डॉ. बाबासाहेब आंबेडकर - अमृत महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्यापक कार्याचा थोडक्यात आढावा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मुख्य फोटो
मुख्य फोटो

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतरत्न डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल ही जयंती. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडजवळ असलेले आंबडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते मध्य प्रदेशात महू येथे असताना १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. रामजी हे लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी सातार्‍यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातार्‍यात झाले. डॉ. आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. या काळात दोन महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या. एक म्हणजे त्यांचे रमाबाई यांच्याशी लग्न झाले आणि दुसरी म्हणजे त्यांचे जीवन घडण्यासाठी मार्गदर्शक ठरलेल्या केळुसकर गुरुजींशी त्यांचा निकटचा संबंध आला. पदवी घेतल्यानंतर डॉ. आंबेडकरांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एमए व पीएचडी या पदव्या मिळवल्या.

डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून डॉ. बाबासाहेबांनी समाजाला आपल्या हक्कांप्रति जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीती, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. ते जातिभेदाच्या विरोधात होते. जातिभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंध होणार नाही असे ते मानत. डॉ. बाबासाहेब म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय यांची जाणीव होत नाही. आपले हक्कही आपल्याला कळत नाहीत, असा संदेश देऊन त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. 

स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. बाबासाहेबांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केले. १९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात कायदामंत्री झाले. पुढे ते संविधान-लेखन-समितीचे अध्यक्षही झाले. अस्पृश्यता नामशेष करणारा संविधानातील ११वा अनुच्छेद हा आंबेडकरांचा विजयच आहे. सतत परिश्रम घेऊन, चर्चा करून त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने तीन वर्षांत संविधानाचा मसुदा तयार केला. या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ लोकसभेत सादर करण्याचा बहुमान मिळवला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जे संविधान झाले ते आपल्या परंपरांचा, संस्कृतीचा एक वस्तुपाठच आहे. आपल्या देशाची न्यायव्यवस्था व इतर व्यवस्था उत्तमपणे चालणे एवढाच त्या संविधानाचा हेतू नाही, तर संविधानात अनेक मूलभूत तत्त्वांचे विवेचनही करण्यात आले आहे. धर्म, जात, पंथ, लिंग आदी बाबींवरून भेद होणार नाही, हेच आपले संविधान सांगते. समरस जीवनाच्या निर्मितीसाठी संविधान आहे. एकात्म, बलशाली समाज यातूनच निर्माण होणार आहे. आणि हीच शिकवण संविधानातून मिळते. अशा संविधानाचे शिल्पकार, महान कायदेतज्ज्ञ डॉ. आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-04-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-04-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement