महर्षी धोंडो केशव कर्वे

थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा १८ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा अल्प परिचय...

महर्षी धोंडो केशव कर्वे मुख्य फोटो
मुख्य फोटो

महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजे एक लोकोत्तर सेवामूर्तीच. स्त्रियांचा उद्धार झाल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही, हे मर्म त्यांनी ओळखले होते. ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरीत झाल्यानंतर १८९१मध्ये मुंबई येथून ते बीए झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली. 

पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) महर्षी कर्व्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदासदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले; पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरवले. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढले-व्याख्याने दिली. लोकांच्या शंकांना शांतपणे आणि तर्कशुद्ध युक्तिवादाने उत्तरे देत देत ती सर्वांना पटावीत यासाठी ते झटत राहिले. अण्णांनी १८९९मध्ये पुण्यात सदाशिव पेठेत अनाथ बालिकाश्रम सुरू केला. तो आश्रम कालांतराने हिंगणे गावात स्थलांतरित करण्यात आला. त्याचे सुरुवातीचे स्वरूप एक छोटीशी झोपडी आणि केवळ एक विद्यार्थिनी असे होते. विद्यार्थिनींची संख्या हळूहळू वाढू लागली. दुसरीकडे आश्रमाचे हितचिंतकही वाढू लागले. तशा दात्यांकडून आश्रमाला अर्थसाह्यही मिळू लागले. 

विधवांप्रमाणे गरजू आणि सर्वसामान्य मुलींना रीतसर शिक्षण मिळण्याची गरज होती. स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केल्याशिवाय त्यांची दु:खे कमी होणार नाहीत असाही विचार कर्वे करू लागले. त्यातूनच ते स्त्रियांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय विद्यापीठ असावे अशा निर्णयाप्रत आले. त्या विद्यापीठात मुलींना संसारशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायन अशा स्त्रीजीवनाला आवश्यक त्या सर्व विषयांचे शिक्षण मिळावे असा त्यांचा उद्देश होता. त्यांनी १९१६मध्ये भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठाला सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाख रुपयांची देणगी दिली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ अर्थात एसएनडीटी हीच ती संस्था. 

कर्वे यांनी बालविधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निवारण अशा विविध स्तरांवर केलेले काम अजोड आहे. त्यांच्या पत्नी आनंदीबाई म्हणजेच बाया कर्वे यांची त्यांना मोठी साथ होती. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही वणवण केली. महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज ‘मुरुड फंड’ (१८८६), स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’ (१९१०), ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ (१९३६), जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला ‘समता-संघ’ (१९४४) इत्यादी संस्था त्यांनी स्थापन केल्या. कर्व्यांचे आत्मवृत्त १९१५मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.

आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींमध्ये कर्व्यांनी आपल्या कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षींचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण (१९५५), भारतरत्न (१९५८) या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे. १०४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगून ९ नोव्हेंबर १९६२ रोजी या थोर समाजसुधारकाचे निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 536 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 536 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement