जागतिक आरोग्य दिन (सात एप्रिल) का साजरा केला जातो, याविषयी माहिती देणारा लेख...
हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या धावपळीमुळे तरुणांनाही आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी दर वर्षी सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० साली केली होती. नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. १९४८मध्ये याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. जगभरातील कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्येवर लक्ष ठेवणे आणि त्यांना सामोरे जाणे आहे, हा त्यामागचा उद्देश आहे. या जागतिक संघटनेच्या स्थापनेपासून अवघ्या दोन वर्षांनी जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला आणि तेव्हापासून तो दर वर्षी सात एप्रिललाच साजरा केला जातो. सद्यस्थितीत जगात विविध आजारांनी त्रस्त असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामध्ये टीबी, पोलिओ, कर्करोग, एड्स यांसारखे विकार आहेत. शिवाय अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोगही समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य दिनाचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना निरोगी राहण्याबद्दल जागरूक करणे हे आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीतसुद्धा निरामय आरोग्याला प्राधान्य दिले आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ असे म्हटले जाते. सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम, सकस आणि चौफेर आहार व मानसिक शांतता याची नितांत गरज असते. आपल्या संस्कृतीत या तिन्ही गोष्टींचे महत्त्व फार आधीपासून ओळखले आहे. आयुर्वेदासारख्या उपचारपद्धतीत कोणत्याही रोगाच्या बाबतीत या तीन गोष्टींवरच भर दिलेला आढळेल. कोणताही आजार झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा मुळात आजार होऊच नये अशी जीवनशैली आपण स्वीकारली पाहिजे. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक आजारांची दुर्धरता कमी झाली आहे; पण चुकीच्या जीवनपद्धतीमुळे अनेक आजार झपाट्याने वाढत आहेत. अगदी लहान वयात मधुमेह, कर्करोग, दमा, हृदयरोग आदी विकार होत आहेत. आता संशोधनाने याची कारणमीमांसा होत आहे. प्लास्टिकचा वापर, अतिप्रक्रिया केलेले डबाबंद खाद्य, जंकफूड ही त्याची कारणे आहेत. याशिवाय अतिधावपळ, जास्त स्क्रीनटाइम यांमुळे या समस्येत भरच पडत आहे. आपण आपले पारंपरिक खाद्यपदार्थ, राहणीमान यांपासून जितके दूर जाऊ तेवढी ही समस्या आणखी उग्र रूप धारण करणार आहे. आता मानसिक शांतता, समाधान, आरोग्यपूर्ण अन्न आणि परिपूर्ण जीवनशैली याचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील उत्सव, परंपरा ही वरील सर्व संस्कारांची माध्यमे आहेत. तेव्हा हे सर्व उत्सव आपण पारंपरिक पद्धतीने साजरे करू या. आयुर्वेद, योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमिताने आपण हाच संकल्प करू या आणि निरामय आरोग्यासाठी कटिबद्ध होऊ या.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment