जागतिक हिवताप दिन (२५ एप्रिल) का साजरा केला जातो, याबद्दलची माहिती...
मलेरिया अर्थात हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दर वर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम राबवले जातात.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्वप्रथम २००८मध्ये हा दिवस साजरा केला. त्यापूर्वी २५ एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जात असे. २००७मध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत हिवतापाचा जागतिक प्रादुर्भाव या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या रोगाची तीव्रता फक्त आफ्रिकन देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात कशा प्रकारे जास्त आहे,हे समजले. परिणामी हा दिवस ‘जागतिक हिवताप दिवस’ म्हणून ओळखण्यात यावा, असा ठराव त्या परिषदेत मांडण्यात आला. तेव्हापासून हिवतापाची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांबद्दल जनजागृती करणे आणि संपूर्ण जगभरात हिवतापाविरुद्ध चाललेल्या मोहिमेचा आढावा घेणे, ही जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.
युनायटेड नेशन्सचे तत्कालीन महासचिव बान की मून यांच्या पुढाकाराने जागतिक हिवतापविरोधी कृती योजना विकसित करण्यात आली. हिवतापाच्या जागतिक प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नियंत्रण, निर्मूलन आणि संशोधन ही त्रिसूत्री कृती योजनेचा पाया म्हणून स्वीकारण्यात आली. अधिकाधिक परिणामकारक औषधे आणि रोगप्रतिबंधाची साधने तयार करण्यासाठी संशोधन सातत्य ही हिवताप निर्मूलन कृती योजनेची मूलभूत गरज आहे. अल्पविकसित देशांमध्ये हिवतापग्रस्त दुर्गम भागांत आरोग्यसुविधा पोहोचवणे हे हिवतापाविरोधातील मोहिमेतील आव्हान आहे.
पहिल्या जागतिक हिवताप दिवसानिमित्त बान की मून यांच्याकडून हिवतापग्रस्त प्रदेशामध्ये मच्छरदाण्या, औषधे, कुशल आरोग्यसेवक आणि इतर आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला होता. तसेच वार्षिक रूपरेखांना अनुसरून योग्य औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांद्वारे हिवतापावर नियंत्रण करणे सुलभ होते, अशी जनजागृतीदेखील केली जाते. हिवतापाशी निगडित आरोग्यसुविधांबरोबरच भित्तिपत्रके, समाजमाध्यमे आणि इतर जनसंपर्क साधनांद्वारे जागृतीसंदेश जगभर प्रसारित करण्यात येतात. तसेच स्थानिक समुदायांना प्रभावी हिवताप नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्याचेही प्रयोग करण्यात येतात.
हिवतापाची लक्षणे : तीव्र ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, उलट्या आणि थकवा अशी हिवतापाची लक्षणे आहेत. ही सर्व लक्षणे सामान्य तापासारखीच असतात. त्यामुळे हा आजार लक्षात येणे अवघड असते. जेव्हा रुग्णाची स्थिती गंभीर होते तेव्हा मग उपचार सुरू होतात. त्यामुळे मुळात हा आजार होऊच नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.
- घराच्या आसपास पाणी साचू न देणे (डासांची उत्पत्ती रोखणे).
- अंगावर रिपेलंट औषध लावणे.
- वेळेवर आणि योग्य उपचार घेण्यास लोकांना प्रवृत्त करणे.
- सामान्य ताप आणि हिवताप यांमधील लक्षणांमध्ये असणारी भिन्नता समजावी म्हणून ग्रामीण, दुर्गम भागातील किंवा अशिक्षित लोकांना प्रशिक्षित करणे.
- उपचार म्हणून अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या काही प्रथा असतील तर त्यांना स्थानिक पातळीवर आळा घालणे.
अशा काही साध्या, परंतु प्रभावी उपायांनी आपण हिवतापाची साथ रोखू शकतो. यासाठी फक्त आपल्या घराची स्वच्छता एवढाच उद्देश न ठेवता आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. आपली ही कर्तव्ये ओळखून आपण आपल्या परिवाराला आणि समाजाला निरोगी ठेवू शकतो आणि भविष्यकाळात या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नशील होऊ शकतो.
(संदर्भ : मराठी विश्वकोश व इतर संकलित माहिती)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment