डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त (३१ मार्च) त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा...
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला. आजोळी जन्मलेल्या यमुना गणपतराव जोशी नऊ वर्षांच्या असताना त्यांच्याहून वीस वर्षांनी मोठे असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. परंतू वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले.
आनंदीबाईंना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून गोपाळरावांनी प्रयत्न केले. जोशी यांनी कोलकात्यात बदली घेतल्यावर तिथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे-बोलणे शिकल्या. गोपाळराव मुळात कल्याणला पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग आणि कोलकाता येथे बदली झाली. त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. त्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत. याउलट गोपाळरावांची आपल्या तरुण पत्नीकडून अभ्यासाची अतीव अपेक्षा असे. कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे, हे कळल्यावर ते त्यांना लोकहितवादींची शतपत्रे वाचून दाखवू लागले. त्यांनी आपल्या पत्नीला इंग्रजी भाषा शिकवण्याचे ठरवले.
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणासाठी गोपाळरावांनी अमेरिकेत पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची पूर्वअट होती. धर्मांतर करणे त्यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तिथे जाण्यापूर्वी तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्या वेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची आवश्यकता किती आहे, याचे प्रभावी स्पष्टीकरण केले आणि हेही स्पष्ट सांगितले, की 'मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.' आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच; पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संपूर्ण भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनीदेखील २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
आनंदीबाई जोशी कलकत्त्याहून जहाजाने न्यूयॉर्कला गेल्या. आनंदी जोशी यांनी पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहून त्यांच्या वैद्यकीय कार्यक्रमात प्रवेश घेण्याची विनंती केली. तो जगातील दुसरा महिला वैद्यकीय कार्यक्रम होता. महाविद्यालयाच्या डीन राहेल बोडली यांनी तिला प्रवेश दिला. आनंदी जोशी यांनी वयाच्या १९व्या वर्षी वैद्यकीय शिक्षण सुरू केले. अमेरिकेत, थंड हवामान आणि अपरिचित आहारामुळे त्यांची ढासळणारी तब्येत अधिकच बिघडली. क्षयरोग झाला. तरीही कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर दोनच वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करून ११ मार्च १८८६ रोजी आनंदीबाईंनी एमडी ही पदवी मिळवली. एमडीसाठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र'या विषयावर प्रबंध लिहिला. एमडी झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला होता.
एमडी झाल्यावर आनंदीबाई भारतात आल्यावर कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाच्या प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. केवळ २१ वर्षांच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य' असे समजणार्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. अमेरिकेत असतानाच आनंदीबाईंची प्रकृती ढासळली. आनंदी जोशी यांचे पुढच्याच वर्षी म्हणजे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारतात शोककळा पसरली. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही, हे या जोडप्याने सिद्ध करून दाखवले. त्या काळी एखाद्या भारतीय महिलेने कोणत्याही प्रकारच्या धर्मांतराला बळी न पडता जिद्द, चिकाटी आणि आपल्या पतीच्या भक्कम साथीने अशक्यप्राय गोष्ट साध्य केली.
आज महिला अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. आजचे हे वातावरण डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यासारख्या थोर महिलांमुळे प्राप्त झालेले आहे. या कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपणही स्वप्रगती साधत समाज आणि देश यांच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या. हीच या थोर महिलांना आणि त्यांच्या कार्याला वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment