महापराक्रमी हनुमानाची गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख...
मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
ज्याची गती मनासारखी वेगवान आहे आणि ज्याचा वेग वाऱ्यासारखा (पवन) आहे, जो इंद्रियांवर विजय मिळवणारा आणि बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आहे, असा वायुपुत्र (हनुमान) आणि वानरश्रेष्ठ अशा श्रीरामदूत हनुमानाला माझा नमस्कार!
मारुतीरायाचे किती सार्थ वर्णन या श्लोकात केलेले आहे! शक्तिशाली असूनही विनम्र अशा या हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला. हा दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हनुमानाविषयी काही रंजक माहिती या लेखातून जाणून घेऊ या.
हनुमान हे नाव
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. त्या खिरीतील थोडासा भाग एका घारीने नेला. ती उडत असताना अचानक वादळ सुटले आणि तपश्चर्या करणार्या अंजनीच्या ओंजळीत खिरीचे पात्र पडते. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन 'मी तुझ्यापोटी जन्माला येईन' असा आशीर्वाद तिला दिलेला असतो. त्यामुळे भगवान शंकर आणि पवनदेव यांचा कृपाप्रसाद म्हणून अंजनी ती खीर प्राशन करते. त्यामुळे अंजनीला हनुमानासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतीरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू येत होता. इंद्रदेवाला मारुती म्हणजे राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतीरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.
हनुमानाचे गुणविशेष
महापराक्रमी : हनुमंताने जंबुमाली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ या मोठमोठ्या राक्षसांचा नाश केला. त्याने रावणालासुद्धा बेशुद्ध केले. समुद्रावरून उड्डाण करून लंकादहन केले आणि द्रोणागिरी पर्वतही उचलून आणला. या सर्व गोष्टींवरून आपल्याला हनुमान किती महापराक्रमी होता, हे लक्षात आले असेल.
निस्सीम भक्त : हनुमान केवळ पराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. देवासाठी प्राणही देण्याची त्याची सिद्धता होती. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. देवाच्या नामातच शक्ती आहे, हे त्याला ठाऊक होते.
अखंड साधना : युद्ध चालू असतानाही मारुतीराया थोडावेळ बाजूला जाऊन ध्यान लावे आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करत असे. हे अखंड नामस्मरण आपल्यासाठी काय वस्तुपाठ देते, तर आपणही अखंड देवाचे नाव घ्यावे अर्थात देवाप्रति कृतज्ञ असावे. जे काही देवाने दिले आहे त्यात समाधानी राहावे.
बुद्धिमत्ता : मारुतीरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धिमान कसा? जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. अशा सात्त्विक बुद्धीचे प्रतीक म्हणजे हनुमान आहे. हनुमान साक्षात रुद्राचा अवतार, परम शक्तिशाली आणि चिरंजीव असला तरी विनम्र होता. बुद्धिमत्ता आपल्याला उन्मत्त होऊ देत नाही. जो विनम्र, निगर्वी असतो तोच खरा बुद्धिमान!
जितेंद्रिय : मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही.
भाषणकलेत निपुण असणारा : मारुती उत्तम वक्ता होता. त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला.
मारुतीच्या मूर्तीचा रंग शेंदरी असण्याचे आणि त्याला शेंदूर लावण्याचे कारण
मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक कथा आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे म्हणून मी शेंदूर लावते. मारुतीराया रामाचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य या शेंदूराने वाढणार असेल, तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला. हे प्रभू श्रीरामांना समजल्यावर ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे.
मारुतीला शेंदूर लावणे आणि तेल वाहणे : हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात.
मारुतीची रूपे
प्रताप मारुती : एका हातात द्रोणागिरी पर्वत आणि दुसर्या हातात गदा, असे याचे रूप असते. यातून मारुतीची सर्वशक्तिमानता पाहायला मिळते.
दासमारुती : श्रीरामापुढे हात जोडून उभा असलेला, मस्तक झुकलेले आणि शेपटी भूमीवर रुळलेली, असे याचे रूप आहे. यातून हनुमान किती नम्र आहे, हे समजते.
वीरमारुती : हा सतत लढण्याच्या पवित्र्यात उभा असतो. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेला महाबली हनुमान.
पंचमुखी मारुती : आपण पुष्कळ ठिकाणी पंचमुखी मारुतीच्या मूर्ती पाहतो. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह आणि कपिमुख अशी मूर्तीची मुखे असतात. पंचमुखीचा अर्थ आहे, पाच दिशांचे रक्षण करणारा. मारुती पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व या पाच दिशांचे रक्षण करतो.
अशा या हनुमंताचे गुणगान करणारे सोत्र समर्थ रामदास स्वामी यांनी रचले आहे. समर्थ रामदास यांनी शक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमानाची मंदिरे महाराष्ट्रात ११ ठिकाणी स्थापन केली. समर्थ रामदासस्वामी यांनी ही स्थापना केली, त्या वेळी महाराष्ट्रात मुघल साम्राज्य दृढ होत होते. अशा या संकटसमयी मराठी जनतेला आपल्या सामर्थ्याची जाणीव व्हावी म्हणून या अकरा मंदिरांची स्थापना, मारुती स्तोत्राची रचना रामदासस्वामींनी केली. आपल्या देवी-देवता, संस्कृती, परंपरा हा आपला देवभोळेपणा नाही, तर ती आपली शक्तिस्थाने आहेत. निसर्गाने मानव म्हणून कसे वागावे, आचरण ठेवावे यासाठी निर्माण केलेले हे आदर्श आहेत. त्यांच्या कथा, त्यांची रूपे या केवळ दंतकथा नाहीत, तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी निर्माण केलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. अशा दिनविशेषांच्या निमित्ताने आपल्याला याचे स्मरण होते. हाच वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे. हाच आपला मनुष्यधर्म आहे आणि हेच आपल्याला आपला धर्म सांगतो!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment