उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांचा २४ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय...

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर मुख्य फोटो
मुख्य फोटो

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर हे प्रसिद्ध मराठी उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्म २८ मे १९०३ रोजी सोलापूरमधील किर्लोस्करवाडी येथे झाला. शालेय शिक्षण औंध येथे आणि पुण्यात झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी १९२७ साली प्राप्त केली. 

शेती व नोकरी याव्यतिरिक्त काही वेगळे उपजीविकेचे साधन असू शकते आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणेही त्या काळात धाडसाचे होते. असा नुसता विचार न करता प्रत्यक्ष कृती करणाऱ्या किर्लोस्कर ग्रुपची सुरुवात १८८८ साली लक्ष्मणराव यांनी सुरू केलेल्या सायकल दुरुस्तीच्या एका लहान दुकानापासून झाली. त्यांनी देशातील पहिला लोखंडी नांगर तयार केला. त्यामुळे कंपनी केवळ नव्या उंचीवरच पोहोचली नाही, तर भारतात औद्योगिक क्रांतीची सुरुवातही झाली. त्यानंतर शंतनुराव यांनी किर्लोस्कर ग्रुपच्या कार्याचा विस्तार केला. १९२०मध्ये किर्लोस्कर ब्रदर्सची स्थापना झाल्यापासून शंतनुराव यांनी किर्लोस्कर ग्रुप अंतर्गत अनेक कंपन्या स्थापन केल्या. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड या कंपनीची झपाट्याने वाढ झाली आणि १९६०च्या दशकापर्यंत ती देशातील सर्वांत मोठी डिझेल इंजिन कंपनी बनली. १९२७ साली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात 'फिक्की'च्या स्थापनेमध्ये शंतनुराव हेदेखील प्रमुख व्यक्तींपैकी एक होते. त्यांना वाटत होते, की उत्पादन क्षेत्रावर प्रबळ लक्ष केंद्रित करून केलेले औद्योगिकीकरण भारताच्या आर्थिक विकासाला गती देईल. त्याची स्वातंत्र्यानंतर देशातील परिस्थिती पाहता नितांत गरज होती आणि यासाठी त्यांनी अनेक प्रसंगी निकराचा लढा दिला. त्यात अखेरीस 'कोएल' कंपनीची स्थापना करण्याच्या वेळेचाही समावेश होता. 

शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे, साखरनिर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स ते ऑइल इंजिन्स, इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून ते फोर्जिंग उत्पादनांपर्यंत अशा सर्व क्षेत्रांत, उत्पादनांना शंतनुरावांचा स्पर्श झाला आणि त्या-त्या क्षेत्राचे, क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांचे कल्याणच झाले. त्या काळात मराठी माणसाने समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला (नाट्य, संगीत, चित्रपट) या क्षेत्रांत प्रगती साधली होती; मात्र मूळ मराठी माणसाने महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात आघाडी घेऊन नाव कमावले आहे असे उदाहरण अस्तित्वात नव्हते; पण शंतनुरावांनी ही पोकळी भरून काढली. केवळ भरून काढली इतकेच नाही, तर त्यांनी उद्योगविकास साधून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले. 

पारंपरिक शेती करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना यंत्रांचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे मोठे अवघड काम होते. शंतनुरावांनी केवळ यंत्रांचे उत्पादनच केले असे नाही, तर त्यांनी उत्पादन वाढवणार्‍या यांत्रिक, आधुनिक शेतीचा प्रसार केला. शंतनुराव यांना १९६५मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शंतनुराव यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००३मध्ये एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते. २४ एप्रिल १९९४ रोजी या महान उद्योगमहर्षीचे निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-04-2026 News publication date | Time: 04:55 AM News publication time | Views: 224 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-04-2026 News publication date | Time: 04:55 AM News publication time | Views: 224 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement