कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनानिमित्त (१० मार्च) त्यांचे अल्पचरित्र...
'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवणारे, जगण्याचं बळ देणारे. 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती' अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगणारे आणि मराठी साहित्यविश्वाला भरभरून दिल्यानंतर, मराठीजनांचं आयुष्य समृद्ध केल्यानंतरही 'इतकं दिलंत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही मला' अशा भावनांमधून रसिकांबद्दलच कृतज्ञता व्यक्त करणारे कविवर्य म्हणजे मंगेश पाडगावकर होय. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. मराठी साहित्यातील 'जिप्सी' म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यामध्ये झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन एमए झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षं महाविद्यालयात अध्यापक म्हणूनही काम केलं. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षं पाडगावकर यांनी 'साधना' साप्ताहिकात सहसंपादक म्हणून आणि मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणून काम केलं. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्याने प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं; पण भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीने ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. त्यातल्या अनेक कवितांची चित्रपटगीतं झाली. 'जिप्सी', 'छोरी', 'उत्सव', 'विदूषक', 'सलाम', 'गझल', 'भटके पक्षी, 'बोलगाणी' हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. पाडगावकर यांनी 'गझल', 'विदूषक', 'सलाम' या काव्यसंग्रहांतून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली, समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली.
'बोलगाणी' हा पाडगावकर यांनी काव्यरचनेमध्ये केलेला एक वेगळा प्रयोग आहे. पाडगावकर यांचे 'भोलानाथ,' 'बबलगम', 'चांदोमामा' हे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. १९६४मध्ये प्रकाशित झालेला 'वात्रटिका' हा कवितासंग्रह पाडगावकर एक वेगळी ओळख करून देणारा ठरला आहे. पाडगावकर यांनी 'बायबल' ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. या सर्व साहित्यिक योगदानाबद्दल पाडगावकरांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८०मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. २००८मध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर २०१३मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. २०१०मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची 'शुक्रतारा मंद वारा' अशी गाणी असोत किंवा 'सांगा कसं जगायचं, रडत-रडत की गाणी म्हणत' अशा कविता असोत, वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते. ३० डिसेंबर २०१५ रोजी या थोर कवीचे निधन झाले. असे हे कविवर्य मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितांमधून रसिकांना आनंद अखंडितपणे वाटतच राहणार आहेत. त्यांना वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment