छत्रपती संभाजी महाराज

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयीचा हा लेख...

छत्रपती संभाजी महाराज मुख्य फोटो
मुख्य फोटो

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. ते संकटांवर मात करून पाय रोवून फक्त उभेच राहिले नाहीत, तर त्यांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी स्वराज्याची धुरा सक्षमपणे वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यांच्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृतपंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रांत आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विशाल कार्यकर्तृत्वाचा हा अल्पसा आढावा.

संभाजीराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजीराजे दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे म्हणजे सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे, संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा यांचे प्रशिक्षण घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेंनाही सोबत घेतले होते. त्या वेळी संभाजीराजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजीराजेंना सुरक्षितपणे स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर २० नोव्हेंबर १६६६ रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडावर पोहोचले. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या काही दानपत्रांवरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून 'समयनय' हा नीतिपर ग्रंथ संभाजीराजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. 

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजीपंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

छत्रपती झाल्यावर 'श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते । यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ।।’ अशी संभाजी महाराजांची मुद्रा होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट जास्त बळ असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरून औरंगजेबाला पुरते जेरीला आणले होते. संभाजीराजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकाही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. त्यांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील बऱ्हाणपूरची लूट आणि रामशेज किल्ल्याची झुंज प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजेंनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. तसेच मौनी गोसावी, गणीराम, वासुदेव गोसावी, कऱ्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट, कऱ्हाडचेच शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या व्यवस्था लावल्या. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इत्यादी देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे, यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत. 

१६८९च्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांमध्ये आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मुघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती; मात्र संभाजीराजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी, ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणूनच त्यांना धर्मवीर या नावाने ओळखले जाते.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 12:55 AM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 12:55 AM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words