संत श्री एकनाथ महाराजांचा अल्प परिचय...
आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे फार मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला स्वराज्य मिळावे म्हणून मुघलांशी लढत होते, तेव्हा महाराष्ट्रातील संतांनी फक्त भक्तियोगच समजावून दिला असे नाही, तर समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर परखड भाष्य केले. समाजातील जातिभेद नष्ट होऊन समाज समरस व्हावा, एक व्हावा म्हणून आपल्या कीर्तनांतून, भारूडांतून, अभंगांतून त्यावरील उपाय सांगितले. निसर्ग आणि मानव यांचे एकरूपत्व पटवून दिले. देशप्रेम, मातृ-पितृप्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला. असेच एक थोर संत म्हणजे संत एकनाथ.
संत एकनाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी... नाथांचा सांभाळ आजोबांनीच केला. संत एकनाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास. ते स्वतः वारकरी होते. संत एकनाथांचे गुरू होते जनार्दनस्वामी. त्यामुळे एकनाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दनस्वामींचा जन्म, जनार्दनस्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दनस्वामींचा अनुग्रह, जनार्दनस्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी या एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. एकनाथी भागवत ही संस्कृत भागवताच्या अकराव्या स्कंधावरील टीका प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे कामही एकनाथांनी केले. स्पृश्य, अस्पृश्य हा भेद नाथांनी कधीही मानला नाही. समाजाच्या सर्व थरांत परमार्थ शिरावा यासाठी संत एकनाथांनी खूप प्रयत्न केले.
नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी षष्ठी एवढाच अर्थ नाही, तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्गुरूशी झालेली एकरूपता यातून सिद्ध होते. परामर्थ सफल व्हावयाचा असेल तर सहा गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. शिष्य, गुरू, सेवा, उपदेश, ज्ञान, कृतार्थता हे प्राप्त झाले म्हणजे गुरूचे गुरूपण संपते, शिष्याचे शिष्यपण संपते व दोघांचे एकाच तिथीला म्हणजे एकाच क्षणात निर्वाण होते. गुरू आणि शिष्य एकरूप होतात. नाथषष्ठीमध्ये हे सहा योग एकत्र येतात. षष्ठी म्हणजे सहाचा समुदाय. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षड्-रिपुंच्या समुदायाने आपल्याला दीन केले आहे; पण श्रीसंत एकनाथ महाराजांनी या सहांना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले. यालाच नाथषष्ठी म्हणतात.
श्री एकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर या वारीला मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंड्या येतात. 'भानुदास-एकनाथ'च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमतो. फाल्गुन वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेला गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरुवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्रीकेशवस्वामीकृत नाथचरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते. षष्ठीच्या दिवशी पहाटे दोन वाजता पांडुरंगाच्या मूर्तीला महाभिषेक करण्यात येतो.
नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथमहाराजांच्या समाधिमंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीने वारकरी व हरिदासी कीर्तने करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात. सप्तमीच्या रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारूडे सादर केली जातात. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन-कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गूळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरीत्या बांधण्यात येतात. त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकवलेली असते.
सूर्यास्तासमयी 'दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ'च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या साह्याने ती हंडी फोडण्यात येते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तिन्ही दिवसांमध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीने सोहळ्याचा आनंद लुटतात. फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असे म्हणतात. संत एकनाथ स्वत: आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करत. पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. हे पंचपर्व म्हणजे नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म, स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह, नाथांना स्वामींचे प्रथम दर्शन व अनुग्रह, श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी, श्री एकनाथ महाराज जलसमाधी.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment