शिखांचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांच्या जयंतीनिमित्त (एक एप्रिल) त्यांचा अल्प परिचय...
श्री गुरू तेगबहादूर हे शिखांचे नववे गुरू होते. शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांचे ते सर्वांत धाकटे पुत्र व शेवटचे-दहावे गुरू गोविंदसिंग यांचे ते पिता होते. तेगबहादूरांचा जन्म पंजाबमध्ये अमृतसर येथे एक एप्रिल १६२१ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव नानकी होते. वयाच्या आठव्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी हिच्याशी तेगबहादूरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्यूनंतर बकाला येथे जाऊन विरक्त वृत्तीने राहू लागले.
शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या मृत्यूनंतर १६६४मध्ये तेगबहादूर यांना नववे गुरू म्हणून शिखांनी गादीवर बसवले. तथापि त्यांचे भाऊ धीरमल व इतरांनी त्यांच्याशी गादीसाठी संघर्ष सुरू केला. नंतर तेगबहादूर अमृतसरला गेले, तेव्हा मसंदांनी (शीख धर्मप्रसारकांनी) हरमंदिराचा आधीच ताबा घेतला होता व तेथे भ्रष्टाचार माजवला होता. नंतर तेगबहादूर आपल्या वडिलांच्या गावी, किरतपूर येथे गेले. तेथेही त्यांना मसंदांनी व भाऊबंदांनी खूप त्रास दिला. तेव्हा त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसवले आणि तेथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांची दुसरी पत्नी गुजरी यांना पुत्ररत्न झाल्याची वार्ता त्यांना आसामात कळली. हाच मुलगा पुढे शिखांचा दहावा व शेवटचा गुरू बनला. ते गोविंदसिंग म्हणून प्रसिद्धीला आले.
तेगबहादूरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करून अनेक हिंदूंना व मुसलमांनानाही शीख धर्माची दीक्षा दिली. औरंगजेबला अर्थातच हे खपले नाही. त्याने काश्मीरच्या सुभेदाराला तेथील सर्व हिंदूंना मुसलमान करण्याचा आदेश दिला. अशा वेळी तेगबहादूरांनी हिंदूंचे नेतृत्व केले. औरंगजेबाने त्यांना आग्रा येथे कैद केले व दिल्लीला आणून चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद केला. ते स्थान आज ‘सीसगंज गुरुद्वारा’ म्हणून प्रसिद्ध असून, पवित्र मानले जाते. तेगबहादूरांच्या या बलिदानाने सर्व पंजाब पेटून उठला. स्वधर्म व स्वाभिमानाच्या रक्षणार्थ हजारो शीख वीर पुढे आले. तेगबहादूर शूर, साहसी, पण मनाने अत्यंत कोमल व क्षमाशील होते. विविध विषयांवर रचलेली तेगबहादूरांची ११६ पद्ये उपलब्ध आहेत. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शब्द’ (स्तोत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो.
अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादूरांनी धर्मासाठी बलिदान करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःला पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श शीख धर्मात घालून दिला. त्यांच्या बलिदानाने शीख धर्मात जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करत असताना गुरू तेगबहादूर हुतात्मा झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करुणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांनी आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. ते आजही शीख धर्मातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने २०२२मध्ये त्यांची ४००वी जयंती देशभर साजरी केली होती.
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूरसाहिब यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून गुरू तेगबहादूरांच्या हौतात्म्याचा इतिहास प्रत्येक गावात आणि घराघरात पोहोचावा म्हणून राज्य शासन कटिबद्ध असल्याची भावना सरकारने व्यक्त केली आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment