भावगीतगायक जी. एन. जोशी यांच्या जन्मदिनानिमित्त (सहा एप्रिल) त्यांचा अल्प परिचय...
मराठीतील आद्य भावगीतगायक जी. एन. जोशी यांचा जन्म सहा एप्रिल १९०९ रोजी विदर्भातील खामगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद नारायण जोशी. त्यांचे वडील नारायण महादेव ऊर्फ अप्पासाहेब जोशी हे नावाजलेले वकील होते. वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी वकिलीचा अभ्यास केला व वकिलीची परीक्षाही पास झाले; मात्र लहानपणापासूनच त्यांचा ओढा गायनाकडे होता. त्यांच्या घराशेजारीच नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राहत. त्यामुळे तेथे अनेक कलाकार, साहित्यिकांचे जाणे-येणे असायचे. त्यामुळे मास्टर कृष्णराव, मास्टर दीनानाथ इत्यादी अनेक दिग्गज कलाकारांशी त्यांच्या ओळखी झाल्या.
त्यांच्या वाड्यातच रामभाऊ सोहोनी यांनी गायनवर्ग सुरू केला. ते बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या परंपरेतील गायक होते. त्यामुळे सोहोनींकडे जोशींचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात आले. त्यांनी या वास्तव्यात मिराशीबुवा, कृष्णराव पंडित, बापूराव केतकर आदी कलाकारांचे गायन ऐकले. बालगंधर्वांनी आपल्या गायन-अभिनयाने १९२६-२७च्या काळात मराठी मनावर मोहिनी घातली होती. त्यांचा प्रभाव जोशींवरही पडला. याच काळात ते छोट्या छोट्या मैफली करू लागले. पुढे नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथे दिनकरराव पटवर्धन यांच्याकडे त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले.
'रानारानात गेली बाई शीळ ग, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही' हे गीत जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केले. हेच गाणे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते. हे गीत त्यांचे मित्र कवी ना. घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून खासगी कार्यक्रमांतून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात एचएमव्ही ग्रामोफोन कंपनीच्या रमाकांत रूपजी यांनी ते गाणे ऐकले. त्यांना ते खूप आवडले व ध्वनिमुद्रणासाठी जी. एन. यांना आमंत्रण दिले. सुरुवातीला दोन गाणी मुद्रित करायची असे ठरले होते. सायंकाळी चार वाजता सुरू झालेले ध्वनिमुद्रण पहाटे चारला संपले व आठ गाणी ध्वनिमुद्रित झाली. 'शीळ' हे गाणे १९३१पासून घरोघर जाऊन पोहोचले. जी. एन. या एका गाण्यामुळे लोकप्रिय झाले.
एचएमव्ही ग्रामोफोन कंपनीने त्यांना मानाने नोकरी दिली. नंतर एचएमव्ही कंपनीने त्यांना मराठी व शास्त्रीय संगीत विभागाचे अधिकारी बनवले. ग्रामोफोनच्या जमान्यात मराठीचा बोलबाला त्यांच्यामुळेच झाला. त्यांनी आफ्रिकेतील दौऱ्यात केनिया, युगांडा आणि टांझानियात गाण्यांचे तब्बल ४९ कार्यक्रम केले. एचएमव्हीत जी. एन. यांनी ४० वर्षे काम केले. 'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी' हे कवी यशवंतांचे गीत, तसेच भा. रा. तांबे यांचे 'डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका' ही गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली. 'जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला' हे गीतही त्यांनी गीता दत्त यांच्या स्वरात संगीतबद्ध केले. 'स्वरगंगेच्या तीरी' हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे. जी. एन. जोशी यांच्यावर 'स्वरगंगेचा साधक' हा माहितीपटही निघाला. २२ सप्टेंबर १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. या थोर कलाकाराला वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment