रा. श्री. जोग

श्रेष्ठ मराठी समीक्षक रा. श्री. जोग यांच्या जन्मदिनानिमित्त (१५ मे) त्यांचा अल्प परिचय...

रा. श्री. जोग मुख्य फोटो
मुख्य फोटो

रामचंद्र श्रीपाद जोग हे एक श्रेष्ठ मराठी समीक्षक होते. त्यांचा जन्म १५ मे १९०३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन ते मुंबई विद्यापीठाचे बीए (१९२३) व एमए (१९२५) झाले. एमएला संस्कृतची भगवानदास पुरुषोत्तम शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. १९२६–६३ या काळात नाशिकमधील हं. प्रा. ठा. कॉलेज, सांगलीतील विलिंग्डन कॉलेज व पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे संस्कृत व मराठी या विषयांचे ते प्राध्यापक होते. त्यांनी ‘निशिगंध’ या टोपण नावाने कवी म्हणून साहित्यक्षेत्रात प्रथम पदार्पण केले. ज्योत्स्नागीत (१९२६) व निशागीत (१९२८) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. सरल भावाविष्कार हे त्यांतील कवितांचे वैशिष्ट्य. पुढे मात्र त्यांनी साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच आपले कार्यक्षेत्र मानले. अभिनव काव्यप्रकाश (१९३०) या ग्रंथात संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा हा पहिलाच सुव्यवस्थित उपक्रम असल्याने त्याला महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत अग्रस्थान मिळाले. या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांतून त्यांनी संस्कृत काव्यशास्त्रातील तत्त्वांशी पाश्चात्त्य वाङ्‌मयविचारांची सांगड घालण्याचा पुष्कळ यशस्वी प्रयत्न केलेला आहे. 

त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३). वृत्ते व अलंकार ही काव्यशरीराहून अलग राहणारी नसल्याने त्यांना अनुक्रमे गतिविभ्रम व स्थितिविभ्रम संबोधावे, अशी भूमिका त्यांचा काव्यविभ्रम (१९५१) या पुस्तकात मांडलेली आहेत. मुंबई मराठी साहित्यसंघाच्या वा. म. जोशी व्याख्यानमालेत त्यांनी केशवसुत यांच्या नंतरच्या आधुनिक मराठी कवितेतील प्रवृत्तिपरंपरांचा जो आढावा घेतला. तो अर्वाचीन मराठी काव्य (केशवसुत आणि नंतर) (१९४६) म्हणून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेला आहे. संस्कृत काव्यवाङ्‌मय (१९४५) या त्यांच्या ग्रंथांत संस्कृत काव्याचा धावता परिचय करून देण्यात आला आहे. केशवसुत (काव्यदर्शन) (१९४७) हा त्यांचा ग्रंथ केशवसुतांच्या कवितेचे तपशीलवार समीक्षण करणारा आहे. पुणे विद्यापीठाच्या केळकर व्याख्यानमालेत त्यांनी ज्ञानेश्वर ते शाहीर या कालखंडातील बदलत्या अभिरुचीचे समालोचन केले होते. ते पुढे मराठी वाङ्‌मयाभिरुचीचे विहंगमावलोकन (१९५९) या ग्रंथात समाविष्ट झालेले आहे. चर्वणा (१९६०), विचक्षणा (१९६२) व दक्षिणा (१९६७) हे त्यांच्या साहित्यविषयक स्फुट लेखांचे संग्रह होते.  


मराठी साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्‌मय इतिहासयोजनेत संपादक म्हणून ते सहभागी होते. या योजनेतील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या खंडांच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. नवकाव्यातील दुर्बोधतेची चर्चा करणारे ‘मुख्यार्थाची कैफियत’ हे त्यांचे व्याख्यान, विरहतरंगाची मेघदूताशी तुलना करणारे समीक्षण व डांगी बोलीविषयीचा प्रदीर्घ निबंध हे त्यांचे लेखन अत्यंत विचारप्रवर्तक होते. त्यामुळे जोग यांचा समतोल परीक्षक म्हणून उल्लेख केला जातो. ठाणे येथे झालेल्या बेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता (१९६०) व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निवृत्त प्राध्यापकांच्या योजनेतही त्यांची नेमणूक झाली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद व मराठी साहित्य महामंडळ यांच्या कार्याशी अनेक नात्यांनी त्यांचा दीर्घ काळ घनिष्ठ संबंध होता. अशा या थोर साहित्यिकाचे २१ फेब्रुवारी १९७७ रोजी निधन झाले.


(स्रोत : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 267 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 267 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement