उद्योजक घडवण्यासाठी 'एमसीईडी'च्या संयुक्त विद्यमाने आयोजन
वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात बेकरी उद्योगाचे प्रशिक्षण देणारा ३० दिवसांचा मोफत प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात आला. आठ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, नवउद्योजक घडवण्याचा आणि स्वप्ने व्यवसायात रूपांतरित करण्याचा एक सक्षम प्रयत्न आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खादी ग्रामोद्योगचे विदर्भ विभागप्रमुख अनंत झाडे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आर्वीच्या नगरसेविका संपदा जोशी उपस्थित होत्या. अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे, अमृतमित्र धीरज राठी आणि एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी नीलिमा उके आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक धनश्री माईदे यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना 'नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे' बनवण्याचा संकल्प आहे. स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा, उद्योजकीय कौशल्ये कशी आत्मसात करावीत, ग्राहकवर्ग कसा वाढवावा, तसेच बदलत्या बाजारपेठेचा योग्य अभ्यास करून नियोजन कसे करावे, यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच अमृत संस्थेच्या विविध योजना, व्यावसायिक वैयक्तिक कर्जावरील व्याजपरतावा, तसेच इतर शासकीय योजनांची माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्वामी बेकरीच्या सौ. वैशाली क्षीरसागर या अनुभवी मार्गदर्शक प्रशिक्षण देत असून, त्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्याधारित प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून, स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणा अधिक बळकट होत आहे. हा उपक्रम युवक-युवती, महिला यांच्यासाठी केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून, त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आणि स्वप्ने साकार करण्याची एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत संस्थेचे जिल्हा कार्यालय,
प्रशासकीय भवन, तळमजला,
जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा
मोबाइल : ९११२२२७६३२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment