नेहा नारखेडे

तंत्रज्ञान क्षेत्रात स्वकर्तृत्वावर मोठी प्रगती केलेली उद्योजिका

नेहा नारखेडे मुख्य फोटो
मुख्य फोटो

आता भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उद्योजक म्हणजे नेहा नारखेडे. या भारतीय वंशाच्या उद्योजिकेची जगातील सर्वांत यशस्वी महिलांमध्ये गणना केली जाते. जाणून घेऊ या नेहाच्या या अफलातून प्रवासाची माहिती...

अलीकडेच फोर्ब्ज मासिकाने अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत सेल्फ मेड अर्थात स्वकर्तृत्वावर मोठ्या झालेल्या महिलांच्या यादीत नेहा नारखेडेला स्थान दिले आहे. नेहाची एकूण संपत्ती ५२० दशलक्ष डॉलर म्हणजे तब्बल ४२ हजार कोटी रुपये असून, ती कॉन्फ्लुएंट या क्लाउड सेवा पुरवणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीची सहसंस्थापक आणि बोर्ड सदस्य आहे. कॉन्फ्लुएंटचे मूल्य ९.१ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ७५ हजार कोटी रुपये असून, नेहाची कंपनीत सहा टक्के हिस्सेदारी आहे. नेहा नारखेडेचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात झाले. २००६मध्ये ती मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेला गेली. तिथे तिने दोन वर्षे ओरॅकलमध्ये टेक्निकल स्टाफ म्हणून काम केले. यानंतर तिने लिंक्डइनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही अनुभव घेतला आणि चमकदार कामगिरी करून तिने अवघ्या एका वर्षात वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता पद मिळवले. यानंतर तिला वर्षभरासाठी प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून बढती मिळाली आणि एका वर्षानंतर ती लिंक्डइनमध्ये स्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लीड बनली. 

लिंक्डइनमध्ये असताना नेहा आणि तिच्या टीमने एक ओपन सोर्स मेसेजिंग सिस्टीम विकसित केली. ती एका साइटचा डेटा हाताळण्यासाठी डिझाइन केलेली होती. २०१४ साली नेहा आणि तिच्या लिंक्डइन कंपनीतील सहकर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आणि एकत्र येऊन काहीतरी नवीन करण्याचा निर्धार केला. त्यांनी मिळून ‘कॉन्फ्लुएंट’ही कंपनी सुरू केली. ही कंपनी क्लाउड क्षेत्रात असून, कंपन्यांना मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया करण्यास मदत करते. 

नेहा पाच वर्षे कंपनीची मुख्य तंत्रज्ञान आणि उत्पादन अधिकारी होती. सध्या ती कंपनीच्या संचालक मंडळाची सदस्यआहे. नेहाने २०२१मध्ये ‘ऑसिलर’ ही कंपनी सुरू केली. ही कंपनी फसवणूक शोधण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ती खात्याचे संरक्षण, त्वरित क्रेडिट निर्णय, पेमेंट संरक्षण, अंडररायटिंग आणि अशा बऱ्याच विषयांत कार्यरत आहे. तिने जवळपास १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि सध्या या कंपनीच्या सीईओ पदावर ती कार्यरत आहे. 

या सगळ्या यशाचे श्रेय नेहा आपल्या वडिलांना देते. तिचे वडील तिचे सर्वांत मोठे प्रेरणास्थान आहेत. तिचे वडील तिला लहानपणी पुस्तके आणायचे आणि यशस्वी महिलांच्या कथा, माहिती नेहाला द्यायचे. त्यामुळे तिलाही आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षण घेऊन नेहाने नोकरी केली आणि नंतर पुन्हा मागे वळून बघितले नाही. २०१७मध्ये एमआयटी टेक्नॉलॉजी कंपनीने तिला ३५ वर्षांखालील एक सर्वोत्कृष्ट इनोव्हेटर म्हणून सन्मानित केले होते. २०१८मध्ये टेक बाय फोर्ब्जच्या जगातील सर्वोत्कृष्ट प्रभावशाली ५० महिलांच्या यादीमध्ये तिच्या नावाचा समावेश होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या ओरॅकल कोड कॉन्फरन्समध्ये नेहाने ओरॅकल ग्राउंड ब्रेकर पुरस्कार मिळवला होता. नेहासारख्या स्त्रीशक्तीची माहिती घेतल्यावर एक लक्षात येते, ते म्हणजे आत्मविश्वास, सतत प्रगती करण्याची जिद्द आणि कठोर मेहनत यांमुळे कोणतेही ध्येय गाठणे असाध्य वाटत नाही. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words