छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला 'सर्जिकल स्ट्राइक'

छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या शौर्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच. तो दिवस होता पाच एप्रिल १६६३. त्या निमित्ताने, छत्रपती शिवरायांच्या या पराक्रमाचे वर्णन करणारा हा लेख...

छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला 'सर्जिकल स्ट्राइक' मुख्य फोटो
मुख्य फोटो

शाहिस्तेखान हा शहाजहानची लाडकी बेगम मुमताजमहलचा भाऊ होता. परंतु शहाजहानच्या अखेरच्या काळात शाहिस्तेखानाने औरंगजेबाची बाजू धरली आणि तो तख्तावर येण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शहाजहानने त्याला कैदेतही टाकले होते. औरंगजेब गादीवर आल्यावर शाहिस्तेखान त्याच्या मर्जीतला प्रमुख उमराव बनला. शाहिस्तेखानाकडे मुघली राजकारणाचा आणि युद्ध-लढायांचा प्रदीर्घ अनुभव होता. गुजराथ, माळवा आणि दख्खन अशा अनेक प्रांतांची सुभेदारी त्याने पार पाडली होती. तख्तावर आल्यानंतर १६६०च्या सुरुवातीलाच औरंगजेबाने शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आदिलशाही संपवून दख्खन ताब्यात घेण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली.

शाहिस्तेखानाने पाऊण लाखाहून अधिक घोडदळ आणि तीस हजार पायदळ एवढी प्रचंड सेना तयार केली. एवढ्या प्रचंड लवाजम्यासोबत 'शिवाजीला संपवणारच' या आत्मविश्वासाने शाहिस्तेखान २८ जानेवारी १६६० रोजी छत्रपती संभाजीनगरहून निघाला. नगरला आला. सुपे ताब्यात घेऊन बारामतीला आला. इंदापूर-सासवड-पाटस-यवत अशा मार्गाने नऊ मे १६६० रोजी पुण्यात पोहोचला. पुण्याचा संपूर्ण परिसर शाहिस्तेखानाच्या विशाल छावणीने भरून गेला. स्वत: शाहिस्तेखानाने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम केला. शिवाजीराजे या वेळी सिद्दी जौहरच्या वेढ्यात, पन्हाळ्यावर अडकून पडले होते. १३ जुलै १६६० रोजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपली सुटका करून खेळणा गाठला. एकीकडे शाहिस्तेखान महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये प्रचंड धुमाकूळ घालत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यातील गडांना वेढा घालून ते जिंकणे खूपच चिकाटीचे आणि वेळखाऊ होते. कारण त्या किल्ल्यावरील सरदार चिवट प्रतिकार करत होते. त्यामुळे त्याने गावागावांमध्ये तोडफोड, लूटमार सुरू केली. दुसरीकडे शिवाजी महाराज पुण्याच्या बाहेर पडून नयेत म्हणून त्याने तशीही तजवीज करून ठेवली होती. १६६० ते १६६२ अशी दोन वर्षे महाराज शांत राहिले. 

स्वराज्याच्या सर्व मुलखांत शाहिस्तेखानाचे सरदार पसरले होते. भरपूर काळ मोहीम चालवायला शाहिस्तेखानाकडे मनुष्यबळ, पैसा यांची कमतरता नव्हती. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करायचे ठरवले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही शत्रूवर असे जाणे आत्मघातकी होते; पण राजांनी हे साहस करायचे ठरवले. राजगडावरून त्यांनी या अकस्मात हल्ल्याची सुसूत्र योजना आखली. शाहिस्तेखानाचे सैन्य लाखभर असले, तरी ते सर्व पुण्यात नसून चोल, रहिमतपूर, सिंहगड असे विखुरले होते. सिंहगडला जसवंतसिंहांचा वेढा होता. राजांनी त्याला भरपूर नजराणा पाठवून वेढा ढिला करण्यासाठी त्याचे मन वळवले. आपलाच एक सरदार खानाला फितूर करून, त्याच्याकडून मुलखाची थोडी लुटालूट करवून खानाची मर्जी संपादन करायला लावली. त्याची नेमणूकही पुण्याच्या दक्षिणेला झाली. लाल महालातील बागकाम करणार्‍या माळ्याशी संधान बांधले नि महालातील सर्व भागाची विस्तृत माहिती मिळवली. शाहिस्तेखानाच्या अवतीभोवती संपूर्ण पुण्यात राजांचे हेर फिरू लागले. 

खान साधारण तीन वर्षे पुण्यात मुक्कामाला होता. त्याची फौजही एव्हाना कंटाळली होती आणि त्यामुळे शिथिलही झाली होती. खानाच्या छावणीच्या दोन-तीन मैलभर छबिन्याचे पहारेकरी होते. दिवस-रात्र या तुकड्या गस्त घालून परत येत. त्यामुळे हल्ला करायचा झाल्यास नेमकी वेळ साधावी लागणार होती. छापा घालून पळायचे, तर जवळपासच्या किल्ल्यावर तातडीने जायला हवे. असा एकच किल्ला पुण्याजवळ होता - सिंहगड! सिंहगडावर जाणार्‍या मराठ्यांकडे जसवंतसिंहाच्या वेढ्याचे दुर्लक्ष होईल अशी शिवरायांनी आधीच तजवीज केली होती. राजे आदल्या दिवशी राजगडावरून सिंहगडावर पोहोचले. नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, बाजी जेधे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोयाजी बांदल असे निष्ठावंत सवंगडी बरोबर होते. लाल महालाची बारीकसारीक माहिती असलेल्या बाबाजी आणि चिमणाजी मुद्गल देशपांडे या बंधूंना स्वत:बरोबर ठेवले. या लाल महालात स्वत: घुसायचे महाराजांनी नक्की केले होते. पुण्याच्या कोतवालाकडून काही लोकांनी एका लग्नाचे वर्‍हाड वरात घेऊन संध्याकाळी उशिरा येऊ देण्याची परवानगी मिळवली. ही लग्नाची वरात वाजतगाजत आली आणि पुण्याच्या अंधारात गडप झाली. राजांचे सैन्य वरातीमधून सर्व पुण्यात पसरले. शके १५८५ - चैत्र शुद्ध अष्टमीची रात्र. रविवार, पाच एप्रिल १६६३. दुसर्‍या दिवशी रामनवमी होती. 

पंचवीस-तीस जणांना घेऊन शिवाजी महाराजांनी मध्यरात्रीनंतर सिंहगड सोडला आणि पुण्याच्या रोखाने निघाले. वाटेत सिंहगडापासून डोणजे, खडकवासला, मुठा, पुण्यापर्यंत मार्गामार्गावर मावळ्यांच्या तुकड्या तैनात होत्या. मुठा नदी लाल महालाच्या पश्चिमेकडे होती. नदीच्या काठावर पहारे नव्हते. एप्रिल महिना असल्यामुळे नदीला पाणीही जास्त नव्हते. राजांनी नदी पार केली. घोडा बाजी जेध्याकडे देऊन नेताजीला सव्वाशे लोकांची तुकडी घेऊन सज्ज ठेवले. महालाच्या दक्षिण बाजूने कोयाजी आणि चांदजी बांदलांना काही माणसे घेऊन पाठवले आणि स्वत: बाबाजी, चिमणाजी आणि इतर आठ-दहा मावळे घेऊन महालापर्यंत लपतछपत पोहोचले. वाटेत चौकीवरच्या लोकांनी विचारल्यावर आधी खानाला फितूर असलेल्या सरदाराने 'पहार्‍यावरची माणसे' म्हणत सोडायला लावले. ही सारी माणसे महालापासून थोड्याच अंतरावर दबा धरून होती. महाराज महालाच्या मागच्या बाजूला सरकले. तिथल्या पहार्‍याला काही कळायच्या आत गारद करून वाट पाहत असलेल्या माळ्यापाशी आले. त्याने मुदपाकखान्याच्या उघड्या खिडकीतून आत जाण्याचा मार्ग दाखवला. राजांबरोबरच्या मावळ्यांनी आत येत पहाटेच्या जेवणाची तयारी करत असलेल्या सार्‍या आचार्‍यांना यमसदनास धाडले. आधी मुदपाकखाना आणि शेजघरात एक दरवाजा होता. शाहिस्तेखानाच्या लोकांनी मातीने तो बुजवून टाकला होता. नेहमीप्रमाणे तीन वाजता नगारा वाजू लागला. त्याच्या आवाजाचा फायदा घेत मावळ्यांनी कुदळीच्या घावांनी तो दरवाजा मोकळा केला. याच इशारतीने शहरात पांगून लपलेले मावळे लाल महालाच्या दिशेने धावत निघाले. मुदपाकखान्याच्या मोकळ्या झालेल्या त्या दरवाजातून धडाधड मावळे आत शिरले. समोर होता तो शाहिस्तेखानाचा जनानखाना. चाहूल लागताच तिथल्या स्त्रियांनी आरडाओरड चालू केली. दिवे-शामदाने फुंकुन सर्वत्र अंधार केला. मराठ्यांना काही दिसत नसल्यामुळे अंधारातील हल्ल्यात त्यातल्या काही स्त्रियाही जखमी झाल्या. मराठे तसेच पुढे सरकले. तेवढ्यात शाहिस्तेखानाचा मुलगा फत्तेखान राजांच्या सामोरी आला. महाराजांनी शाहिस्तेखान समजून चढाई केली आणि तो राजांच्या तलवारीच्या भक्ष्यस्थानी पडला. राजांना वाटले, खानच मेला; पण समोर उभ्या असलेल्या फत्तेखानाच्या बायकोने घाबरून शाहिस्तेखानाच्या खोलीकडे इशारा केला. राजे तत्काळ शाहिस्तेखानाच्या दिशेने धावले. खान सावध होऊन समशेर सावरणार, त्याआधीच राजांनी घाव घातला. घाव हातावर पडला. उजव्या हाताची तीन बोटे तुटली. अंधारात खान धडपडत खात पलीकडे गेला. राजांना वाटले, खान मारला गेला. वेळ कमी होता. शहरातील सार्‍या सैन्याला कळायच्या आत लाल महालातून निघायचे होते. राजांनी आणि सर्व मावळ्यांनी महालाच्या सार्‍या चौक्या कापून काढल्या आणि वाड्यातून क्षणार्धात पोबारा केला. 'गनिम आया, गनिम आया' अशा आरोळ्या ठोकत मराठे सर्वत्र धावत सुटले. बाहेरचे पेंगलेले खानाचे सैन्य खडबडून जागे झाले आणि किंकाळ्या-आक्रोशाने भरलेल्या लाल महालाकडे धावले. 

लाल महालावरील हा हल्ला छापातंत्राचा अद्भुत प्रकार होता. खानाचा मुलगा, जावई, सेनापती, बायका आणि इतर अशी साधारण शंभर माणसे मेली. शाहिस्तेखान अपमानाने, वेदनेने, भयाने तडफडत होता. इतका प्रचंड सेनासागर आणि कडेकोट बंदोबस्त असतानाही शिवाजी आपल्या अंगावर आला आणि आपण काहीच करू शकलो नाही, ही विटंबना नशिबी आली. औरंगजेबाला ही बातमी समजली. मुघलशाहीचा हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने रागाने शाहिस्तेखानाला आसाम-बंगालच्या सुभ्यावर नेमले आणि दरबारात न येता थेट जाण्यासाठी फर्मावले. अफजलखानाच्या वधाने शिवाजीराजांची कीर्ती दख्खनभर पसरली होती; पण शाहिस्तेखानाच्या छाप्याने शिवरायांचा पराक्रम हा हिंदुस्थानभर चर्चेचा विषय झाला. केवळ या एका छाप्याने प्रत्यक्ष युद्ध न करताही राजांनी प्रचंड मोठ्या मुघल फौजेला आपल्या मुलखातून चालते केले होते. हे संपूर्ण श्रेय शिवरायांच्या हेरखात्याचे. हल्ल्यापूर्वी पुण्यात पेरलेली माणसे, खानाची फितवलेली माणसे, प्रत्यक्ष वाड्यात घुसवलेली माणसे, नियोजित ठिकाणी ठेवलेल्या तुकड्या, वाड्यात अत्यंत कमी वेळात हल्ला चढवून निघून जाणे ही सारी योजनाबद्ध कृती होती. महत्त्वाचे म्हणजे स्वत: शिवरायांनी या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. प्रसंगी प्राण जाण्याचा धोका होता; पण राजांनी कुशल सेनापतीसारखे हे आव्हान पेलले. शाहिस्तेखानावरचा छापा हा अपेक्षित विजय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी केलेला यशस्वी 'सर्जिकल स्ट्राइक'च होता. अशा आपल्या थोर छत्रपतींना त्रिवार वंदन!

(संदर्भ : साप्ताहिक विवेक)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1,063 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1,063 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement