राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) आपण का साजरा करतो?

राष्ट्रीय विज्ञान दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

जसजसा माणूस उत्क्रांत झाला, तसतसे त्याला निसर्गचक्र समजू लागले. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे आकलन करून, विश्लेषण करून तो निष्कर्ष काढू लागला. आपल्या गरजेनुरूप शोध लावू लागला. अशा प्रकारे विज्ञानाचा जन्म झाला. आज या विज्ञानाच्या जोरावर आपण अनेक असाध्य गोष्टी साध्य केल्या आहेत, अनेक शोध लावले आहेत. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, अणुशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत आपण शोध लावले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपण विज्ञानाचा वापर करतो. देवाने डोळे दिले असे म्हटले, तर विज्ञानाने प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी दिली. २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन. त्या निमित्ताने या दिवसाचे औचित्य आणि महत्त्व सांगणारा हा लेख. 

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी 'रामन इफेक्ट'चा शोध लावला. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३०मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन’ने या कामगिरीच्या गौरवार्थ दर वर्षी २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर, भारत सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला आणि २८ फेब्रुवारी १९८७ रोजी पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठीही राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 

राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. केवळ अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल, हे उद्दिष्ट असते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञानाशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय विज्ञान संस्था, विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमींमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी भाषण, निबंध, लेखन, विज्ञान प्रश्नमंजूषा, विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र आणि चर्चासत्राचे आयोजनदेखील केले जाते. 

अनेक अंधश्रद्धांना छेद देण्याचे काम विज्ञानाने केले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तर अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम आहे. आपले सण, उत्सव परंपरा यांचे शास्त्रीय आधारावरच नियोजन केलेले आहे. त्या त्या ठिकाणचे हवामान, वातावरण यांचा सखोल अभ्यास करूनच ही रचना केली गेली आहे. तेव्हा या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संकल्प करू या, की आपला येणारा प्रत्येक सण, उत्सव आपण त्यातील विज्ञान जाणून घेऊन साजरे करू या. विज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि सकल जनांच्या आरोग्यासाठी टाकलेले हे छोटे पाऊल आपल्या पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरेल यात शंका नाही!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words