जाणून घ्या सर्वसमावेशक योजना व उपक्रमांची माहिती आणि तुम्हीही व्हा लाभार्थी
महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतंत्रपणे कार्य करणारी राज्य शासनाची स्वायत्त संस्था म्हणजे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत! २२ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाद्वारे 'अमृत' या संस्थेची स्थापना केली. संशोधन, कौशल्यविकास आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजातील सर्व घटकांचा विकास घडवणे हा या संस्थेचा उद्देश आहे. त्यासाठी संस्था विविध प्रकारचे प्रशिक्षण देते, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाच्या योजना राबवते आणि युवकांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देते.
सर्वांगीण प्रगती हा मूलभूत हेतू
अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यात मुख्यत्वे व्यक्तिमत्त्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्यविकास, रोजगारक्षम कौशल्यविकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, उद्योग/व्यवसायवृद्धीसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना आदींचा समावेश आहे. संस्थेची कार्यपद्धती कौशल्य विकासातून स्वावलंबन या तत्त्वावर आधारित आहे. शिक्षणाच्या संधी वाढवणे, रोजगारक्षम कौशल्ये विकसित करणे आणि उद्योजकतेला चालना देणे, या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करणे हा संस्थेचा मूलभूत हेतू आहे.
साडेबारा हजारांहून अधिक लाभार्थी
संस्थेच्या ४२हून अधिक योजना असून, साडेबारा हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी आतापर्यंत या योजनांचा लाभ घेतला आहे.
पुण्यात मुख्यालय, सर्व जिल्ह्यांत कार्यालये
विजय जोशी हे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक असून, पुण्यात औंधमध्ये या संस्थेचे मुख्यालय आहे. अमृत संस्थेच्या कार्याची दिशा ठरवण्यासाठी सक्षम संचालक मंडळ कार्यरत असून, या मंडळात राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रातील तज्ज्ञ व समाजहिताच्या दृष्टीने कार्य करणारे सदस्य यांचा समावेश आहे. अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याची क्षमता संस्थेकडे आहे.
लक्ष्यित गट (संस्था कोणासाठी काम करते?)
खुल्या प्रवर्गातील ज्या घटकांना इतर शासकीय महामंडळांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सध्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात समावेश आहे. या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना संस्थेच्या योजनांचा लाभ घेता येतो.
संपूर्ण ऑनलाइन, पारदर्शक कारभार
संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज पेपरलेस आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट https://mahaamrut.org.in/ या वेबसाइटवर अर्ज करावा लागतो आणि त्याची मंजुरीही ऑनलाइनच होते. सर्व प्रक्रिया आणि प्रशिक्षण कार्यक्रम लक्ष्यित गटासाठी मोफत आहेत.
अमृत संस्थेच्या निवडक योजना व कार्यक्रमांची माहिती येथे दिली आहे. सविस्तर माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शैक्षणिक अर्थसाह्य योजना
- AIIMS, IIT, IIM, IIIT विद्यार्थ्यांना अर्थसाह्य योजना
- संगणक टंकलेखन योजना (GCC_TBC)
- लघुलेखन प्रशिक्षण योजना (Online Short Hand)
- माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण योजना (C-DAC)
यामध्ये योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना शुल्क परतावा किंवा अर्थसाह्य केले जाते. तसेच, स्पर्धा परीक्षांकरिताही साह्य केले जाते.
वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना
अमृतच्या लक्ष्यित गटातील जे पात्र उमेदवार स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.
अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजना
लक्ष्यित गटातील उमेदवारांना युवक-युवतींना संवाद, सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, इंग्रजीसह इतर प्रमुख भाषांवर प्रभुत्व, आत्मविश्वासवृद्धी व संवादकौशल्य, सॉफ्ट व्यक्तिमत्त्व विकास कोर्सेस व उद्योगाभिमुख व रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षण देणे आदींचा यात समावेश असतो.
अमृत बिझनेस इन्क्युबेशन योजना
अमृत औद्योगिक व उन्नत कौशल्यविकास
- तांत्रिक रोजगार प्रशिक्षण (IGTR)
- अमृत – CIPET कौशल्यविकास प्रशिक्षण
- NIELET कौशल्यविकास प्रशिक्षण
उद्योजकता विकास कार्यक्रम
अमृत सूर्यमित्र - सौर ऊर्जा क्षेत्रात तांत्रिक प्रशिक्षण देऊन हरित ऊर्जा क्षेत्रातील रोजगार संधींची निर्मिती
बेकरी प्रशिक्षण - अन्नप्रक्रिया व बेकरी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर.
इम्पोर्ट-एक्स्पोर्ट प्रशिक्षण - आंतरराष्ट्रीय व्यापार, कागदपत्रे आणि व्यवसाय प्रक्रियेची माहिती देणारा अभ्यासक्रम.
उद्योजकता व स्वावलंबन
- उद्योजकता प्रोत्साहन उपक्रम
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सहाय्य.
- प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
अमृत ड्रोन मिशन
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी अमृत संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात तो प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेतर्फे लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.
ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली. अमृत संस्थेच्या या दर्जेदार कोर्सची कीर्ती ऐकून गोवा सरकारने आपल्या तीस अधिकाऱ्यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षित केले.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ अमृत संस्थेचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, या उपक्रमामुळे शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योजक, तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते. स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार स्थानिक उत्पादने खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे स्वदेशी उद्योगांना चालना मिळते. ग्राहकांना थेट स्थानिक उत्पादकांकडून दर्जेदार, खात्रीशीर उत्पादने वाजवी दरात खरेदी करता येतात. राज्याच्या सर्व विभागांमध्ये या उपक्रमाला या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अमृतपेठेत तर दोन दिवसांत साडेनऊ लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली आहे. https://amrutpeth.com/ हे ई-कॉमर्स पोर्टलही सुरू करण्यात आले असून, लवकरच ते अधिक उत्तम प्रकारे विकसित करून सादर केले जाणार आहे.
अमृतवर्ग
विविध योजनांबरोबरच पुढच्या पिढीच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे उद्दिष्ट ठेवून संस्थेतर्फे राज्यात अनेक ठिकाणी दर आठवड्याला अमृतवर्ग घेतले जातात. तसेच, काही ठिकाणी निवासी अमृतवर्ग म्हणजेच अमृत आनंदमेळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी झालेल्या मुलांना नवी ऊर्जा, प्रेरणा आणि आनंद मिळतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्ती कशी वाढवायची याचे धडे त्यांना दिले जातात, तसेच हिंदू संस्कृतीच्या महानतेबद्दल जागृतीही केली जाते.
अमृत परिवार सर्वेक्षण
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटाच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेऊन त्यांच्यासाठी उपयुक्त अशा नव्या योजना सुरू करण्यासाठी एप्रिल २०२६मध्ये राज्यात अमृत परिवार सर्वेक्षण केले जात आहे. लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यवर्धित योजना सर्व घटकांतील व वयोगटांतील लाभार्थ्यांसाठी तयार करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. यासाठी लक्ष्यित गटातील कुटुंबाची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्य व आवडीनुसार विविध योजना तयार करण्यासाठी लक्ष्यित गटातील परिवारांचे हे सर्वेक्षण केले जात आहे. या माध्यमातून लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, अमृत संस्थेकडून सर्वांगीण विकासाच्या आणखी कोणकोणत्या योजना/उपक्रम राबवणे अपेक्षित आहे, याबद्दल विविध व्यक्तींची मते जाणून घेणे व त्या आधारावर नवीन आवश्यक योजना तयार करणे असा दुहेरी हेतू या सर्वेक्षणातून साध्य करण्यात येत आहे.
अमृत महाराष्ट्र
समाजातील सकारात्मक कार्ये, ते कार्य करणाऱ्या व्यक्ती अन् संस्था, उद्योजक अन् उद्योजिकांच्या यशोगाथा, इतिहास, संस्कृती अशा वैविध्यपूर्ण विषयांवरचं सकस साहित्य वाचनासाठी उपलब्ध करण्याकरिता अमृत महाराष्ट्र (https://amrutmaharashtra.org/) हे पोर्टल संस्थेने सुरू केले आहे. त्यात अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांच्या यशकथा, अमृत संस्थेचे विविध उपक्रम, पर्यटनस्थळे, वैचारिक लेख असे साहित्यही वाचकांकरिता उपलब्ध आहे.
याशिवाय, अमृत मानसमित्र, अमृतविद्या, अमृत पर्यटन, इत्यादी अनेक उपक्रमही सुरू आहेत.
एकंदरीतच, अमृत संस्था म्हणजे केवळ योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वार्थाने सक्षम बनवण्याचा एक प्रयत्न आहे. कौशल्यविकास, शिक्षण आणि उद्योजकता यांचा समन्वय साधून ही संस्था स्वावलंबन घडवण्याकडे वाटचाल करत आहे.
अधिक माहितीसाठी
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
ई-मेल : info@mahaamrut.org.in
मोबाइल : 9730151450
मुख्यालय : पाचवा मजला, अमृत इमारत, भीमसेन जोशी सभागृहाजवळ, वॉर्ड क्र. ८, पीएमआरडीए, औंध, पुणे - ४११०६७
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment