अमृत संस्थेच्या रायगड जिल्हा कार्यालयाकडून आयोजन
अलिबाग : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. विविध योजनांबरोबरच पुढच्या पिढीच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे उद्दिष्ट ठेवून संस्थेतर्फे अमृतवर्ग घेतले जातात. रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ वरसोली येथे पहिला निवासी अमृतवर्ग म्हणजेच अमृत आनंदमेळा नुकताच पार पडला. त्यात सहभागी झालेली १८ मुले नवी ऊर्जा आणि आनंद घेऊन बाहेर पडली. शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्ती कशी वाढवायची याचे धडे त्यांना मिळाले, तसेच हिंदू संस्कृती महान का आहे, हेही त्यांनी जाणून घेतले. एकंदरीत हा वर्ग उत्साहात पार पडला.
अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला हा अमृत आनंदमेळा शारंग हॉलिडे होममध्ये झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अण्णा सुतार यांच्या हस्ते मेळ्याचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश धाट हेही या वेळी उपस्थित होते. दोघांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याकडून एक गीत म्हणून घेतले. सौ. गुंजाळ यांनी मुलींना स्वसंरक्षणार्थ लाठीकाठी प्रशिक्षण दिले. त्यांनी काही प्रात्यक्षिकेही करून दाखवली. संध्याकाळी स्तोत्रपठण, अमृत वर्गातील नित्यक्रमांचा सराव, घोषणा, गीते वगैरे झाल्यावर स्नेहभोजन झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सौ. अनघा मराठे यांनी मुलांकडून योगसराव करून घेतला. नऊ वाजता श्रीनिवास केळकर गुरुजींनी घेतलेल्या सत्रात आध्यात्मिक, धार्मिक संवाद झाला. साडेनऊ वाजता झालेल्या दुसऱ्या सत्रात श्रीराम ठोसर यांनी स्वामी विवेकानंदांच्या बालपणीच्या जीवनाविषयीच्या कथा सांगितल्या. 'कोणी देव बघितला का' या प्रश्नावर आधारित संवाद झाला. सनातन संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. विशाखा आठवले यांनी 'हिंदू सनातन संस्कृती कशी महत्त्वाची आहे व ती कशी जपायची' यावर तिसरे सत्र घेतले.
चौल येथील मातृ प्रतिष्ठानचे अजिंक्य शिंत्रे यांनी शारीरिक, मानसिक व बौद्धिक शक्ती कशी वाढवायची, त्याचे व्यायाम या विषयावर मुलांशी संवाद साधला. दुपारी जेवायला बसल्यानंतर करावयाच्या सर्व क्रियांबद्दल श्रीनिवास केळकर गुरुजींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर स्वामी विवेकानंद समितीच्या नागाव इथल्या ७५ वर्षे वय असलेल्या श्रीमती गोखले आजींनी दुपारच्या सत्रामध्ये स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या.
आकाशवाणी मुंबईच्या वृत्त उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या आयआयएस अधिकारी सौ. संगीता गोडबोले यांनी या मेळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांशी संवाद साधला. अभ्यास कसा आणि कोणत्या पद्धतीने करावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. नावडता विषय आवडता कसा करावा, अशी चर्चाही या सत्रात झाली. मुलांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. पुढच्या मेळ्यात प्रत्यक्ष येऊन संवाद साधण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या शेवटच्या सत्रात मुलांनी मेळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिलखुलासपणे व्यक्त केल्या. अनेकांनी दुसऱ्या दिवशीही राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढच्या मेळ्यातही नक्की सहभागी होऊ असे सांगितले. काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपव्यवस्थापक मंगेश ढेबे यांनी आभारप्रदर्शन केले. वंदे मातरम् आणि राज्यगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. अमृतसखी जान्हवी साठे, अमृतमित्र अथर्व भातखंडे यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शैलेश विनायक मराठे - 9112228759
रायगड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
मंगेश भागुराम ढेबे - 81495 52143
रायगड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Nandini kiran Bhave
खूप छान उपक्रम 👌👌👌👍
असेच छान छान उपक्रम आपण सगळीकडे घ्यावे व आपलि भारतीय संस्कृती किती महान आहे याची जाणीव करून द्यावी, तसेच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व पटवून द्यावे.
तुमच्या सगळ्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
जय श्रीकृष्ण 🚩
Write a Comment