पुणे : आजच्या काळात महिलांनी केवळ उत्पादक न राहता यशस्वी उद्योजक बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी आज (१९ डिसेंबर) पुण्यात व्यक्त केले.
पुणे : आजच्या काळात महिलांनी केवळ उत्पादक न राहता यशस्वी उद्योजक बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी आज (१९ डिसेंबर) पुण्यात व्यक्त केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेने महिला सक्षमीकरण आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या औंध येथील मुख्यालयात महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्या प्रदर्शनाला जोशी यांनी भेट दिली. त्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन उत्पादनांची माहिती घेतली आणि उद्योजिकांशी संवाद साधला.
या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार आणि कल्पक उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. केवळ उत्पादनांची विक्री नव्हे, तर महिलांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे, त्यांना विपणनाच्या (मार्केटिंग) संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
व्यवसायातील आधुनिक संधी, येणारी आव्हाने आणि बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या बारकाव्यांबाबतही जोशी यांनी उद्योजिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या महिलांच्या उत्पादनांमध्ये भारताबाहेर निर्यात करण्याची क्षमता आहे आणि त्यांची इच्छाही आहे, ही बाब कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांशी बोलताना प्रकर्षाने जाणवली. आता अमृतपेठ (www.amrutpeth.com) त्यांना ही संधी उपलब्ध करून देणार आहे, असे जोशी म्हणाले. लवकरच या महिलांची उत्पादने निर्यातीसाठी तयार होतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनामुळे आपल्याला व्यवसायाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. तसेच नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, अशी भावना सहभागी उद्योजिकांनी व्यक्त केली. महिला सक्षमीकरणाच्या प्रवासातील अमृत संस्थेचा हा उपक्रम एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल आहे. या प्रदर्शनामुळे महिला उद्योजकांना चांगले व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासाला एक नवी दिशा मिळाली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment