लोककला संशोधक, गीतकार, नाटककार अशोक परांजपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त (९ एप्रिल) त्यांचा अल्प परिचय...
अशोक परांजपे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे ३० मार्च १९४१ रोजी झाला. त्यांचे वडील गणेश परांजपे हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांचे ग्रामसंस्कृतीशी अतूट नाते होते. शालेय जीवनापासूनच सांगली परिसरातील लोककलांचे विलक्षण आकर्षण त्यांना वाटू लागले. शाहीर आनंदराव सूर्यवंशी, शाहीर बापूराव विभूते, तमाशा कलावंत शंकर तात्या सावजळकर, काळू-बाळू अशा लोककलावंतांशी त्यांचा सततचा संपर्क होता. शाहिरी, सोंगी भारूड, दत्तपंथी भजन, तमाशा, तलवार, दांडपट्टा, करपल्लवी या लोककला सांगली परिसरात लोकप्रिय होत्या. त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.
लेखन, वाचन, चित्रकारीसोबतच परांजपे यांना कुस्तीची आवड होती. मुंबईत आल्यावर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचे धडे घेतले. १० ऑक्टोबर १९७८ रोजी इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राची स्थापना वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या हस्ते झाली. या संशोधन केंद्राचे संचालक म्हणून अशोक परांजपे यांनी जबाबदारी स्वीकारली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. १९८६ साली इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्रातर्फे आनंदवन वरोरा येथे आदिवासी महोत्सवाचे आयोजन त्यांच्या संकल्पनेतून झाले होते. १९९२मध्ये पंढरपूर येथे भक्तीसंगीत महोत्सवाचे आयोजन त्यांच्याच कल्पनेतून झाले होते.
महाराष्ट्रातील लोककलांची पथके फ्रान्स, आयर्लंड, जपान आदी देशांत नेऊन तेथे अशोक परांजपे यांनी मार्गदर्शन केले. खंडोबाचे जागरण, देवीचा गोंधळ, कोकणातील दशावतार, ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या कला, पारंपरिक तमाशा, कीर्तन, लळीत अशा लोककलांचे जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी 'आयएनटी'च्या लोक प्रयोज्य कला संशोधन विभागाचे संचालक असताना कार्य केले. आयएनटीतर्फे ग्रामीण भागातील लोककला आणि लोककलावंतांना शहरी भागात रंगमंच उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. तमाशा अभ्यासक रुस्तुम अचलखांब, शाहीर बापूराव विभूते, गोंधळमहर्षी राजारामबापू कदम, चित्रकथी बाहुलेकार गणपत मसगे, परशुराम गंगावणे, पारंपरिक वाद्य वादक शंकरराव जाधव धामणीकर, दशावतारी कलावंत बाबी नालंग अशा अनेक लोककलावंतांचे कार्यक्रम त्यांनी मुंबईत छबिलदास सभागृहात आयोजित केले. त्या निमित्ताने त्या लोककला प्रकारांवर माहितीपूर्ण पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या.
खंडोबाचे जागरण, लळीत, दशावतार, वासुदेवांची गाणी, नमन खेळे, मादळसारख्या आदिवासी कला यांवर अभ्यासपूर्ण पुस्तिका त्यांच्या संकल्पनेतून आयएनटीने प्रसिद्ध केल्या. खंडोबाचं लगीन, दशावतारी राजा, जांभूळआख्यान, वासुदेव सांगती, अरे रे संसार, मातीचं स्वप्न अशा आयएनटी संशोधन केंद्राच्या संशोधन नाट्यांची मूळ संकल्पना आणि लेखन-मार्गदर्शन परांजपे यांचे होते. महाराष्ट्रात लोककलांच्या संशोधनाची नवी परंपरा निर्माण करून तरुण अभ्यासकांची फळी महाराष्ट्रभर उभी करण्याचे श्रेय त्यांना जाते.
अशोक परांजपे यांचे मराठी रंगभूमीवरील नाटककार म्हणून योगदान उल्लेखनीय आहे. संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, अबक दुबक, बुद्ध इथे हरला आहे, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया यांसारखी संगीत रंगभूमीचे वैभव वाढवणारी नाटके त्यांनी लिहिली. त्यांनी वर्तमानपत्रात स्तंभलेखनही केले. ‘अनोळखी पाऊले’ ही त्यांची स्तंभमालिका अतिशय प्रसिद्ध झाली. लोककलांचे संशोधन, नाट्यलेखन यासोबतच ते गीतकार म्हणूनही लोकप्रिय होते. अवघे गर्जे पंढरपूर, आला आला सुगंध मातीचा, एकदाच यावे सखया, कुणी निंदावे वा वंदावे, केतकीच्या बनी तिथे, दारी उभी अशी, मी दीनांचा कैवारी, नाम आहे आदी अंती, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, पैलतीरी रानामाजी, वाट इथे स्वप्नातील संपली जणू ,आला आला सुगंध मातीचा अशी अनेक लोकप्रिय गीते त्यांनी लिहिली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. लोककला संशोधनाच्या क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. छत्रपती संभाजीनगर येथे ९ एप्रिल २००९ रोजी त्यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment