चिंतामणराव वैद्य

थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक व चतुरस्र ग्रंथकार चिंतामणराव वैद्य यांचा २० एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...

चिंतामणराव वैद्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

न्यायाधीश व कायदेपंडित असलेले चिंतामणराव वैद्य हे एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक-मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. त्यांचा जन्म कल्याण येथे १८ ऑक्टोबर १८६१ रोजी झाला. वडील विनायकराव कल्याणला वकिली करायचे. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण, तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. एमए (१८८२) आणि एलएलबी (१८८४) झाल्यानंतर काही काळ त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ(खालच्या दिवाणी कोर्टातील न्यायाधीश) म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते उज्जैन येथे न्यायाधीश पदावर रुजू झाले. पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली (१८९५–१९०४).

सेवानिवृत्तीनंतर १९०५ सालापासून ते लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून कार्य करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी ठिकाणच्या कॉंग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढे त्यांनी राजकारण सोडले. १८८९ ते १९३४ या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविध ज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी थोडेच लेखन ग्रंथरूपाने संग्रहित झाले. इंग्रजीत ९ व मराठीत २० अशा त्यांच्या एकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस आहे. त्यांपैकी काही उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे : महाभारत : ए क्रिटिसिझम (१९०४), संक्षिप्त महाभारत (१९०५), रिडल ऑफ रामायण (१९०६), एपिक इंडिया (१९०७), मानवधर्मसार -संक्षिप्त मनुस्मृति (१९०९), दुर्दैवी रंगू (१९१४), श्रीकृष्ण चरित्र (१९१६), महाभारताचा उपसंहार (१९१८), हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदू इंडिया (३ खंड, १९२१, १९२४ व १९२६), संस्कृत वाङ्‌मयाचा त्रोटक इतिहास (१९२२), मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५), गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या (१९२६), ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६), वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१), शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१), हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१), महाभारताचे खंड – सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५), संयोगिता नाटक (१९३४).

या ग्रंथांपैकी महाभारत : ए क्रिटिसिझम यावर लोकमान्यांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दर्शविली. त्यानंतर टिळकांनी रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे आणखी एक अग्रलेख लिहून परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून, ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण सप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै १९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी एपिक इंडिया व श्रीकृष्ण चरित्र हे ग्रंथ महाभारताच्या संदर्भात लिहिले. महाभारताचा तर्कशुद्ध सखोल प्रगाढ अभ्यास त्यांतून जाणवतो. महाभारताची सर्वंकष मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून लोकमान्यांनी वैद्यांना भारताचार्य ही पदवी दिली. गणेश विष्णू चिपळूणकर आणि मंडळी यांनी श्रीमद्महाभारताचे मराठीत नऊ खंडांत भाषांतरही प्रसिद्ध केले (१९०४–१२), त्याचा उपसंहार वैद्यांनी लोकमान्य टिळकांच्या सूचनेनुसार लिहिला (१९१८). केवळ धर्मग्रंथ व पाठ्यग्रंथ म्हणून असलेली रामायण-महाभारत या प्राचीन ग्रंथांची पारंपरिक महती बाजूला ठेवून वैद्यांनी ही महाकाव्ये, विशेषतः इतिहासाचे ग्रंथ आहेत, हे प्रथम लक्षात घेतले. 'रिडल ऑफ रामायण'चा वाल्मिकी रामायण-परीक्षण या नावाने मराठी अनुवाद शि. गो. भावे यांनी प्रसिद्ध केला (१९२०) व महाभारताचा उपसंहार हे दोन ग्रंथ त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

भाषाशास्त्र हे इतिहासात ज्ञानाचे एक साधन असल्यामुळे वैद्यांनी भाषाशास्त्राकडे लक्ष पुरवले. राजवाड्यांच्या व्याकरणावरील परीक्षणात्मक पाच लेख, पुणे येथील सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनातील (१९०८) अध्यक्षीय भाषण, १९०९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या निबंधांच्या व भाषणांच्या संग्रहातील काही लेख, विविधज्ञानविस्तारातून मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या निमित्ताने लिहिलेला लेख (१९२२), मराठी शब्दरत्नाकार (वा. गो. आपटे, १९२२) या शब्दकोशाne लिहिलेली प्रस्तावना आदींतून त्यांची भाषाशास्त्राबद्दलची आवड, त्या विषयातील व्यासंग व अभ्यास दिसतो. महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९०८). भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरूपद त्यांनी भूषवले (१९२२–३४) व पुढे ते त्याचे कुलपती (१९३४–३८) होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्थेत त्यांनी अध्यापनाचे कार्यही केले. २० एप्रिल १९३८ रोजी कल्याण येथे त्यांचे निधन झाले.

(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 02:30 AM News publication time | Views: 191 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 20-04-2026 News publication date | Time: 02:30 AM News publication time | Views: 191 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement