इतिहास, चरित्र आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंदर्भातील विषयांवर विपुल लेखन केलेले विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा २२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
वि. स. वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. आपल्या विपुल लेखनातून त्यांनी विचारवंत पत्रकार, लेखक, संपादक म्हणून आपली ओळख तयार केली. विद्यार्थिदशेत असताना ते पुण्यात राहत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात जो सत्याग्र करण्यात आला होता, त्यात वाळिंबे यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना अटक झाली होती आणि तीन महिने येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला.
आपल्या उमेदवारीच्या काळात त्यांनी अग्रणी नावाचे दैनिक, तसेच रोहिणी नावाच्या मासिकात काम केले. नंतर त्यांनी प्रभात आणि मग ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रांमध्ये नोकरी केली. साधारण १९६२-६३च्या आसपास केसरी या वृत्तपत्रात वाळिंबे वृत्तसंपादक झाले. पत्रकारितेतील त्यांचा सर्व महत्त्वाचा काळ ते केसरीमध्येच कार्यरत होते. केसरीमध्ये असतानाच ते पत्रकारितेतील प्रशिक्षण घेण्यासाठी कार्डिफ येथेही गेले होते. ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ हा त्यांच्या सुहृदांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचा संग्रह असून, डॉ. अरुणा ढेरे यांनी त्याचे संपादन केले आहे.
इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली, इस्रायलचा वज्रप्रहार, गरुडझेप, हिटलर, पराजित-अपराजित, सत्तावन्न ते सत्तेचाळीस, नेताजी, ऑपरेशन थंडर, सावरकर, श्री शिवराय, स्टॅलिनची मुलगी, स्वातंत्र्यवीर, व्होल्गा जेव्हा लाल होते, १९४७, वॉर्सा ते हिरोशिमा अशी कित्येक पुस्तके त्यांनी लिहिली असून, ती वाचकप्रिय आहेत. अनेक पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले. वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली. विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन असलेले 'राजमाता' व रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील 'युवराज' ही ऐतिहासिक कादंबरी ही पुस्तकेही त्यांनी लिहिली.
‘सत्तावन्न ते सत्तेचाळीस’ हा त्यांचा ग्रंथ १८५७ ते १९४७ या काळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडणारा असून ‘संग्राम,’ ‘आपला स्वातंत्र्यलढा’ अशी त्यांची अनेक पुस्तके स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहेत. ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ आणि ‘वॉर्सा ते हिरोशिमा’ यांसारखे जागतिक इतिहासाशी निगडित ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. 'अत्यंत वाचनीय लेखक' अशा शब्दांत पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा गौरव केला आहे.
२२ फेब्रुवारी २००० रोजी वि. स. वाळिंबे यांचे निधन झाले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment