गॅस गळती होतेय? घाबरू नका! १९०६ हेल्पलाइनमुळे तातडीने उपलब्ध होते मदत

आठवड्याचे सर्व दिवस २४ तास सेवा उपलब्ध

गॅस गळती होतेय? घाबरू नका! १९०६ हेल्पलाइनमुळे तातडीने उपलब्ध होते मदत मुख्य फोटो
मुख्य फोटो

घरामध्ये एलपीजी गॅसचा वापर ही आज प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाची महत्त्वाची गरज बनली आहे; मात्र गॅस गळतीसारखी घटना घडल्यास ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा वेळी घाबरून जाणे साहजिक आहे. तसेच सुट्टीचा दिवस असल्यास गॅस एजन्सी बंद असते. अशा वेळी काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सुरू केलेली १९०६ ही फक्त गॅस गळतीशी संबंधित आपत्कालीन हेल्पलाइन नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.

१९०६ हा एलपीजी गॅस गळतीसाठीचा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक असून, तो आठवड्याचे सर्व दिवस २४ तास कार्यरत असतो. इंडियन ऑइल, भारत गॅस आणि एचपी गॅस अशा सर्व गॅस कंपन्यांच्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येतो. गॅस सिलिंडरमधून वास येणे, रेग्युलेटरमध्ये बिघाड होणे किंवा गॅस पाइपमधून गळती होण्याचा संशय आल्यास ग्राहकांनी तातडीने या क्रमांकावर संपर्क साधावा.

ही बहुभाषिक एलपीजी आपत्कालीन हेल्पलाइन असून, गॅस गळतीसंदर्भातील आपत्कालीन तक्रारी तत्काळ हाताळण्यासाठी विशेष कॉल सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या कॉल सेंटरमध्ये वेब-आधारित प्रणालीचा वापर केला जातो. त्याद्वारे तक्रारींची नोंद, निरीक्षण, कॉल लॉग तपासणी, तसेच तंत्रज्ञ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संपर्क माहिती अद्ययावत ठेवली जाते.

या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित तंत्रज्ञ शक्य तितक्या तातडीने ग्राहकाच्या घरी पाठवला जातो. सिलिंडरमधील वॉशर, रेग्युलेटर किंवा इतर तांत्रिक अडचणी तपासून समस्या दूर करण्यात येते. सिलिंडरशी संबंधित काही दोष विनामूल्य दुरुस्त केले जातात; मात्र ग्राहकाकडील गॅस पाइप किंवा शेगडीमध्ये बिघाड असल्यास त्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते.

गॅस गळती झाल्याचा संशय आल्यास काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम रेग्युलेटर बंद करावा. घरातील दरवाजे आणि खिडक्या उघडून हवा खेळती ठेवावी. कोणतेही इलेक्ट्रिक स्विच चालू किंवा बंद करू नयेत. तसेच आग, अगरबत्ती किंवा कोणत्याही ठिणगीपासून दूर राहावे.

याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ हा एल्डरलाइन हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध आहे. आपत्कालीन मदत, मार्गदर्शन आणि विविध सेवांसाठी या क्रमांकाचा उपयोग होतो.

आपत्कालीन परिस्थितीत योग्य माहिती आणि तत्काळ कृती अनेकदा मोठा धोका टाळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने १९०६ हा गॅस गळती हेल्पलाइन क्रमांक लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 25-05-2026 News publication date | Time: 01:15 PM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 25-05-2026 News publication date | Time: 01:15 PM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement