राजनैतिक अधिकारी, चित्रकार, छायाचित्रकार आणि लेखक मदनजित सिंग यांचा १६ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा कार्यपरिचय...
मदनजित सिंग हे भारतीय राजनैतिक अधिकारी, चित्रकार, छायाचित्रकार आणि लेखक होते. त्यांचा जन्म १६ एप्रिल १९२४ रोजी लाहोर येथे झाला. भारताच्या दक्षिणेकडील पुदुच्चेरी या शहरातील सुंदर अशा पूर्व किनारपट्टी रस्त्यावर पाँडेचरी विद्यापीठाच्या आवारात युनेस्को मदनजित सिंग इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशिया रीजनल को-ऑपरेशन या नावाचे अभ्यास केंद्र आहे. दक्षिण आशियामध्ये शिक्षण आणि संशोधनाद्वारे शांतता व समृद्धी प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाने २०१२मध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते या अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात पाकिस्तान वगळता भूतान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भारत या देशांतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत होती. दक्षिण आशियातील देशांच्या सहकार्याने यशस्वी ठरलेल्या या योजनेचे संपूर्ण श्रेय जाते ते ‘युनेस्को’चे सदिच्छादूत म्हणून कार्य केलेल्या मदनजित सिंग यांच्या दूरदृष्टीला.
एखाद्या मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या नावाने संपूर्ण अभ्यास केंद्र स्थापन होणे ही तशी दुर्मीळ गोष्ट. परंतु, मदनजित सिंग यांच्या कारकिर्दीचा वेध घेतल्यास या गोष्टीचे मुळीच आश्चर्य वाटणार नाही. रोम विद्यापीठात ‘बौद्ध कला आणि संस्कृतीचा इतिहास’, तसेच ‘युरोपियन कलेचा इतिहास’ यावर केलेल्या अभ्यासामुळे कला आणि संस्कृती यांचे मानवी जीवनात असणारे महत्त्व मदनजित सिंगांना उमगले होते. या जाणिवेतूनच मुत्सद्देगिरी म्हणजे निव्वळ राजनैतिक व्यूहरचना किंवा शह-काटशह नव्हे, तर कला-संस्कृती-इतिहास यांना एकाच धाग्यात गुंफून समाजाला सर्जनशील बनवणे या गोष्टीचाही मुत्सद्देगिरीत अंतर्भाव होतो, हे त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत दाखवून दिले.
१९५३च्या दरम्यान भारतीय परराष्ट्र सेवेत आलेले मदनजित सिंग १९८४पर्यंत तेथे कार्यरत राहिले. या काळात त्यांनी इटली, युगोस्लाव्हिया, ग्रीस, लाओस, स्वीडन, डेन्मार्क, स्पेन, सोव्हिएत महासंघ, दक्षिण व्हिएतनाम, कोलंबिया, युगांडा, रवांडा, बुरुंडी आणि फिनलँडमध्ये राजदूत म्हणून सेवा बजावली. परंतु, १९८२ ते १९८५ हा त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखा काळ ठरला. या काळात त्यांची निवड ‘युनेस्को’मध्ये सांस्कृतिक विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली. यावरून मदनजित सिंग यांना दिलेल्या जबाबदारीचे महत्त्व लक्षात येते. या काळात त्यांनी मानवजातीचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक इतिहास, आफ्रिकेचा इतिहास, कॅरेबियन इतिहास, मध्य आशियाच्या संस्कृतीचा इतिहास आणि सेल्टिक भाषांचा इतिहास यांचे सखोल अध्ययन केले. या अभ्यासातून मानवी जीवन आणि संस्कृती यांचा शांतता व समृद्धीशी थेट संबध आहे, हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.
१९४२मध्ये महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान तुरुंगवास पत्करणाऱ्या मदनजित सिंग यांच्या शांततेप्रति असणाऱ्या निष्ठेची दखल ‘युनेस्को’च्या कार्यकारी मंडळानेही घेतली. महात्मा गांधींच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने ‘युनेस्को’ने सहिष्णुता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मदनजित सिंगांच्या नावाने बक्षिसाची घोषणा केली. १६ नोव्हेंबर २००० या दिवशी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्रांनी त्यांची ‘युनेस्कोचे सदिच्छादूत’ म्हणून निवड केली. २००६मध्ये भारत सरकारनेही त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले होते. परंतु, स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळालेल्या ताम्रपत्रापेक्षा दुसरा कोणताच मोठा सन्मान असू शकत नाही, असे सांगून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.
निवृत्तीनंतरही मदनजित सिंगांची शांततेविषयी असलेली निष्ठा अधिक बळकट झाली. दक्षिण आशियाचे अस्तित्व आणि भविष्य पूर्णपणे प्रादेशिक सहकार्यावर अवलंबून आहे, याबद्दल त्यांच्या मनात थोडीही शंका नव्हती. या सहकार्याचा मार्ग हा शिक्षण आणि संशोधनातूनच जातो, ही त्यांची ठाम धारणा होती. या उद्देशातूनच त्यांनी ‘साउथ एशियन फाउंडेशन’ची स्थापना केली. पुदुच्चेरीतील अभ्यास केंद्र हे या संस्थेचे फलित आहे. २०१०मध्ये ‘युनेस्को’ने या शैक्षणिक उपक्रमाशी स्वतःला जोडून घेतले. या संस्थेच्या अफगाणिस्तानातील उपक्रमाची दखल स्वतः राजा झहीर शाह आणि हमीद करझाई यांनी घेतली आणि दक्षिण आशिया फाउंडेशनचे सदस्यत्व स्वीकारले. सहा जानेवारी २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.
(संदर्भ : दिव्य मराठी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment