ताराबाई मोडक

शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा १९ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा कार्यपरिचय...

ताराबाई  मोडक मुख्य फोटो
मुख्य फोटो

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी मुंबईत झाला. ताराबाई या चाकण (जि. पुणे) येथील केळकर घराण्यातील होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे नाव उमाबाई. त्यांचे वडील सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिक आणि ज्ञानदीप हे मासिक चालवत असत. ताराबाईंची आईही स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आई-वडिलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. १९१४मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बीए झाल्या. त्यांचे पती कृष्णा मोडक अमरावती येथे वकिली व्यवसाय करत. पुढे ताराबाईंचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इत्यादी ठिकाणी वास्तव्य झाले.

ताराबाई १९२२मध्ये राजकोट येथे बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये लेडी सुपरिटेंडन्ट म्हणून रुजू झाल्या. कॉलेजमध्ये या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यानंतर त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या साह्याने भावनगर येथे माँटेसरीच्या तत्त्वांवर आधारलेली ‘गीता शिक्षण पद्धती’ निश्चित केली. हाच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ होय. शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले. १९२३-१९३२ ही नऊ वर्षे त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. १९३३पासून त्यांनी शिक्षणाबाबची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९३६मध्ये त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. १९३६-१९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले. 

ताराबाईंनी गिजुभाईंच्या मृत्यूनंतर पुढील १२ वर्षे नूतन बालशिक्षण संघाची धुरा वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होते. खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालवण्यासाठी १९४५मध्ये ताराबाईंनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापन केले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, म्हणून आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालवण्याचा उपक्रम करण्यात आला. या अंगणवाडीमुळे आदिवासींच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. 

१९५७मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे हलवण्यात आले. ताराबाईंनी कोसबाडच्या परिसरात प्राथमिक शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या विकासवाडी या प्रकल्पातील अनुभवातून कुरणशाळेचा प्रयोग सुरू केला. प्राथमिक शाळेत मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न होता. मुले शाळेत हजर राहावीत म्हणून ताराबाईंनी गृहभेटी, प्रचारफेऱ्या, दिंडी, मुलांसाठी बैलगाडीची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबवले. त्याचबरोबर भातशेती या मूलोद्योगाच्या माध्यमातून विज्ञान, गणित, भाषा हे विषय शिकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलांना शिक्षण घेण्यात गोडीदेखील वाटू लागली; परंतु पेरणीनंतर सहा ते दहा वयोगटातील आदिवासी मुले व काही मुली पूर्ण दिवस गुरांना रानात चारायला नेत. त्यामुळे मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न पुन्हा ताराबाईंपुढे निर्माण झाला. यावर उपाय म्हणून ताराबाईंनी शाळेलाच रानात नेण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्याला कुरणशाळा असे नाव दिले. 

शहराच्या ठिकाणाहून कोणतेही शैक्षणिक साधने न आणता त्यांनी विद्यार्थ्यांना रंग, स्पर्श, वजन मापन, अंक, आकार इत्यादी संकल्पना समजाव्यात यांकरिता पिसे, बांगड्या, शंख, दगड, बिया, माती, रेती, बांबुफळे, डब्या इत्यादी स्थानिक वस्तूंचाच वापर केला. ताराबाईंनी १९५८मध्ये आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या कुरणशाळा प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून नोंद झालेली आहे. पुढे १९७४मध्ये भारत सरकारने या प्रयोगाचा आढावा घेणारी कुरणशाळा (मराठी) आणि मेडोस्कूल (इंग्रजी) या पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतल्या. कुरणशाळेबरोबरच रात्रीची शाळा, व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आपले आयुष्य वेचले. 

ताराबाई १९४०–१९५४ या काळात ग्राम बालशिक्षण संघाच्या चिटणीस होत्या. यादरम्यान त्यांनी शिक्षणपत्रिका या मराठी, गुजराती, हिंदी भाषिक मासिकाचे संपादन केले. त्या काही काळ महाराष्ट्र विधानसभेच्या सभासदही होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून, त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरवले. ३१ ऑगस्ट १९७३ रोजी ताराबाई यांचे मुंबई येथे निधन झाले.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 534 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 534 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement