चिंतामणराव कोल्हटकर

चिंतामणराव कोल्हटकर यांच्या जन्मदिनानिमित्त (१२ मार्च) त्यांचा अल्प परिचय...

चिंतामणराव कोल्हटकर  मुख्य फोटो
मुख्य फोटो

मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळीच छाप उमटवणारे, संवादफेकीतून रसिकांच्या मनाला भिडणारे आणि आपल्या कलाकौशल्याने मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारे कलावंत म्हणजे चिंतामणराव कोल्हटकर. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत प्रामाणिकता, विभिन्न अभिनय छटा आणि सखोलता होती. त्यांची ओळख केवळ एका अभिनेता म्हणून मर्यादित नव्हती, तर मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक तेजस्वी तारा म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. 

चिंतामणरावांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे त्यांना एक वेगळीच ओळख मिळाली होती. चिंतामणराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीचे एक अजरामर व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे या गावी झाला. सातारा येथे 'तुकाराम' या नाटकात त्यांनी 'मंबाजी'ची भूमिका साकारून १९०७ साली रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले. १९१८मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्यासमवेत स्थापन केलेल्या बळवंत संगीत नाटक मंडळीपर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्भुत असाच आहे. कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, आदी नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. 

चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या. गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९४२मधल्या वसंतसेना या चित्रपटातली त्यांची शकाराची भूमिका गाजली. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना 'बहुरूपी' म्हणून नावाजले होते. १९३१ सालापासून चित्रपट बोलू लागला. तेव्हा त्यांनी सांगली येथे स्टुडिओ उभा करून 'कृष्णार्जुन युद्ध' हा बोलपट तयार केला. त्यांनी विश्राम बेडेकरांच्या मदतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. भालजी पेंढारकरांनी १९३६मध्ये 'कान्होपात्रा' या चित्रपटाची निर्मिती केली. त्या वेळी खलनायकाच्या भूमिकेसाठी चिंतामणरावांना बोलावून घेतले. प्रेक्षकांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्याच वर्षात बेडेकरांनी 'अंधेरी दुनिया' हा हिंदी चित्रपट काढला. त्यात चिंतामणरावांनी कैद्याची भूमिका रंगवली होती. 

१९४२ सालचा 'सूनबाई' हा भालजींचा अत्यंत गाजलेला बोलपट. चिंतामणरावांचे काम आणि भालजींचा पहिला सामाजिक चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट भरपूर चालला. १९४६ साली अहिल्यानगर येथे भरलेल्या ३५व्या आणि १९४९मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनाचे चिंतामणराव कोल्हटकर अध्यक्ष होते. त्यांनी रंगभूमीच्या केलेल्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला. चिंतामणरावांनी लिहिलेल्या 'बहुरूपी' या आत्मचरित्राला १९५८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. २३ नोव्हेंबर १९५९ रोजी चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words