अण्णासाहेब पाटील महामंडळाची आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा

लाभार्थ्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी वेबसाइटवर व्यवसायवर्धन हा टॅब

अण्णासाहेब पाटील महामंडळाची आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा मुख्य फोटो
मुख्य फोटो

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक, तसेच गट कर्जयोजना राबवण्यात येतात. त्या लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.

लाभार्थ्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अर्जाची स्थिती, मार्गदर्शन व तांत्रिक साह्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेवा 'वन क्लिक इन्फॉर्मेशन' या संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आल्या असून, लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाशी संबंधित माहिती व विविध प्रक्रियांची स्थिती आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून तात्काळ प्राप्त होणार आहे.

पुढील सेवा उपलब्ध

8976855921 या क्रमांकावर Hi असे लिहिल्यास मेनू पर्याय उपलब्ध होतील. या पर्यायानुसार खाली दिलेले पर्याय समोर येतील. त्यापैकी संबंधित पर्यायाची निवड करून पुढे जावे. महामंडळ व योजनांची माहिती, नवीन नोंदणीसंदर्भातील मार्गदर्शन, पात्रता प्रमाणपत्र (LOI) स्थिती व डाउनलोड सुविधा, बँक कर्ज मंजुरी (Sanction) स्थिती, व्याजपरतावा दावा (Claim) स्थिती. यामध्ये तांत्रिक अडचणी नोंदवणे व त्याच्याशी संबंधित तिकीट जनरेशन सुविधा उपलब्ध आहे.

या सर्व सेवा OTP आधारित सुरक्षित पडताळणी करून लाभार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत. स्वयंनोदणी, LOI, बँक मंजुरी व व्याजपरतावा दाव्याकरिता मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप बॉटमध्ये उपलब्ध असून, संपर्क माहितीदेखील एका क्लिकवर प्राप्त होणार आहे. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांच्या कार्यालयीन भेटी कमी होऊन ऑनलाइन सुविधेमुळे अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व गतिमानता येईल. शिवाय, लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती एकाच चॅटमध्ये उपलब्ध होत असल्याने वेळ व खर्चाची बचत होणार आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांचे अनधिकृत एजंटवरील अवलंबित्व कमी होईल. महामंडळातर्फे यापूर्वीच लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकृत मोबाइल अ‍ॅपदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने घ्यावा, यासाठी या सुविधा लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अधिक सोयीसाठी महामंडळाच्या वेबसाइटवर लाभार्थ्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी व्यवसायवर्धन हा टॅब सुरू करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना त्यांची उत्पादने व सेवा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने महामंडळाच्या प्रणालीवर प्रसिद्ध करावीत. त्यामुळे त्यांच्या सेवा व उत्पादनांची माहिती अधिकाधिक ग्राहकांपर्यत पोहोचेल. याच माध्यमातून लाभार्थ्यांना विक्री व खरेदीचे व्यासपीठ तयार करण्याची म्हणजेच ई-मार्केटप्लेसची सुविधा भविष्यात उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ पयत्नशील आहे. यामुळे लाभार्थ्याच्या व्यवसयात वृद्धी होण्यास मदत होईल.

भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनच LOI अर्जप्रक्रिया उपलब्ध करून देण्याबबत महामंडळ स्तरावर कार्यवाही सुरू असून, लाभार्थ्यांना अधिक सुलभ व गतिमान सुविधा देण्याचा महामंडळचा पयत्न आहे. सर्व लाभार्थ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट व मोबाइल अ‍ॅपचा वापर करून डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्दिष्टे

शासन निर्णय क्र. अपाम १९९८/प्र.क्र. ३६३/रोस्व - १, दिनांक २७ नोव्हेंबर १९९८च्या अन्वये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत करण्यात आली आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून राबवण्यात आलेल्या योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी होत्या. तथापि, मंत्रिमंडळ उपसमितीचा (सन २०१८) निर्णय आणि संचालक मंडळाच्या ठरावानुसार, महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना प्रामुख्याने मराठा समाजासाठी, तसेच राज्यात ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केलेले नाही अशा समाजांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. शेतीला पूरक उद्योग, लघुउद्योग, वाहतूक, प्रक्रिया, विपणन, पुरवठा व साठवणुकीसाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून देणे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा आर्थिक स्तर उंचावणे. मराठा समाजातील युवकांचा औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील सहभाग वाढवणे, ही या महामंडळाची उद्दिष्टे आहेत.

संकेतस्थळ :https://udyog.mahaswayam.gov.in

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 22-05-2026 News publication date | Time: 10:44 AM News publication time | Views: 458 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 22-05-2026 News publication date | Time: 10:44 AM News publication time | Views: 458 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement