बंकिमचंद्र चॅटर्जी - अमृत महाराष्ट्र

बंकिमचंद्र चॅटर्जी

'वंदे मातरम्'चे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा आठ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...

बंकिमचंद्र चॅटर्जी मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोणतेही शस्त्र हातामध्ये न घेता केवळ लेखणीच्या द्वारे ज्यांनी भारतीयांच्या मनात क्रांतिज्योत प्रज्ज्वलित केली, ते म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जी. 'वंदे मातरम्'चे गीतकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा जन्म कंतालपाडा या गावी २६ जून १८३८ रोजी यादवचंद्र व दुर्गादेवी या दाम्पत्यापोटी झाला. बंकिमचंद्रांचे वडील मिदनापूर येथे मोठे सरकारी अधिकारी होते. बंकिमचंद्र लहानपणापासून अतिशय हुशार व बुद्धिमान होते. त्यांनी बीए डिग्री संपादन केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व नंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून केली. एकीकडे नोकरी करत असताना त्यांचे लेखनही चालू होते. इसवी सन १८५७ साली आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिले स्वातंत्र्यसमर झाले. या स्वातंत्र्यसमरामध्ये अनेक भारतीय शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली. हा स्वातंत्र्यसंग्राम अपयशी ठरला, तरी त्याने अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्या वेळी बंकिमचंद्र फक्त अठरा वर्षांचे होते. या पराभवामुळे त्यांचे रक्त खवळून उठले. या इंग्रजांच्या विरोधात आपण काय करू शकतो, याच विचाराने ते अस्वस्थ होते. हा विचार करत असतानाच बंकिमचंद्र यांना रत्नजडित सिंहासनावर विराजमान झालेल्या भारतमातेचे उत्कट आणि विलोभनीय दर्शन झाले आणि त्याच क्षणी त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडले ‘वंदे मातरम्।’

'वंदे मातरम्'चा अर्थ 'मातृभूमी मातेची मी स्तुती करतो.' १८७० साली संस्कृतमय बंगाली भाषेत बंकिमचंद्र यांनी वंदे मातरम् हे एकूण सहा कडवी असलेले गीत लिहिले. यातील पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत तिच्या सृष्टीसौंदर्याचे वर्णन केले आहे. भारतीयांना भारताकडे माता म्हणून पाहण्याची दृष्टी बंकिमचंद्र यांनी दिली. १८७६मध्ये 'संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित बंकिमचंद्र यांनी त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत हे वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. १८८२मध्ये ही ‘आनंदमठ’ कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले आणि वंदे मातरम् गीत घरोघर पोचले. आनंदमठ या कादंबरीत एक देशभक्त संन्यासी ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध कसा लढा देतो याचे रसभरीत वर्णन केले आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची भावना वाचकांच्या मनात निर्माण व्हावी या एकमेव हेतूने बंकिमचंद्रांनी ही कथा रंगवली. थोड्याच अवधीत वंदे मातरम् हे गीत देशभक्तांमध्ये अत्यंत प्रिय झाले. दोन देशभक्त रस्त्यावर भेटले तर ते नमस्काराऐवजी ‘वंदे मातरम्’चाच उच्चार करू लागले. अशा तर्‍हेने स्वातंत्र्यपूर्वकाळात बंकिमचंद्र चॅटर्जींनी लिहिलेले वंदे मातरम् हे गीत भारतासाठी खरोखरच प्राणशक्ती, प्रेरणाशक्ती ठरले. त्यांनी बंगाली भाषेतून लिहिलेल्या कादंबर्‍या, कविता लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषांमधून अनुवाद झाले. त्यांना बंगाली भाषेतील ‘साहित्यसम्राट’ असे म्हटले गेले. 

त्यांनी एकूण १४ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीव्यतिरिक्त त्यांनी दुर्गेशनंदिनी (१८६५) ही त्यांची पहिली बंगाली कादंबरी. तिने बंगाली गद्य साहित्याचा पाया घातला. तसेच त्यांच्या इतर महत्त्वाच्या कलाकृतींमध्ये 'कपालकुंडला', 'विषवृक्ष', 'कृष्णकांतचे मृत्युपत्र', 'देवी चौधुरानी' आणि 'सीताराम' अशा काही कादंबऱ्या आहेत. त्यांनी १८७२मध्ये 'बंगदर्शन' नावाचे मासिक सुरू केले. त्याने बंगाली साहित्यात नवचैतन्य निर्माण केले. अशा या थोर साहित्यिकाचे आठ एप्रिल १८९४ रोजी निधन झाले. या थोर साहित्यिक-देशभक्ताला कोटी कोटी प्रणाम!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 227 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 227 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement