेवर आदेश पोहोचावेत, तसेच आपल्या प्रजेची सुखदुःखे कळावी, इतर राज्यकर्त्यांशी संपर्क साधता यावा, या अनेक कारणांसाठी अहिल्याबाईंनी डाक व्यवस्थेत नव्याने रचना केली. पुणे ते महेश्वर नित्य स्वरूपाची डाक व्यवस्था होती. इतर डाक व्यवस्था नैमित्तिक स्वरूपाची होती. त्या वेळी हरकारा, स्वार यांना पाठवून आपल्या आज्ञा किंवा पत्रे त्या पाठवत. त्यांची प्रशासन व्यवस्था चोख होती. आलेल्या दिवशीचा प्रत्येक पत्रव्यवहार त्या रात्र रात्र जागून पूर्ण करत.
त्यांनी हुंडाबंदीचा कायदा केला. तसेच विधवांसाठी वारसा हक्क व दत्तक घेण्याचा अधिकार कायद्याद्वारे मिळवून दिला. अहिल्याबाईंची ग्रंथसंपदा मोठी होती. त्यांनी 'अहिल्याकामधेनू' ग्रंथाची निर्मिती केली. विद्या, कला व त्यांचे प्रणेते यांचा कोश त्यांनी बनवला. महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरू केली. अहिल्याबाईंकडे अनेक विद्वान मंडळी, वैद्य, कीर्तनकार, कवी येत असत. अशा विद्वानांना त्या आपल्या दरबारात राजाश्रय देत असत. मोरोपंत, कवी आर्यकार, अनंत फंदी यांना त्यांनी आपल्या दरबारात राजाश्रय दिला होता.
अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईंचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला, तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले. मध्यम उंचीच्या, सावळ्या वर्णाच्या, डोईवर पदर घेतलेल्या अहिल्याबाई यांचे कर्तृत्व आणि विचार हे मात्र कितीतरी उंचीचे होते. १३ ऑगस्ट १७९५मध्ये महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. अशा या थोर मातृशक्तीला शतश: प्रणाम!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment