प्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांच्या जन्मदिनानिमित्त (१० एप्रिल) त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा...
१० एप्रिल १९०७ रोजी जन्मलेले मोतिराम गजानन रांगणेकर म्हणजे मराठी नाट्यसृष्टीतील एक मातब्बर नाव! मराठी नाटककार आणि पत्रकार. त्यांचा जन्म ठाण्याचा. रंगभूमीकडे वळण्यापूर्वी अरुण (१९२४) आणि मराठीतील अग्रगण्य वाङ्मयीन नियतकालिक म्हणून पुढे ख्याती पावलेल्या सत्यकथा (१९३३) या मासिकांचे ते संपादक होते. आशा, चित्रा, तुतारी, वसुंधरा यांसारख्या साप्ताहिकांचेही ते संपादक होते. खुसखुशीत, विनोदी आणि कल्पकतेची साक्ष देणारे सदरे हे या साप्ताहिकांचे वैशिष्ट्य असल्यामुळे ती लोकप्रिय झाली होती. रांगणेकरांनी कादंबरीलेखनही केले. सीमोल्लंघन (१९३४) आणि मृगजल (१९३७) या त्यांनी लिहिलेल्या दोन सामाजिक कादंबऱ्या. तथापि त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य रंगभूमीच्या क्षेत्रातील आहे.
चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मराठी नाट्यक्षेत्रातील नामवंत नाट्यसंस्थांचा ऱ्हास झाल्यामुळे १९३३नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला उतरती कळा आली होती. अशा परिस्थितीत १९४१ साली रांगणेकरांनी नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली व ती तीस वर्षे उत्तम प्रकारे चालविली. या नाट्यसंस्थेसाठी त्यांनी स्वतः वीस-बावीस नाटके लिहून ती सादर केली. आशीर्वाद (१९४१) हे त्यांनी लिहिलेले पहिले नाटक. त्यानंतर कुलवधू (१९४२), कन्यादान (१९४३), अलंकार (१९४४), माझे घर (१९४५), वहिनी (१९४६), एक होता म्हातारा (१९४८), कोणे एके काळी (१९५०), रंभा (१९५२), भटाला दिली ओसरी (१९५६) इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. त्यांपैकी कुलवधू या नाटकाला फार मोठी लोकप्रियता मिळाली. नाट्यलेखनाबद्दल रांगणेकर यांना दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९८२) आणि राम गणेश गडकरी पारितोषिक (१९८७) मिळाले. आपल्या नाटकांचे दिग्दर्शन रांगणेकर स्वतः करत असत. ३० नोव्हेंबर १९४१ रोजी त्यांनीच लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘आशीर्वाद’ नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकले. पुढची तब्बल पस्तीस वर्षं म्हणजे जानेवारी १९७६च्या ‘मी एक विदूषक’पर्यंत ते मराठी रंगभूमीवर लेखक/ दिग्दर्शक या नात्याने कार्यरत होते. आपल्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी आपल्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेतर्फे अनेक उत्तमोत्तम नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली.
विष्णुपंत औंधकर, विमल सरदेसाई, ज्योत्स्ना भोळे, श्रीपाद जोशी, स्नेहप्रभा प्रधान, गजानन जागीरदार, गोविंद करमरकर, कुसुम कुलकर्णी, बेबी शकुंतला, शाहू मोडक, बाळकराम, कान्होपात्रा, उषाकिरण, मास्टर अविनाश, श्रीकांत मोघे, प्रभाकर पणशीकर, आत्माराम भेंडे, पु. ल. देशपांडे, रामचंद्र वर्दे यांच्यासारख्या मराठी रंगभूमीच्या दिग्गज कलाकारांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला रांगणेकरांसोबत कामे केली होती. नाटक व्यवसायाला काहीशी उतरती कळा आली असताना रांगणेकरांनी आपल्या नाटकांद्वारे प्रेक्षकांना पुन्हा थिएटर्सकडे खेचून आणले. ज्यांना पूर्वीची पाच-सहा तास चालणारी संगीत नाटके आवडत नसत, अशा प्रेक्षकांना रांगणेकरांनी आटोपशीर नाटके सादर करून आपल्याकडे वळवले. रांगणेकरांसोबत बरीच नाटके केलेल्या प्रभाकर पणशीकरांनी ‘तोच मी’ या आत्मचरित्रात रांगणेकरांची नाटक बसवण्याची नेटकी पद्धत सांगितली आहे - 'पहिले दोन दिवस हातात नकलेची वही घेऊन बैठी तालीम. या तालमीत ते प्रत्येक पात्राकडून संवाद व्यवस्थित म्हणून घेत. योग्य त्या लयीत आणि आवाजाच्या चढ-उतारांसह संवाद म्हणणे चालू असताना ऱ्हस्व-दीर्घ उच्चार, न-ण, स-श यांमध्ये गफलत केलेली त्यांना खपत नसे. याप्रमाणे एका आठवड्यात पहिला अंक तयार झाला, की पुढच्या आठवड्यात पहिल्या अंकाची उजळणी आणि दुसरा अंक याप्रमाणे तीन आठवड्यांत सबंध नाटक बसे. नंतर मेकअप-कपडे, प्रॉपर्टी, सेटिंग, फर्निचर यांसह दोन-चार तालमी आणि पहिला प्रयोग अशी पद्धत होती.'
रांगणेकर कल्पक आणि नैसर्गिक दिग्दर्शक होते. रांगणेकरांनी दिग्दर्शित केलेले प्रचंड यशस्वी नाटक म्हणजे आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच.’ या नाटकाने सुरुवातीचे काही प्रयोग रंगमंचावर दोन भागांत अर्धवर्तुळाकार ड्रॉप्सच्या साह्याने आणि नंतर फिरता रंगमंच वापरून केले आणि ‘न भूतो’ लोकप्रियता मिळवली. रांगणेकरांनी संगीत नाटकेही केली होती आणि त्यासाठी मास्टर कृष्णराव, केशवराव भोसले, स्नेहल भाटकर यांच्यासारख्या प्रसिद्ध संगीतकारांकडून संगीत करून घेतले होते. रांगणेकर यांनी म्हापसा इथे झालेल्या ४९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. एक फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment