स्थानिक लघुउद्योजकांना मिळणार बाजारपेठ; ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदी करता येणार दर्जेदार स्थानिक उत्पादने
रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून चंद्रपूरपर्यंत छत्रपती संभाजीनगरपासून जळगावपर्यंत राज्याच्या सर्व विभागांमध्ये यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम आता रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी रत्नागिरीत हे प्रदर्शन भरणार असून, अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार स्थानिक उत्पादने खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवते. त्यात उद्योजकतेला साह्य करण्यासाठी अमृतपेठ हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामुळे शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योजक, तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थी, आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या दोन दिवसांच्या बाजारपेठेत विविध प्रकारची ताजी कृषी उत्पादने, घरगुती खाद्यपदार्थ, आरोग्यदायी पदार्थ, आकर्षक हस्तकला वस्तू, तसेच रत्नागिरीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ग्राहकांना दर्जेदार व ताज्या वस्तू वाजवी दरात थेट उत्पादकांकडून घेण्याची संधी मिळणार असून, उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा आणि उदत्पादनांचा योग्य मोबदला मिळून त्यांचा उत्साह वाढणार आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत असून, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ दिनांक : ११, १२ एप्रिल २०२६ वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत स्थळ : बाळासाहेब ठाकरे यूथ अॅक्टिव्हिटी सेंटर हॉल, डॉ. भोळे हॉस्पिटलच्या शेजारी, साळवी स्टॉप, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228761, 9422003128, 7021209405
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment