प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांच्या जयंतीनिमित्त (तीन एप्रिल) त्यांचा अल्प परिचय...
नाथमाधव हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. त्यांचे खरे नाव द्वारकानाथ माधव पितळे. त्यांचा जन्म तीन एप्रिल १८८२ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईतच झाले. शालेय जीवनात एक क्रीडानिपुण विद्यार्थी म्हणून ते चमकले. तथापि पुस्तकी शिक्षणाकडे त्यांचा फारसा ओढा नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुलाबा येथील गन कॅरीज फॅक्टरीमध्ये नोकरी धरली. त्या निमित्ताने त्यांनी पुष्कळ प्रवास केला. याच काळात त्यांना शिकारीचा छंद जडला. १९०५ साली अशाच एका शिकारीच्या वेळी एका उंच कड्यावरून ते खाली कोसळले आणि त्यांच्या कमरेखालील भाग लुळा झाला. उपचारार्थ इस्पितळात असताना त्यांना वाचनाचा छंद लागला. अनेक इंग्रजी-मराठी ग्रंथांचे त्यांनी वाचन केले. त्यातूनच लेखन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
सुरुवातीला त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले आणि पुण्याच्या डेक्कन हेरल्ड या वृत्तपत्रातून ते प्रसिद्धही झाले. पुढे धूतपापेश्वर आरोग्य मंदिराकडून देशी औषधोपचार करून घेण्यासाठी ते पनवेल येथे गेले असता तेथे प्रबोधनकार ठाकरे आणि 'केरळकोकीळ'कार कृ. ना. आठल्ये यांचा सहवास त्यांना लाभला. पनवेल येथेच त्यांनी कथा-कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली. प्रेमवेडा ही त्यांची पहिली कादंबरी १९०८मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून तीसहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
नाथमाधवांनी आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून काही प्रश्नांची बोधवादाच्या अंगाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला. अशा कादंबऱ्यांपैकी डॉक्टर (तीन भाग, १९१८–२०) ही त्यांची विशेष लोकप्रिय अशी कादंबरी. या कादंबरीवर एक मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. या कादंबरीखेरीज हेमचंद्र रोहिणी (१९०९), रायक्लब अथवा सोनेरी टोळी (दोन खंड, पूर्वार्ध दुसरी आवृत्ती १९१५, उत्तरार्ध १९२४), देशमुखवाडी (१९१६), विमलेची ग्रहदशा (१९१७) अशा अन्य काही सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्यांतून स्त्रियांच्या व्यथा, घरातून मिळणारे शिक्षण आणि सुसंस्कार यांचे महत्त्व, समाजातील कृष्णकृत्ये असे काही विषय त्यांनी तळमळीने हाताळलेले आहेत. तथापि त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी–विशेषतः हिंदवी स्वराज्यविषयक कादंबऱ्यांनी–कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक विशेष वाढवला.
सावळ्या तांडेल (१९०९) ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवाजी महाराजांचे सामर्थ्यशाली आरमार आणि ते राखणारे शूर तांडेल हा विषय मराठी ऐतिहासिक कादंबरीला नवा होता. त्यामुळे शिवकालीन इतिहासातील एका वेगळ्याच विषयावर कादंबरी लिहिण्याचे श्रेय त्यांना मिळाले. स्वराज्याचा श्रीगणेशा (१९२१), स्वराज्याची स्थापना (१९२२), स्वराज्याची घटना (दुसरी आवृत्ती, १९२५), स्वराज्याचा कारभार (१९२३), स्वराज्यावरील संकट (१९२३), स्वराज्याचे परिवर्तन (१९२५) आणि स्वराज्यातील दुफळी (१९२८) या कादंबरीमालेतून त्यांनी मराठेशाहीच्या उदयापासूनचा कालखंड चित्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यामागील प्रेरणा देशप्रेमाची, तशीच मराठेशाहीविषयीच्या गाढ अभिमानाची होती.
ठिकठिकाणी प्रवास करून ते ऐतिहासिक सामग्री मिळवत. तसेच इतिहासग्रंथांचे वाचन करत. नाथमाधवांना अद्भुताचे मोठे आकर्षण होते. वीरधवल (१९१३) या कादंबरीत त्याचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांप्रमाणे या कादंबरीलाही मोठी लोकप्रियता लाभलेली होती. त्यांनी लिहिलेली हेमचंद्र रोहिणी ही राजकीय विषयावरील आरंभीच्या मराठी कादंबऱ्यांपैकी एक होय. त्यांनी काही नाटके व कविताही लिहिल्या आहेत. २१ जून १९२८ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment