छत्रपती राजाराम महाराज यांचा दोन मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा हा अल्प परिचय...
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला. राजाराम महाराज हे मराठेशाहीतील तिसरे छत्रपती. कठीण प्रसंगी सारासार बुद्धीने विचार करू शकतील अशी माणसे शिवाजी महाराजांनी घडवलेली होती. त्यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी, आदींचा समावेश होता. या सर्व मंडळींनी छत्रपती संभाजीमहाराजांनंतर १६८९ साली राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला.
१५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते. जानकीबाईंनंतर राजाराम महाराज यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले. याशिवाय राजाराम महाराजांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. एक फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे छापा घालून कैद केले गेले आणि अवघ्या दीड महिन्यात औरंगजेबाने त्यांचा अतोनात छळ करून फाल्गुन अमावास्येला हत्या केली. हे करूनसुद्धा औरंगजेबाचे चित्त शांत होईना. मग त्याने लगेच झुल्फिकारखानाला रायगड घेण्यास रवाना केले. औरंगजेबाला ही वेळ महत्त्वाची वाटत होती. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठा सैन्य हतबल झाले असेल, निराश झाले असेल असे त्याला वाटले. या सर्वांचा परिणाम म्हणून रायगड किल्ला म्हणजेच मराठा साम्राज्याची राजधानी अलगद ताब्यात येईल असा त्याचा अंदाज होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर चौदाव्या दिवशीच रायगडाला वेढा पडला.
त्या वेळी रायगडाचे किल्लेदार होते चांगोजी काटकर आणि त्यांच्यासोबत गडावर होते येसाजी कंक. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी रायगडावर पोहोचताच अवघ्या आठ दिवसांतच राजाराम महाराजांना नजरकैदेतून सोडून त्यांना छत्रपतिपद देण्यात आले. रायगडावर राजाराम महाराज, छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईसाहेब व आठ वर्षांचा मुलगा शिवाजी हे होते (शिवाजी हे पुढे शाहू या नावाने इतिहासात परिचित झाले.) त्यामुळे सगळेच सापडले, तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करवून घेऊन कर्नाटकातील जिंजीला जावे असे ठरले. त्यानुसार महाराज जिंजीला गेले, तर झुल्फिकारखानाने राजघराण्यातील कैद केलेल्या अन्य मंडळींना औरंगजेबाकडे पाठवून दिले. आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एकसमान लढा सुरू झाला.
औरंगजेबाचे अफाट सैन्य विरुद्ध छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे, संताजी जगताप, रूपसिंह भोसले, मानाजी मोरे, खंडो बल्लाळ, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर (हुकुमतपन्हाचा अर्थ राज्याचा आधार) यांनी स्वराज्य लढत ठेवले. १६९० साली मुघल सरदार जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला. हा वेढा सात वर्षे चालला होता. वेढा घातलेल्या मुघलांच्या सैन्यावर हल्ले करून धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी त्यांना वेठीस आणले होते. अखेरीस १६९७ साली जिंजी किल्ला मुघलांच्या ताब्यात पडला; पण त्याआधीच राजाराम महाराज जिंजीहून निसटून परत महाराष्ट्रात परतले होते.
महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी १६९८मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहीम आखली; पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली. मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्ल्यावर नेण्यात आले. दिनांक दोन मार्च १७०० रोजी ऐन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती राजाराम पराक्रमी, मुत्सद्दी होते. चांगल्या माणसांची त्यांना पारख होती. राजाराम महाराजांना ताराबाईंपासून शिवाजी, तर राजसबाईंपासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते. या सगळ्या कालखंडात औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता; पण युद्ध जिंकू शकत नव्हता. राजाराम महाराज यांना अल्पकाळ आयुष्य मिळाले. तरीही त्यांनी आपल्या पराक्रमाची छाप उमटवली. ते अतिशय समंजस आणि प्रगल्भ बुद्धीचे होते. सततचा प्रवास, धाकधूक, संकटे यांनी थकून न जाता ते निकराने लढले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment