पु. भा. भावे - अमृत महाराष्ट्र

पु. भा. भावे

ज्येष्ठ साहित्यिक पु. भा. भावे यांचा १२ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...

पु. भा. भावे मुख्य फोटो
मुख्य फोटो

पु. भा. भावे हे अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक होते. कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इ. विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी धुळे येथे झाला. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली. भाव्यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले व नागपूरला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास झाला. संपन्न घराण्यात जन्माला येऊनही जीवनातील खडतर अनुभव त्यांना घ्यावे लागले. त्यांना वाचनाचे विलक्षण वेड होते. 

'किर्लोस्कर खबर'मध्ये (जुलै १९३१) त्यांची ‘फुकट’ ही कथा प्रकाशित झाली. तथापि त्यांच्या लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रकट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या नागपूरच्या ‘सावधान’ या साप्तहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होताच (१९३६) त्यांतून प्रकट होणाऱ्या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. आदेश (१९४१-४८) या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक प्रभावी लेख प्रसिद्ध झाले आहेत. रक्त आणि अश्रू (१९४२) हा त्यांचा लेखसंग्रह केवळ त्यांच्याच नव्हे, तर एकूण मराठी निबंधवाङ्‍मयाताही अद्वितीय असा आहे. परखड परंतु तर्कशुद्ध, चिंतनात्मक तरीही भावना उचंबळून सोडणारे असे त्यांचे वाङ्‍मय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाघनखे (१९६१), विठ्ठला पांडुरंगा (१९७३), अमरवेल (१९७४), रांगोळी (१९७६) असे त्यांचे चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्मरणी (१९७४) हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे.

भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वा. सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे ते काही काळ सक्रिय कार्यकर्तेही होते. हिंदूहितविरोधी आचारविचार हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. त्यामुळेच त्यांच्या निबंधवाङ्‍‌मयातून तथाकथित पुरोगामीपणावर वारंवार टीका आढळते. भावे हे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक व प्रवक्ते होते. अखंड भारत हे त्यांचे श्रद्धास्थान होते. त्यांच्या साऱ्या लेखनामधून त्यांच्या या जीवनदृष्टीचे दर्शन घडते. त्यांच्या वृत्तीतील निर्भय झुंजारपणा त्यांच्या साहित्यातूनही डोकावतो. भावे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते, प्रतिगामी नव्हते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. हिंदूसमाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदावरही ते टीका करत.

‘सतरावे वर्ष’, ‘सीमेवर’, ‘सावल्या’, ‘काळ, काम आणि वेग’, ‘ स्वप्‍न’, ‘ ध्यास’, ‘मुक्ती’, ‘रूप’, ‘प्रतारणा’, ‘पुतळा’, ‘दुःख’, ‘फुलवा’, ‘पहिले पाप’, ‘संगम’, ‘घायाळ’, ‘नौका’ यांसारख्या अप्रतिम कथा लिहून भाव्यांनी मराठी कथासृष्टीत आपले नाव अजरामर केले आहे. भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या 'नौका' या कथासंग्रहातील कथा अतिशय रंजक आणि उद्बोधक आहेत. जीवनातील तारुण्याचे व कारुण्याचे, शाश्वतेचे व नश्वरतेचे ते सारख्याच समरसतेने चित्रण करतात. करुण रसाप्रमाणेच हास्यरसाचेही दर्शन ते तेवढ्याच प्रभावीपणे घडवतात ‘आइसक्रीम’ ही त्यांची विनोदी कथा उल्लेखनीय आहे. त्यांचे एकूण सत्तावीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतूनही हेच जीवनदर्शन आढळते. 

अकुलिना (१९५०) आणि वर्षाव (१९५५) यांसारख्या कादंबऱ्यांतून ते स्त्रीव्यथेचे विलक्षण हळुवारपणे चित्रण करतात. अडीच अक्षरे (१९६३) या कादंबरीतून प्रेमभावनेचे विविध पदर त्यांनी उलगडून दाखवले आहेत. आग (१९६१), रोहिणी (१९६२), पिंजरा (१९६४), मागे वळून (१९६६), सायंकाळ (१९६८), व्याध (१९६९), रखमाच्या मुली (१९७४) अशा त्यांच्या एकूण एकोणीस कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.

नाटककार म्हणूनही भाव्यांनी लौकिक प्राप्त केला होता. विषकन्या (१९४३), स्वामिनी (१९५६), महाराणी पद्मिनी (१९७१) ही त्यांची गाजलेली नाटके. 'सौभाग्य' आणि 'माझा होशील का?' या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. उत्तर-दिग्विजय (१९६४-६५) आणि चितोड यात्रा (१९६८-६९) ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. अहिल्यानगर येथे १९६४ रोजी भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. भावे हे साहित्य क्षेत्रातील एक निरलस कर्मयोगी होते. त्यांची साहित्यसेवा लक्षात घेऊन पुणे येथे १९७७ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचा वक्‍तृत्वगुण त्यांच्या लेखनशैलीमध्ये उतरलेला दिसतो. १३ ऑगस्ट १९८० रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 132 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement